एकनाथ महाराज संतसज्जनांची अर्थात सद्गुरूंची ओळख सांगतात ती अशी की, ‘‘सूर्य सदा प्रकाशमान। अग्नि सदा देदीप्यमान। तैसे संत सदा सावधान!’’ सूर्य आहे आणि तो प्रकाशमान नाही, हे शक्यच नाही. सूर्य आहे म्हणजे प्रकाश आहेच. आग आहे तर ती प्रदीप्त असलीच पाहिजे. तसा जो संत आहे तो सावधान असलाच पाहिजे. अखंड सावधानता. ही सावधानता आहे जीवहितासाठीची. जिवाकडून त्याच्या आत्महिताला घातक असं जर कुठलं कृत्य घडत असेल, तर सद्गुरू त्या कृत्याकडे किंचितही दुर्लक्ष करीत नाहीत. नाथ सांगतात की, या सद्गुरूंनीच मला एकवेळ आज्ञा केली.. ‘‘तंव संतसज्जनीं एक वेळां। थोर करूनियां सोहळा। आज्ञापिलें वेळोवेळां। ग्रंथ करविला प्राकृत।। ५७।।’’ मी प्राकृत भाषेत ग्रंथ करावा, अशी त्यांनी आज्ञा केली. कोणता ग्रंथ लिहावा, असा प्रश्न मी करता त्यांनी सांगितले की पुराणांमध्ये श्रीमद्भागवतमहापुराण श्रेष्ठ आहे. त्या ग्रंथात जी उद्धवगीता आहे, ती अतिशय श्रेष्ठ आहे. ती तू प्राकृतात आण! त्यासाठी ‘वक्ता भगवंत’च तुझा साह्य़कर्ता आहे. अर्थात भगवंतच तुझ्या माध्यमातून त्या उद्धवगीतेचं प्राकृतात आख्यान गाणार आहे, तुला फक्त लेखणी घेऊन बसायचं आहे! सद्गुरूंची ही ग्रंथलेखनाची आज्ञा ऐकताच मेघांच्या गर्जनेनं मोर जसा मोहरावा, मेघांतून जलधारा कोसळू लागताच चातक जसा तृप्त व्हावा आणि चंद्राच्या किरणांनी चकोर जसा आनंदावा तशी माझी अवस्था झाली, असं नाथ सांगतात. मग ते विनवतात की, ‘‘हे सद्गुरो, एक मात्र करा. अखेपर्यंत माझ्यावर कृपादृष्टी ठेवा. त्यानंच हे कार्य शेवटास जाईल!’’ (परी तुम्हीं एक करावें। अखंड अवधान मज द्यावें। तेणें दिठिवेनि आघवें। पावेल स्वभावें निजसिद्धी।। ६७।।). त्यावर सद्गुरू जनार्दन स्वामी सांगतात, ‘‘अरे, आता तुझ्या मनात आम्ही आमचं मन मिसळलं आहे आणि तुझ्या शब्दांत अनुसंधान ठेवले आहे. त्यामुळे प्रतिपादन वेगानं सुरू कर.’’ (अगा तुझिया मनामाजीं मन। शब्दीं ठेविलेंसे अनुसंधान। यालागीं निजनिरूपण। चालवीं जाण सवेगें।। ६८।।). यानंतर कुळदेवतेला नाथ वंदन करतात आणि सद्गुरूंशी एकरूप झालेल्या एकनाथांची जी कुळदेवता आहे, कुळाची आद्यशक्ती आहे तिचंही नाव आहे एकवीरा! त्यामुळे या एकपणावर, ऐक्यतेवरच या वंदनेत भर आहे. नाथ म्हणतात, ‘‘आतां वंदूं कुळदेवता। जे एकाएकी एकनाथा। ते एकीवांचून सर्वथा। आणिक कथा करूं नेदी।। ६९।। एक रूप दाविलें मनीं। तंव एकचि दिसे जनीं वनीं। एकचि कानीं वदनीं। एकपणीं ‘एकवीरा’।।७०।।’’ यातला ‘एकाएकी एकनाथा’ ही शब्दयोजना फार मनोज्ञ आहे. एका सद्गुरूशी ऐक्य पावलेल्या एकनाथावर या एकवीरेची कृपादृष्टी आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्या आदिशक्तीच्या कृपेनं माझ्या अंतरंगात सद्गुरूंचं महत्त्व आणि माहात्म्य प्रथम बिंबलं. त्या प्रज्ञेनं माझ्या अंत:करणात ते एक रूप ठसवलं. मग तेच रूप चराचरात आहे, हे दाखवलं. आता ‘एकचि कानीं वदनीं’ ही शब्दयोजनाही अशीच मार्मिक आहे. कान आणि वदन ही रूपकं आहेत. म्हणजे जे आजवर सद्गुरूंबद्दल ऐकलं होतं, तसंच त्यांच्या विराट व्यक्तित्वाचं दर्शन झालं आणि विकारशरण झालेल्या, विकारांच्या गुलामीत जखडलेल्या या जगात जो एकमात्र वीर आहे, त्या एका सद्गुरूशी त्या आदिशक्तीनं, आत्मशक्तीनं माझं ऐक्य घडवून आणलं!

चैतन्य प्रेम