06 July 2020

News Flash

१९६. भावबळ

भक्ताच्या भावबळासमोर त्याचं बळच कमी पडतं! माउलीदेखील म्हणतात ना? ‘भावबळें आकळे येरवी ना कळे’!

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम

माणूस एखादी कल्पना करतो आणि त्या कल्पनेत असा गुंततो, की ती कल्पनाच मोठी होऊन माणसावर ताबा मिळवते! हे उदाहरण चपखल नाही, तरी ते भगवंत आणि भक्तामधील प्रेमबंधाला लागू होतं. म्हणजे हे समस्त चराचर भगवंतानं निर्माण केलं. त्यातला हा माणूसदेखील भगवंतानंच निर्माण केला. त्या माणसाच्या हृदयात भक्तिप्रेमाचं बीज त्या भगवंतानंच पेरलं, जोपासलं आणि आता त्या प्रेमानं तोच बांधला गेला आहे! भगवंत एवढा सामर्थ्यवान असताना एका भक्ताच्या प्रेमात कसा आबद्ध होतो, असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांना हरी नारायण अनेक रूपकांद्वारे उत्तरं देतात. ते म्हणतात, ‘‘भगवंत महा अतुर्बळी। अदट दैत्यांतें निर्दळी। तो कोंडिला हृदयकमळीं। हे गोष्टी समूळीं मिथ्या म्हणती॥ ७८२॥ जो शुष्क काष्ठ स्वयें कोरी। तो कोंवळ्या कमळामाझारीं। भ्रमर गुंतला प्रीतीवरी। केसर माझारीं कुचंबो नेदी॥ ७८३॥ तेवीं भक्ताचिया प्रेमप्रीतीं। हृदयीं कोंडिला श्रीपती। तेथ खुंटल्या सामर्थ्यशक्ती। भावार्थाप्रती बळ न चले॥ ७८४॥’’ ज्या भगवंताच्या बळाची तुलनाच होऊ शकत नाही, ज्यानं अनेक उग्र अशा दैत्यांचाही संहार केला आहे तो एखाद्या भक्ताच्या हृदयात बद्ध होतो, त्या भक्तासमोर जणू सामर्थ्यहीन होतो, हे अनेकांना मिथ्या वाटेल; पण जो भुंगा कोरडं लाकूड सहज पोखरतो तो कोवळ्या कमळात अडकतो. त्या कोमल पाकळ्यांच्या प्रेमामुळे त्याला त्या पाकळ्या चिरणं साधत नाही. त्याप्रमाणेच हा शक्तिमान परमात्मा भक्ताच्या प्रेमाच्या अधीन होतो. भक्ताच्या भावबळासमोर त्याचं बळच कमी पडतं! माउलीदेखील म्हणतात ना? ‘भावबळें आकळे येरवी ना कळे’! तो परमात्मा केवळ भावबळानंच जाणिवेच्या कक्षेत येऊ शकतो; अन्य कोणत्याही उपायानं नाही. तसंच केवळ भावबळानं तो भक्ताच्या प्रेमभावात स्वत:हून सहजस्थित होतो. मग नाथ म्हणतात, ‘‘बाळ पालवीं घाली पिळा। तेणें बाप राहे धोकला। तरी काय तो निर्बळ जाहला। ना तो स्नेहें भुलला ढळेना॥ ७८५॥’’ लहान मूल बापाच्या वस्त्राला पिळा घालतं, त्याच्या पायांना मिठी घालतं आणि बाप थबकतो, ते त्याची शक्ती कमी पडते म्हणून नव्हे! तर, मुलाच्या प्रेमातली शक्ती अधिक भरते त्यामुळे! तसाच लहान मुलाप्रमाणे ज्याचं अंत:करण निरागस आणि निष्पाप झालं आहे, अशा निरहंकारी भक्ताच्या प्रेमाची ताकद अवर्णनीयच असते. म्हणूनच तर, ‘‘तेवीं निजभक्त लळेवाड। त्याचें प्रेम अत्यंत गोड। निघावयाची विसरोनि चाड। हृदयीं सुरवाड हरि मानी॥ ७८६॥’’ निजभक्तांचं प्रेम अतिशय गोड असतं आणि त्यामुळे भक्तहृदयातून बाहेर पडायचं स्मरणच हरीला उरत नाही. नव्हे, तो त्या हृदयातच पूर्ण विसावतो! मग नाथ सांगतात की, याप्रमाणे ज्याचं अंत:करण घडतं, त्याला हरी कधीच सोडीत नाही आणि तोदेखील हरीचे चरण सोडीत नाही. (‘‘ऐसें ज्याचें अंत:करण। हरि न सांडी स्वयें आपण। तसेचि हरीचे श्रीचरण। जो सांडीना पूर्ण प्रेमभावें॥ ७८७॥’’)

हे सारं घडतं त्याची सुरुवात होते ती हरीच्या साध्याशा भासत असलेल्या नामस्मरणानं! नामाचा संग जसजसा वाढत जाईल, तसतसं नामबळानं भावबळच सहज उमलू लागेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 2:11 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 196 zws 70
Next Stories
1 तत्त्वबोध : जीवनाभ्यास
2 १९५. प्रेमप्रीतीची दोरी
3 १९४. प्रपंचशुद्धी
Just Now!
X