चैतन्य प्रेम

सद्गुरूंचा उल्लेख होताच एकनाथ महाराजांचा भाव जागा होणं अगदी स्वाभाविक. त्याच भावधारेत प्रवाहित होत ते म्हणतात की, हा जनार्दन माझी निजात्ममाय आहे! पण माय म्हणून त्याच्याकडे पाहू लागावं तर त्याचं बापपणही दिसू लागतं! जगात आई आणि बाप हे दोन स्वतंत्र असतात, पण इथं सद्गुरूरूपात मायबापपण एकवटलं आहे. ‘‘येथ मातापिता दोनी। वेगळीं असती जनीं। ते दोनी एक करोनी। एका जनार्दनीं निजतान्हें।। ५।।’’ माझा सद्गुरू माझा मायबापच आहे आणि मी त्याचं तान्हं लेकरू आहे! मग ही माय काय करते? तर मोठय़ा हौसेनं ती वेगवेगळे अलंकार लेववते आणि तो सोहळा कृपादृष्टीनं न्याहाळते! लेकराच्या अंगावर दागदागिने घातले तरी त्या अलंकारांचं सौंदर्य आणि मोल त्याला कुठून कळावं? माताच ते सुख भोगत असते अगदी त्याचप्रमाणे हे सद्गुरूमाय, माझ्या मुखातून रसमयतेप्रमाणेच गूढार्थाच्या अलंकारांनी नटलेला हा ग्रंथ तू वदवून घेत आहेस. (यापरी मज निजबाळा। लेणीं लेवविशी स्वलीळा। आणि लेइलेपणाचा सोहळा। पहाशी वेळोवेळां कृपादृष्टीं।। ८।। बाळका लेवविजे लेणें। तयाचें सुख तें काय जाणे। तो सोहळा मातेनें भोगणें। तेवीं जनार्दनें भोगिजे सुख।।९।।). बरं, बाळाच्या अंगावर दागिने घातल्यानंतर ती त्याच्या रक्षणासाठी त्याच्या मागेमागे धावत असतेच, तसाच हा इतक्या अर्थगर्भ अलंकारांनी नटलेल्या ग्रंथाचं लेणं मला लेववल्यानंतर माझ्या रक्षणासाठी हे सद्गुरूमाय तू माझी पाठराखण करीत आहेस. हे रक्षण कशापासून? तर ‘ग्रंथकर्त्यां’चा अहंभाव कणमात्रही मनात डोकावू नये म्हणून! नाथांचा किती निरहंकारी स्वभाव आहे पाहा.. आपुल्या चिद्रत्नांच्या गांठी। आवडी घालिशी माझ्या कंठीं।  यालागीं मज पाठोवाठीं। निजात्मदृष्टीं सवें धांवे।। १०।।’’ मग नाथ म्हणतात, की लेकराला स्वत:ला बोलायला येत नाही त्यामुळे आईच त्याला बोलायला शिकवत असते त्याप्रमाणे माझ्यासारख्या अडाण्याकडून हा ग्रंथ माझी सद्गुरूमायच वदवून घेत आहे! ‘‘बाळक स्वयें बोलों नेणे। त्यासी माता शिकवी वचनें। तैशीं ग्रंथकथाकथनें। स्वयें जनार्दनें बोलविजे।। १२।।’’ नाथ आपल्याकडे अगदी हीनत्व घेत सांगतात की, या सद्गुरूमायचा चमत्कार पाहा की ती श्रीभागवताच्या एकादशस्कंधाचा अर्थ, तोही मराठीमध्ये माझ्यासारख्या मूर्खाकडून वदवून घेत आहे.. तेणें नवल केलें येथ। मूर्खाहातीं श्रीभागवत। शेखीं बोलविलें प्राकृत। एकादशार्थ देशभाषा।। १३।। हे सारं ऐकताना हेच जाणवतं की, एकनाथी भागवत कसं उमगू शकेल, त्याचा संकेतच जणू नाथ देत आहेत. ते अहंभावानं उमगणार नाही, जाणतेपणानं आकळणार नाही, तिथं शरणागतीच पाहिजे! ऐक्यतेचं गूढ सूत्र सांगणारा हा ग्रंथ त्या एका सद्गुरूच्याच चरणीं शरण गेल्याशिवाय आकळणार नाही.. आणि ही शरणागती म्हणजे काय? तर त्यांच्या आंतरिक धारेचा स्वीकार! त्यांची जी आंतरिक धारणा आहे, जो आंतरिक सद्विचार आहे, शाश्वताशी जी दृढ बांधीलकी आहे त्याच्या स्वीकाराची प्रामाणिक आणि तीव्र इच्छा असणं! ती इच्छा असेल, तरच मग या ग्रंथातील प्रत्येक शब्दन् शब्द आपल्याशी बोलू लागेल.. आपल्यातील अर्थामृत प्रकट करू लागेल आणि त्याच्या रसास्वादनानं निव्वळ बौद्धिक मनोरंजन होणार नाही, तर आत्मिक जागृतीचा मार्ग प्रकाशमान होत जाईल.