चैतन्य प्रेम

परम स्वतंत्र असा परमात्मा आपल्या भक्तांच्या अधीन होऊन परतंत्रही होऊ शकतो! जसं बालकृष्णाला बांधायला यशोदेला दोरी कमी पडू लागली, पण शरणागत प्रेमभाव उचंबळून येताच अगदी लहानशा दोरीनंही बालरूपातील प्रभूनं स्वतला बांधून घेतलं! (निजानन्दमय परम स्वतंत्रा॥ सोइ प्रभु होत स्वजन परतंत्रा॥). तो प्रभू कसा आहे? ‘श्रीकृष्ण चरितायन’मध्ये म्हटलं आहे की, ‘नित्य तृपित पूरन निष्कामा॥ भे अतृप्त जन प्रेम सकामा॥’ तो भगवंत नित्यतृप्त आहे, निष्काम आहे, पण भक्तांच्या प्रेमाची पुष्टी करण्यासाठी तो अतृप्त आणि सकाम होतो. जसं दही-लोण्यासाठी अतृप्त असल्याचं बालकृष्णांनी दाखवलं आणि गोप-गोपींच्या घरातलं दही चोरूनदेखील खाल्लं! ‘श्रीकृष्ण चरितायन’ ग्रंथातच म्हटलं आहे की, एकदा बालकृष्ण यशोदेकडे लोण्यासाठी हट्ट करीत होता आणि यशोदा त्याला ते देत नव्हती. मधुराधिपती म्हणजे जणू माधुर्याचा अधिपती अशा कृष्णाचं ते बालरूप किती मोहक असेल, कल्पना करा! तर कृष्णाचा तो रुसवा पाहून तिथं उभ्या असलेल्या गवळणींना वाटलं की, माझ्याही घरी दही-लोणी आहेच. ते या बालगोिवदाला खाऊ घातलं तर किती आनंद वाटेल मला! पण कृष्ण आमचा राजा नंदाचा पुत्र आहे. आम्हासारख्या गरीब जनांच्या घरी त्याला कसं बोलवावं? भगवंतानं हा भाव ओळखून ‘माखनचोर’ हे बिरुदसुद्धा भक्तप्रेमापोटी स्वीकारलं. त्या चोरीच्या लटक्या तक्रारी मग गवळणींनी यशोदेकडे सुरू केल्या. अगदी उंचावर बांधलेले दह्य़ा-लोण्याचे घटही बालकृष्ण फोडतो, हा निरोप जणू अन्य गवळणींपर्यंत पोहोचवण्याचा हा मार्ग! म्हणजे हृदयघटात साठवलेलं प्रेम भगवंत हक्कानं चोरतो, याचं हे सूचन. मग कंसाच्या मथुरेच्या बाजारात लोणी विकायला जात असलेल्या गवळणींची मडकी फोडण्यापर्यंतचे अनेक उपद्व्यापही भगवंतानं मोठय़ा आनंदानं केले. हृदयातील शुद्ध प्रेमभाव जगाच्या बाजारात ओतू नका, तो मला परत करा, हा त्याचा मधुर अर्थ! तेव्हा जो ब्रह्माण्डाचा स्वामी आहे तो तुच्छ जिवाच्या अंतरंगातला प्रेमभाव तेवढा पाहतो आणि स्वतकडे लहानपणा घेत तो स्वीकारतो. पण जिथं वस्तूवर प्रेम असतं, ती तो स्वीकारत नाही बरं का! एक सत्पुरुष  संध्याकाळी फेरफटका मारायला बाहेर पडत. एकदा वाटेत एक शिष्य भेटला आणि त्यानं घरी येण्याचा आग्रह केला. ते कुणाच्या घरी काही घेत नसत. त्यामुळे त्या शिष्यानं पत्नीला दूध आणायला सांगितलं. तिनं दूध आणलं, पण महाराजांनी हातात कप घेतला आणि दुधावर एक दृष्टी टाकत ते म्हणाले, ‘‘दूध नको मला.’’ शिष्यानं काहीशा अचंबित, पण दुखी स्वरात कारण विचारलं. त्यावर ते उद्गारले, ‘‘यात ‘स्सऽऽ’ पडला आहे!’’ शिष्याच्या पत्नीचा चेहरा पडला. कारण कपात दूध ओतताना दुधाबरोबर पटकन थोडी सायही पडली होती आणि तिच्या तोंडून हा खंत भरलेला ‘स्सऽऽ’ पडला होता! तेव्हा ज्यात माझा जीव अडकला आहे त्या वस्तूचा स्वीकार भगवंत प्रथम करीत नाही. त्या वस्तूचा मानसिक पातळीवर मी त्याग कधी करतो, याची वाट तो पाहत असतो. पण आधीच म्हटलं ना, की त्याला कोणत्याही एका साच्यात, चौकटीत बंदिस्त करता येत नाही! ज्याला पूर्ण आपलंसं करायचं आहे, पण ज्याचा जीव भौतिकातील वस्तुमात्रात अडकला आहे, तर ती वस्तू तो येनकेनप्रकारे ताब्यात घेतोच! शेवटी भक्तालाच भगवंताची गरज असते असं नव्हे, तर भगवंतालाही भक्ताची ओढ असते. भगवंत भेटावा, यासाठी भक्त तळमळतो तसाच खरा भक्त भेटावा, यासाठी भगवंतसुद्धा अठ्ठावीस युगं विटेवर उभं राहायला तयार असतो!