चैतन्य प्रेम

सर्वव्यापी व सर्व अस्तित्वाचा आधार असलेल्या अमूर्त ब्रह्माला वा परम तत्त्वाला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव होते, तेव्हा ते मूर्त स्वरूपात प्रकटते. त्यालाच भगवंत म्हणतात. सर्वव्यापी, सर्वात्मक आणि सर्वाधार असलेला हा भगवंत परम परिपूर्ण आहे. हा भगवंत चैतन्यस्वरूप असून प्रत्येक जीवमात्रही त्याच चैतन्यशक्तीच्या आधारावर जगत आहे. आता एकच चैतन्यशक्ती अनंत आकार-प्रकारांतील जीवसृष्टीचा आधार कशी, हे समजून घेणं कठीण नाही. ज्या हवेत आणि ज्या वातावरणात मानव प्राणवायू घेत जगतो, त्याच हवेतून लहानशा किडय़ापासून अजस्र प्राण्यापर्यंत सर्वच प्राणवायूच्या आधारावर जगत असतात. तेव्हा एकच चैतन्यतत्त्व हे या चराचराचा आधार आहे. तत्त्वज्ञान यापुढे एक पाऊल टाकतं आणि सांगतं की, चैतन्य तत्त्व हे समस्त चराचराच्या अस्तित्वाचा आधारच आहे एवढंच नव्हे, तर प्रत्येक जीवमात्रात ते एकच परम परिपूर्ण तत्त्व भरूनही आहे! त्या पूर्णत्वाचाच अंश असलेला जीव हा स्वत:ला एका देहरूपात मर्यादित करून घेत असल्यानं अपूर्णत्व अनुभवत आहे. विराट जलाशयातील पाण्याच्या तरंगानं स्वत:ला पाण्यापासून वेगळं मानून आपलं अस्तित्व अखंड टिकविण्याची धडपड करण्यासारखंच हे आहे! ही जी अखंड अस्तित्वाची ओढ माणसात आहे, तीच त्याला परम तत्त्वाच्या शोधासाठी प्रेरित करते. स्वत:वर अपूर्णत्व आरोपित केलेल्या समस्त चराचरातील जीवमात्रांची म्हणूनच पूर्णत्वाकडेच वाटचाल सुरू आहे. मन, चित्त, बुद्धी व अस्तित्वभान असलेला माणूस या चराचरात त्याच्या क्षमतांमुळे वेगळा आहे. त्याला स्वत:तील अपूर्णत्वाची जाणीव स्वस्थ बसू देत नाही. पूर्णत्वाची त्याला ओढ आहे. पूर्ण ज्ञान, पूर्ण आनंद, पूर्ण सुखाची त्याच्यातील ओढच तो मुळात पूर्णच आहे आणि संकुचित ‘मी’भावाच्या सत्तेनं अपूर्णत्वात जखडून आहे, हे सूचित करते. त्याला पूर्णत्वाची, पूर्ण आधाराची गरज जगताना भासत असते. या पूर्णत्वाची खूण म्हणजे भगवंत, ईश्वर वा परमात्मा! हा परमात्मा अमूर्त, निराकार असला तर माणसाच्या जाणिवेच्या कक्षेत तो सहजतेनं येत नाही किंवा आला तरी तो समजत नाही! त्यामुळे माणसाला विसंबण्यासाठी सगुण/ साकाराचा आधार लागतो. त्या आधारावर जो भाव विकसित होतो, जे प्रेम निर्माण होतं, त्या भावनेला आकार नसतो. म्हणजेच साकार रूपातून निराकार सूक्ष्म परम तत्त्वाकडेच साधकाची वाटचाल होत असते आणि त्या निराकारातही साकाराचं कृतज्ञ प्रेमऋण फिटलेलं नसतं, असं हे मोठं मधुर रहस्य आहे! कृष्ण मथुरेला गेले तेव्हा किती तरी वर्ष गोपगोपी त्यांच्या प्रेमभावातच निमग्न होते. त्यांना जिथं तिथं कान्हाच दिसत होता; पण प्रत्यक्ष कृष्ण दिसावा, ही आस संपलेली नव्हती. कृष्ण हाच साक्षात परमात्मा आहे, हा त्यांचा भाव होता. कृष्णरूपापुढे परम तत्त्वाच्या शाब्दिक ज्ञानाची मातब्बरी नव्हती! मानवी मनावर साकाराचाच प्रभाव आहे आणि म्हणूनच निराकार परमात्मा युगानुयुगं सगुण रूपात साकार होत आला आहे.