चैतन्य प्रेम

नारदांचं जे सर्वसंचारीपण आहे, त्याचं वसुदेवांच्या माध्यमातून नाथ भारावून वर्णन करतात. म्हणतात, देवांचा अवतार होतो तेव्हा सज्जनांना आनंद आणि दैत्यांच्या मनात भय निर्माण होतं. पण.. ‘‘तूं देवांचा आप्त होसी। दैत्यही विश्वासती तुजपासीं। रावण तुज नेऊनि एकांतासी। निजगुह्य़ासी स्वयें सांगे।। ६०।। देव रावणें घातले बंदीं। तो रावण तुझे चरण वंदी। शेखीं रामाचा आप्त तूं त्रिशुद्धी। विषम तुजमधीं असेना।। ६१।। जरासंधु कृष्णाचा वैरी। तुझी चाल त्याच्या घरीं। आणि कृष्णाचे सभेमाझारीं। आप्तत्वें थोरी पैं तुझी।। ६२।।’’ तू देवांचा आप्त होतोस, पण दैत्यांचाही तुझ्यावर विश्वास जडतो. ज्या रावणानं समस्त देव बंदी घातले तो तुला मान देतो, तुझ्या चरणांना वंदन करतो आणि एकांतात तुझ्याशी सल्लामसलतही करतो आणि तू रामाचा आप्त आहेस, हेही तो जाणतो. तिन्ही गुणांच्या प्रभावातून तू मुक्त आहेस, तुझ्यात विषमतेचा लवलेश नाही. जरासंध हा कृष्णाचा वैरी आणि तुझी कृष्णाच्याही सभेत आणि जरासंधाच्याही घरी  समान ये-जा आहे. हे सर्वसंचारीपण असल्यामुळेच तर सद्गुरूंची प्राप्ती अत्यंत घोर पापामध्ये बुडालेल्या जिवालाही तर होते! वसुदेवानं अत्यंत निर्मळ मनानं नारदांची स्तुती केली आणि म्हणाला की, हे देवर्षि तुम्ही प्रत्यक्ष घरी आलात आणि आजवरच्या अनंत जन्मांतली पुण्यंच जणू फळास आली आहेत. आता मला भवबंधनातून सुटायचा उपाय सांगा. वसुदेव म्हणतात, ‘‘ऐसे सांगावे भागवतधर्म। जेणें निरसे कर्माकर्म। श्रद्धेनें ऐकतां परम। जन्ममरण हारपे।।८२।। भवभय अतिदारुण। त्या भयाचें माया निजकारण। तिचें समूळ होय निर्दळण। ऐसे धर्म कृपेनें सांगावे।। ८३।।’’ ज्यायोगे कर्म आणि अकर्म या दोहोंचा निरास होईल, कर्तेपणाचाच निरास होईल, ज्याचं श्रद्धापूर्वक श्रवण करताच जन्म आणि मरणाचं चक्रच ओसरू लागेल असा भगवंताशी ऐक्य घडविणारा भागवतधर्म मला सांगा! देहभावनेतून प्रसवणारं भवभय हे अतिशय दारूण असतं. माया हेच तिचं मूळ कारण आहे. त्या मायेचं समूळ निर्दालन होईल असा धर्म मला सांगावा, अशी विनवणी वसुदेवानं केली. मग ही संधी आपल्याला खरं तर मागील जन्मीच मिळाली होती, पण ती आपण मोहानं कशी गमावली, हेसुद्धा वसुदेवानं सांगितलं. तो म्हणाला, ‘‘मी खूप तपश्चर्या केली आणि मला देव प्रसन्न झाला. आणि म्हणाला, काय हवं ते माग. पण मला मायेनं ठकवलं आणि तू माझा पुत्र म्हणून जन्मास ये, असं मी मागून बसलो!’’ (म्यां पूर्वी आराधिलें देवराया। तें भजन ममता नेलें वांयां। प्रलोभविलों देवमाया। पुत्रस्नेहालागूनि।। ८६।। मज देव तुष्टला प्रसन्नपणें। मागसी तें देईन म्हणे। तेथें मायेनें ठकिलें मजकारणें। माझा पुत्र होणें मी मागें।।८७।।). सर्व वृत्ती देहभावापासून सोडवून वसुदेवानं मागील जन्मी कठोर तपश्चर्या केली होती आणि त्या तपश्चर्येनं भगवंत प्रसन्नही झाला. तुला हवा तो वर माग, असं तो म्हणाला आणि माझ्या मनात अचानक ममत्वबुद्धी उत्पन्न झाली. ‘तू माझा पुत्र हो,’ असा वर मी मागून बसलो, असं वसुदेव म्हणाला. आता कुणालाही वाटेल की भगवंतच पुत्ररूपानं पोटी येणं किती आनंदाची गोष्ट आहे. पण ‘मागावं काय,’ याचं आकलन होण्यात फसगत झाली की कधी कधी आपण आपल्या आकलनानुसार मोठी गोष्ट मागून बसतो, पण तीच आपल्या मूळ ध्येयाच्या आड कशी येते, हे  तेव्हा उमगतही नाही, हेच वसुदेव सांगत आहेत!