चैतन्य प्रेम

माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत या जगातच वावरतो. जग दृश्य म्हणजे दिसणारं असल्यानं, अनुभवता येत असल्यानं, स्पर्शिता येत असल्यानं ते खरं आहे, हे आपलं ठाम मत असतं. हे जगच सुखाचा आधार असतं आणि या जगातच दु:खही भोगावं लागतं. त्यामुळे हे जग सदोदित आपल्या मनानुकूल असावं, अशी आपली धडपड असते. आणि मागेच सांगितल्याप्रमाणे, जगातला प्रत्येकजण ‘मी’केंद्रित जगत असल्यानं हे जग कधीच कायमचं कुणा एकाच्या मनानुकूल राहू शकत नाही. ते थोडसं जरी प्रतिकूल झालं, तरी आपण दु:खभावनेनं पछाडतो आणि कल्पनेनं ते दु:ख वाढवत जातो. त्यामुळे संत सांगतात की जग हे द्वैतमय असल्यानं ते कधीच पूर्ण सुखरूप भासत नाही. त्यासाठी पूर्ण सुखाचा जो आधार आहे, त्या भगवंताचं झालं पाहिजे. जे स्वत:च अस्थिर आहे, त्या जगाच्या आधारानं मन स्थिर राहू शकत नाही. त्यासाठी जो स्वत: स्थिर आहे, स्व-स्थ आहे त्या भगवंताचं झालं पाहिजे. पण मग मनात स्वाभाविक प्रश्न येतो की, भगवंताचं होणं म्हणजे काय आणि ते कसं व्हायचं?

त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे मनाला जगाचा जो आधार वाटतो त्या आधाराचा सच्चेपणा तपासला पाहिजे. त्या जगातलं आपलं गुंतणं तपासलं पाहिजे. त्या गुंतण्यामागची कारणं तपासली पाहिजेत. आपल्याच मनातला सुप्त मोह, लोकस्तुतीची आवड वगैरे काय कारणं आहेत, ती अगदी बारकाईनं जाणली पाहिजेत. मग लक्षात येईल की जग आपल्याला खरं सुख देत नाही की दु:खही देत नाही. त्या जगाला आपण जे मोल देतो, महत्त्व देतो त्यामुळेच त्या प्रमाणात जगाचं सत्यत्व वाढलं आहे. त्या जगाकडून ज्या अपेक्षा बाळगतो त्या पूर्ण होण्या वा न होण्यावर आपलं सुख-दु:ख अवलंबून असतं.

या अनुषंगानं स्वामी नित्यबोधानंद तीर्थ यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. एका माणसाला एकदा रस्त्यातून चालताना एक चकाकता दगड दिसला. हा अस्सल हिराच आहे, असं मानून त्यानं तो अगदी सांभाळून ठेवला. जवाहिऱ्याला तो विकून बरेच पैसे मिळतील, अशी स्वप्नं तो रंगवू लागला. मग किती पैसे मिळाले, तर काय काय करायणं, याचे मनसुबेही तयार झाले. दोन-तीन दिवस प्राणपणानं तो हिरा त्यानं जपला आणि मग उत्तम जवाहिऱ्याकडे तो घेऊन गेला. जवाहिर उत्तम पारखी होता. त्यानं काहीच क्षणांत सांगितलं की, हा हिरा नसून निव्वळ दगड आहे! त्या माणसाला मोठा धक्का बसला. दुकानाबाहेर येताच तो दगड त्यानं दु:खातिरेकानं फेकून दिला. म्हणजे ज्या दगडाला त्यानं प्राणासारखं जपलं होतं तो खोटा असल्याचं कळताच त्याला क्षणार्धात फेकूनही दिलं!

ही कथा सांगून स्वामी प्रश्न करतात की, त्या माणसाला झालेलं दु:खं काय त्या दगडानं दिलं का? तर नाही! त्या दगडाला हिरा मानण्याच्या चुकीमुळेच हे दु:खं वाटय़ाला आलं होतं. अगदी त्याचप्रमाणे जग दु:ख देत नाही, तर जगाबद्दलच्या आपल्या मनातल्या कल्पना आणि जगाकडून आपण बाळगत असलेल्या अपेक्षाच दु:खाला कारणीभूत होत असतात. मग त्या माणसाला जसा हिऱ्याचा खोटेपणा समजला आणि त्यानं तो ‘हिरा’ सहज फेकून दिला, तसं जगाचं मिथ्यत्व म्हणजे खोटं रूप उमगूनही आपण त्या दगडाप्रमाणे जगाला झिडकारू का शकत नाही? कारण त्या जगाचा प्रभाव फार खोलवर आहे आणि आज ना उद्या जग माझ्या मनाजोगतं होईलच, हा भ्रम सुटत नाही!