चैतन्य प्रेम

सद्गुरूंनी एका साधकाला पहिल्याच भेटीत विचारलं होतं, ‘‘तुम्ही कोण?’’ या प्रश्नाचं उत्तर म्हणून अगदी सवयीनं त्यानं त्याचं नाव सांगितलं. समजा ‘केशव’. सद्गुरूंनी ओघानं विचारलं,  ‘‘केशव तुम्ही साठ वर्षांपूर्वी कुठे होतात?’’ तो निरुत्तर झाला. मग म्हणाला, ‘‘माहीत नाही.’’ त्यांनी विचारलं, ‘‘साठ वर्षांनी कुठे असाल?’’ त्यानं गोंधळून सांगितलं, ‘‘तेसुद्धा माहीत नाही.’’ मग गुरुजी हसून म्हणाले, ‘‘मग या मधल्या साठ वर्षांत मी म्हणजे ‘केशव’ असं मानून जे घट्ट धरून आहात ना, ते विसरायचं; एवढंच अध्यात्म आहे! आणि हो, जगासमोर विसरू नका, जगासमोर केशव म्हणूनच वावरा, जे काम करीत असाल तेच करीत राहा, जबाबदाऱ्या आणि कर्तव्यं पार पाडा; पण हे सारं करीत असताना, मी या जन्मापुरता ‘केशव’ आहे, हे लक्षात ठेवा. गेल्या जन्मी तुम्ही कोण होतात, हे माहीत नाही. पुढील जन्मी कोण असाल-कुठे असाल, हे माहीत नाही. पण निदान हा जन्म तरी खऱ्या अर्थानं सार्थकी लावा!’’ तेव्हा आपण असं जन्मापासून आपली जी ओळख झाली आहे, तिच्यात अडकून असतो. त्या ओळखीपलीकडेही आपलं काही अस्तित्व आहे, याचं भानच आपल्याला कधी येत नाही. हे भान सद्गुरू आणतात. कर्तव्यं पार पाडा; पण चिंतेचं ओझं नाहक का वाहता? चिंता करून परिस्थिती बदलते का? त्यापेक्षा सकारात्मक विचार आणि चिंतन करून त्या परिस्थितीच्या प्रभावापासून दूर राहता येतं, हे ते शिकवतात आणि तसं करवूनही घेतात. तेव्हा त्या हरिबोधानुसार, त्या हरिपाठानुसार आपलं जीवन घडवणं म्हणजेच देवाचं होणं, भगवंताचं होणं आहे, व्यापक होणं आहे. तेव्हा समस्त चराचर ज्या एका चैतन्य शक्तीच्या आधारावर जगत आहे, ती व्यापक शक्ती म्हणजे भगवंत आहे. आपण संकुचिताच्या जाळ्यातून सुटून मनानं व्यापक होत जाणं म्हणजे भगवंताचं होत जाणं आहे आणि भगवंताचं होण्याचा हा मार्ग म्हणजे सद्गुरू बोधानुसार जीवन घडवणं, हाच आहे! अशा हरी-भक्तांचीच महती गाताना हरी नारायण राजा जनकाला सांगतो, ‘‘ऐसे जे हरिचरणीं अनन्य। तेचि भक्तांमाजीं प्रधान। वैष्णवांत ते अग्रगण। राया ते जाण ‘भागवतोत्तम’।। ७८९।।’’ हे राजा, असे जे हरिचरणी अनन्य असतात, म्हणजे सद्गुरूबोधानुरूप जगण्यावाचून अन्य जगण्यातली त्यांची गोडीच संपलेली असते ना, ते भौतिकाच्या प्रभावापासून विभक्त आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं भक्त आहेत! तेच वैष्णवांमध्ये अग्रगण्य आहेत.. भागवतोत्तम आहेत! ही जी हरी-भक्त प्रेमाची एकरसता आहे ना, ती तुकाराम महाराजांनी एका अभंगात फार मनोज्ञपणे मांडली आहे. ते म्हणतात, हरीचं झाल्यानं जीवनाचं बाह्य़ रूप बदलत नाही, पण आंतरिक रूप पूर्णत: पालटलेलं असतं! आधी माझ्या अंत:करणाच्या डोहात दु:खाच्या लाटा उसळत होत्या, आता त्याच डोहात आनंदाचे तरंग उमटत आहेत. आधीच्या जीवनात सुखाला दु:खाचं अंग होतं, सुखापाठोपाठ दु:खं येत होतं; पण आता आनंदाला आनंदाचंच अंग आहे. आनंदाशिवाय जगण्यात दुसरं काही नाही. (आनंदाचे डोही, आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदासि।।) या हरीमयतेनं काय सांगू! अहो, काहीच्या बाहीच झालं! भौतिकात आवडीनं पुढे जाण्याची चालच खुंटली, त्या चालण्यातली गोडीच संपली (काय सांगो झाले काहीचियाबाहीं। पुढे चाली नाही आवडीने।।)!