चैतन्य प्रेम

एका भगवंतावाचून जाणण्यासारखं या जगात शाश्वत काही नाही, हे ज्ञान ज्या भक्ताला झालं आहे, तो खरा ज्ञानी भक्त आहे.

आता इथं दोन प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न असा, की भगवंत म्हणजे काय? दुसरा प्रश्न असा की, भगवंताला जाणणं म्हणजे काय आणि तो जाणण्याचा मार्ग कोणता?

आपण तत्त्वज्ञानाच्या महासागरात न शिरता अगदी थोडक्यात या प्रश्नांचा विचार करू. भगवंत म्हणजे काय, हे शब्दांनी सांगता येत नाही. रामकृष्ण परमहंस तर म्हणत की, ‘‘ईश्वराला जाणणं काय सोपी गोष्ट आहे का? ज्यांनी त्याला जाणलं ते त्याच्यातच विलीन झाले. मिठाची बाहुली समुद्र मापायला गेली आणि त्यातच विरघळली!’’ याचाच अर्थ ‘भगवंत’ किंवा ‘ईश्वर’ ही शब्दांत सांगता येणारी गोष्ट नाही. मग जी गोष्ट अनुभवाची नाही तिच्यावाचून जाणण्यासारखी, विसंबण्यासारखी, शाश्वत, सत्य अशी दुसरी गोष्ट नाही आणि जे जग अनुभवाच्या कक्षेत आहे त्या जगाला अर्थ नाही, हे कसं पटावं? बरं हे जग म्हणजे तरी काय हो?

तर मागेच सांगितल्याप्रमाणे विश्वाचा अफाट पसारा, चराचरातली लोकसंख्या, नाना प्रदेश हे जरी या दृश्य जगातच मोडत असले, तरी ‘आपलं’ जग हे फार छोटंच असतं. आपल्या नात्यागोत्यातल्या, परिचयातल्या माणसांनी ते आपल्याभोवती फेर धरून असतं. समाजातील ज्या बदलांचा, चढउतारांचा या ‘आपल्या’ जगावर परिणाम होत असतो तेवढय़ा बाह्य जगातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक गोष्टींना ‘आपल्या’ जगात स्थान आणि महत्त्व असतं. फार थोडय़ा लोकांचं जग हे ‘मी’पणाचा स्वाहा करून इतरांच्या सुखासाठी प्रयत्नरत राहण्याचं ठिकाण असतं. बाकी ज्याचं-त्याचं जग हे ज्याच्या-त्याच्यापुरतंच असतं. तर या ‘आपल्या’ आणि आपल्या परिघाबाहेर असलेल्या जगाला खरा अर्थ नाही; पण विलक्षण गोष्ट अशी की, जगाचं फसवं रूप कुणी सांगून पटत नाही, पण त्या जगावरच पूर्णपणे विसंबू लागलो की अनुभवानं ते उमगू लागतं! आता जगाचं फसवं रूप म्हणजे जग फसवणारं असतं, असं नव्हे. तर त्या जगाकडून आम्ही ज्या अपेक्षा ठेवतो त्या फसवत असतात. त्या जगाला ज्या ‘मी’केंद्रित चष्म्यातून आम्ही पाहत असतो, तो चष्मा फसवत असतो. ज्याला हे जितक्या तीव्रतेनं जाणवतं त्यालाच मग प्रश्न पडतो, की जग जर खरं नाही, मिथ्या म्हणजे सतत बदलणारं आहे, तर या जगात खरं म्हणून काही आहे की नाही? या जगात किंवा जगापलीकडे काही न बदलणारं, शाश्वत असं काही नाही का?

संत या प्रश्नाचं उत्तर देतात की, होय एक भगवंतच खरा अखंड शाश्वत आहे! हा भगवंत नेमका आहे कसा, हे ते सांगत नाहीत. याचं कारण तो सर्वव्यापी परमात्मा कोणत्याही एका साच्यात बसणारा नाही, एकाच चौकटीत सामावणारा नाही. पण ‘श्रीकृष्णचरितायन’ या ग्रंथात म्हटलं आहे की, ‘‘जो प्रभु अलख अगुन निरलेपू।।

भएउ सगुन लख जन सुख लेपू।।’’

म्हणजे तो सर्वव्यापी विराट व्यापक अनादी अनंत निर्गुण गुणातीत परमात्मा आपल्या भक्तासाठी सगुण रूपातही प्रकटू शकतो.

‘‘निजानन्दमय परम स्वतंत्रा।।

सोइ प्रभु होत स्वजन परतंत्रा।।’’

स्वानंदात निमग्न परम स्वतंत्र असा हा परमात्मा आपल्या भक्तांच्या अधीन होऊन परतंत्रही होऊ  शकतो!