खरं पाहता हरिकथेचं म्हणजेच श्रीकृष्ण लीलाचरित्राचं निरूपण आता सुरू होत आहे आणि म्हणूनच ते निरूपण सुरू करण्याआधी एकनाथांनी हरिकथा श्रवणाचं महत्त्व आणि कुणाला त्या श्रवणाचा खरा लाभ प्राप्त होतो, ते जाणीवपूर्वक सांगितलं आहे. मग कृष्णाच्या कृपाछत्रछायेखाली निवास करणाऱ्या यादवांचा कुलक्षय करण्याच्या दिशेनं पावलं टाकली. त्यानं पहिली गोष्ट केली ती अशी की आपल्या सहवासात राहात असलेल्या ऋषीमुनींना त्यानं तीर्थाटणाला पाठवून दिलं. त्यानं नारदांसह सर्वच ऋषीवरांना बोलावलं आणि पिंडारकाच्या यात्रेला जाण्यास सांगितलं. खरं पाहता हे मुनीवर आपापल्या आश्रमाला जाणारच होते, पण मग त्यातला एखादा द्वारकेला अचानक येऊही शकत होता! तो धोका टाळण्यासाठी सगळ्यांनाच एकाच जागी म्हणजे अगदी दूरच्या तीर्थक्षेत्री कृष्णानं पाठवून दिलं. यामागे मोठं मर्म होतं.

एकनाथ महाराज सांगतात, ‘‘ज्यांपासूनि संत दूरी गेले। तेथें अनर्थाचें केलें चाले। हें यादवनिधनालागीं वहिलें। लाघव केलें श्रीकृष्णें।। ३१५।।’’ ज्यांच्यापासून संत दूर जातात तिथं अनर्थ ओढवतो. कारण संत जोवर जवळ असतात तोवर अज्ञान, मोह, भ्रम जवळ फिरकू शकत नाहीत. त्यांचा प्रभाव पडू शकत नाही. अवधान टिकून राहातं. पण संत दूर जाताच अज्ञान, मोह, भ्रमाचा प्रभाव वाढतो आणि आपण त्यांच्या पकडीत अलगद सापडतो. तेव्हा संत जोवर द्वारकेत आहेत तोवर यादवांचं डोकं ठिकाणावर राहील आणि मग त्यांच्या विनाशाचा उपाय काही प्रत्यक्षात येऊ शकणार नाही, हे कृष्ण जाणून होता. कारण, ‘‘जेथें संतांचा समुदावो। तेथें जन्ममरणां अभावो।’’ जिथं संतांचा समुदाय असतो तिथं जन्म-मरण या चक्राचा अभाव असतो. म्हणजे जन्म आणि मृत्यूचं चक्र ज्या वासनात्मक ओढीतून सुरू राहातं, त्याचा विराम घडतो. त्यामुळे श्रीकृष्णानं सर्व ऋषीमुनींना यात्रेकरिता पाठवलं. त्या ऋषींची नावं आणि त्यांचं माहात्म्य नाथांनी नमूद केलं आहे. त्यात प्रतिसृष्टी निर्माण करण्याची शक्ती लाभलेले विश्वामित्र, निर्द्वद्व असे असित मुनी, सूर्याच्या अश्वाला वेदमंत्र ऐकविणारे कण्व मुनी, दुर्वास ऋषी, ज्यांचा लत्ताप्रहार भगवंतानं आपल्या छातीवर प्रेमखूण म्हणून धारण केला ते भृगू ऋषी, ज्यांच्या पोटी देवगुरू बृहस्पती जन्मले तो अंगिराऋषी, सर्वात्मक असा कश्यपऋषी, अत्रि ऋषी, प्रभू रामांचे गुरू वसिष्ठ ऋषी आणि भक्तीज्ञानाचे उद्गाते नारद मुनी असे अनेकानेक ऋषीमुनी पिंडारकाच्या यात्रेला गेले.. आणि मग तो प्रसंग घडला! जेव्हा द्वारकेतून स्वत: कृष्ण बाहेर पडले आणि सर्व ऋषीमुनी बाहेर पडले, तेव्हा आधीच शक्तीसंपन्नतेनं बाहु फुरफुरणाऱ्या तरुण यादवांना जणू मोकळं रान मिळालं. कुणाचाही अंकुश न उरल्यानं जणू ‘नवस्वातंत्र्य’ भोगत असलेल्या या यदुतरुणांचं मन अनिर्बंध आणि स्वैर झालं होतं. त्यात ते नदीकाठी कंदुक खेळू लागले. त्यांची मनस्थिती कशी होती? एकनाथ महाराज सांगतात, ‘‘ऐसे नाना क्रीडाविहार। करीत आले यदुकुमार। अंगीं श्रीमद अपार। औद्धत्यें थोर उन्मत्त।। ३४४।।’’ मनाच्या उन्मत्त स्थितीत या यदुकुमारांच्या मनात, जे कुणी तपस्वी मागे थांबले होते, त्यांची खिल्ली उडवायची इच्छा उत्पन्न झाली.