चैतन्य प्रेम

इच्छा भगवंतकेंद्रित होणं म्हणजे काय? तर, पूर्वी मनात इच्छा येताच तिच्या पूर्तीचा ध्यास लागत असे; आता इच्छा उद्भवली तरी ती जर आत्महिताची असेल, तर त्याची पूर्ती-अपूर्ती भगवंताच्या इच्छेवर अवलंबून आहे, हा भाव भक्तहृदयात स्थिर होतो. तो त्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्नही करतो; पण त्यात हट्टाग्रह नसतो. उलट आपल्याकडून भगवंताचं स्मरण अधिकाधिक व्हावं, साधना व्हावी, सद्गुरू इच्छेनुरूप जीवन व्यतीत व्हावं, अशी इच्छा मनात निर्माण होऊ लागते. तर याप्रमाणे प्रपंचात जखडलेली वासना सद्गुरूंच्या चरणी लीन होते. ‘‘तेव्हा प्रपंच सांडोनि ‘वासना’। जडोनि ठाके जनार्दना।’’ आणि मग ‘‘‘अहं’कारू सांडोनि अहंपणा। ‘सोहं’ सदनामाजीं रिघे॥’’ अहंभावानं व्यापलेला ‘मी’ हा ‘सोहं’ भावात स्थित होऊ लागतो. मग ‘‘ ‘चित्त’ विसरोनी चित्ता। जडोनि ठाके भगवंता। ‘मनाची’ मोडली मनोगतता। संकल्प-विकल्पता करूं विसरे॥ ७७८॥’’ चित्तात भौतिक गोष्टींचंच चिंतन आजवर सुरू होतं, त्या चित्तात भगवंताचं चिंतन दृढ होऊ लागतं. मनाचं मनपणच विरू लागतं. मनोगत करीत रमण्याची मनाची सवय मोडते. संकल्प आणि विकल्प यांच्या लाटांनुसार अस्थिर होण्याची मनाची दशा पालटते. ‘अमुक व्हावं’ हा संकल्प आणि ‘पण तसं होईल ना’ या प्रश्नानं ग्रासलेला विकल्प यांनी मन सतत आंदोलित होत असतं. हे संकल्प-विकल्प मावळतात.

मग ‘‘कृतनिश्चयेंसीं ‘बुद्धी’। होऊनि ठाके समाधी। ऐशी देखोनि हृदयशुद्धी। तेथोनि त्रिशुद्धी न रिघे हरी ॥ ७७९॥’’ जी बुद्धी देहबुद्धीच्याच परिघात अडकून भौतिकापुरताच बोध करीत होती, ‘मी’च्या वकिलीपुरती राबत होती तिला सद्गुरूबोधाचं मोल उमगू लागतं. तिला समत्व प्राप्त होतं. थोडक्यात, मन, चित्त, बुद्धी आणि अहं हे अंतकरण चतुष्टय़ परम तत्त्वाशी एकरूप होऊ लागतं तेव्हा अंतकरणाची ही हृदयशुद्धी पाहून हरीचा पाय तिथून निघत नाही!

हरी नारायण आणि जनक महाराज यांच्या संवादाच्या निमित्तानं श्रीएकनाथ महाराज सांगतात की, एक साधं नाम घ्यायला सुरुवात केली आणि त्या नामबळानं तो हरीच बांधला गेला! ‘‘हरिनामप्रेमप्रीतीवरी। हृदयीं रिघाला जो हरी।

तो निघों विसरे बाहेरी। भक्तप्रीतिकरीं कृपाळू॥ ७८०॥’’ हरिनामावर ज्याचं प्रेम जडतं त्याच्यावर त्या हरीचंही प्रेम जडतं. त्या प्रेमापोटी तो भक्ताच्या हृदयात प्रवेशला खरा, पण त्या प्रीतीनं तो बाहेर जायलाच विसरला. नाथ म्हणतात, ‘‘भक्त प्रणयप्रीतीची दोरी। तेणें चरण धरोनि निर्धारीं। निजहृदयीं बांधिला हरी। तो कैशापरी निघेल॥ ७८१॥’’ प्रणय म्हटलं की शारीर प्रेमच डोळ्यापुढे येतं. इथं भक्ताची जी प्रणयप्रीती म्हटलं आहे तिचा अर्थ प्रत्येक कृतीतून व्यक्त होणारं भक्ताचं आत्मिक प्रेम हा आहे. भक्ताच्या त्या विशुद्ध, निरपेक्ष प्रेमाच्या दोरीनं, त्याच्या प्रेमनिर्धारानं हा भगवंत बांधला जातो. प्रेमनिर्धार म्हणजे काय? तर परिस्थिती सम असो की विषम, आप्तेष्ट साथ देवोत की विरोध करोत, मी भगवंताचे चरण सोडणार नाही, हा सहज निश्चय. हा निश्चय जेव्हा सिद्ध होतो तेव्हाच भगवंत स्वतला त्या प्रेमदोरीनं बांधून घेतो, हेदेखील खरं! भक्त प्रल्हादाचं चरित्र आठवा. साक्षात पित्यानं डोंगरावरून कडेलोट करण्यापर्यंत आज्ञा दिल्या तरी त्यानं हरिचरण सोडले नाहीत. अनेक भक्तांच्या चरित्रातही असे अनेक प्रसंग आहेत जे भक्तीप्रेमाचं दिव्य दर्शन घडवतात.