चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

एकनाथी भागवताच्या मुख्य कथाभागाला आता सुरुवात होत आहे. शुकदेवांनी यदुवंशाच्या अंताचा आरंभ मांडला आणि परीक्षिती मौन झाला. कारण आपण काही विचारलं तर शुकदेव कृष्णांच्या अवतारसमाप्तीची कथाच थेट सांगतील, असं त्याच्या मनात आलं. कृष्ण हा साक्षात परब्रह्म असला, तरी त्याच्या अवतारसमाप्तीची वेदना त्याच्या अंतर्मनाला भेदकच वाटत होती. त्याचा हा आत्मिक भाव जाणून शुकदेव म्हणाले, हे राजा, हा अध्याय म्हणजे मोक्षाचा प्रस्ताव आहे! मुक्तीसुखाचं साधन सांगणारा आहे. मुक्ती हा शब्द ऐकताच राजा अगदी सावध झाला. एखाद्या कृपणानं कुणाच्याही बोलण्यात पैशाचा विषय निघताच सावध व्हावं तसा! कारण पदोपदी तो मुक्तीचा मार्ग जाणण्यासाठीच तळमळत होता ना! तो अगदी एकचित्त दत्तचित्त होऊन ऐकू लागला. त्याच्या या स्थितीचं मोठं मनोरम वर्णन नाथ करतात. ते म्हणतात, ‘‘ऐसें ऐकतांचि वचन। राजा जाहला सावधान। मुक्तिसुखीं आवडी गहन। अवधानें कान सर्वाग केले।। १८।।’’ मुक्तीसुखाची त्याच्या अंत:करणात अशी ओढ होती की मुक्तीचा उच्चार होताच त्याच्या सर्वागाचाच जणू कान झाला! तेव्हा त्याच्या त्या एकाग्रतेचं शुकदेवांना मोठं कौतुक वाटलं. ऐसें देखोन परीक्षिती। शुक सुखावे अत्यंत चित्तीं। तो म्हणे अवधानमूर्ती। ऐक निश्चितीं गुह्य़ ज्ञान।।१९।। काय सुंदर शब्द आहे.. अवधानमूर्ती! शुकदेव म्हणाले, हे अवधानमूर्ती मी तुला अत्यंत गूढ असं ज्ञान सांगणार आहे ते ऐक! तेव्हा हे गुह्य़ ज्ञान कधी आणि कितपत उमगू लागेल? तर, आपल्याही मनात अवधान टिकू लागलं तर आणि तितपत! या मुक्तीचा आरंभ आणि पूर्णत्व भजनातच आहे, हे गुह्य़ प्रथम प्रकट करताना शुकदेव सांगतात, ‘‘तो म्हणे व्यासाचा जो निजगुरू। आणि माझाही परमगुरू। नारद महामुनीश्वरू। त्यासी आतिआदरू श्रीकृष्णभजनीं।। २३।।’’ हे भागवत रचल्यानं ज्यांच्या ज्ञानाला आणि प्रतिभेला पूर्णत्व आलं त्या व्यासांचा जो निजगुरू आणि माझा जो परमगुरू त्या नारदांना श्रीकृष्ण भजनात अत्यंत आदर आहे! श्रीकृष्णानं सर्व योगीमुनींना पिंडारकाला पाठवून दिलं खरं, पण नारद मात्र पुन्हा पुन्हा द्वारकेत आल्याशिवाय राहात नसत. का? तर, ‘‘हो कां जे द्वारकेआंत। न रिघे भय काळकृत। जेथ स्वयें श्रीकृष्णनाथ। असे नांदत निजसामथ्र्ये।।२५।।’’ जे द्वारकेत वास करतात त्यांना काळभय नाही. मृत्यूभय त्यांना स्पर्शू शकत नाही. कारण तिथं श्रीकृष्ण स्वसामर्थ्यांनिशी नांदत असतो! नारदांना दक्षानं शाप दिला होता. तो शाप असा होता की, नारदांना एक मुहूर्तभरही एका ठिकाणी राहाता येत नव्हतं. पण तो शाप हरीच्या भजनकीर्तनाला लागू नव्हता. त्यामुळे द्वारकेत जशी शापाची बाधा नव्हती तशीच हरिकीर्तनातही शापाची बाधा नव्हती. नाथ म्हणतात, ‘‘दक्षशापु नारदासी पाहीं। मुहूर्त राहों नये एके ठायीं। तो शापु हरिकीर्तनीं नाहीं। यालागीं तो पाहीं कीर्तननिष्ठु।।२६।।  ज्याची गाइजे कीर्तनीं कीर्ती। तो द्वारकेसी वसे स्वयें श्रीपती। तेथें शापबाधेची न चले प्राप्ती। यालागीं नित्यवस्ती नारदासि तेथें।। २७।।’’ हरीच्या म्हणजे सद्गुरूच्या स्मरणचिंतनात समस्त भय ओसरतं, हाच याचा मथितार्थ.