01 March 2021

News Flash

७२. मृगमाया

एकदा तो असाच ध्यानासाठी नदीकाठी बसला असताना एक गर्भार हरणी पाणी पिण्यासाठी आली.

चैतन्य प्रेम

अखंड निजात्म स्थितीत असूनही म्हणजेच परमोच्च आनंदात स्थित असूनही आणि ज्या स्थितीत जन्म-मृत्यू-जन्म असं आवर्तन घडणं शक्य नसतं, तशा स्थितीत असूनही भरतांच्या जीवनात असं काही घडलं की त्या जन्म-मृत्यूच्या चक्रात ते पुन्हा अडकलेच. भरतांची ती कथा आपण पूर्ण-अपूर्ण आदी सदरांमध्ये आधीही विस्ताराने पाहिली आहे. तरी ती संक्षेपानं जाणून घेऊ. भरतानं समुद्रवलयांकित राज्य प्रस्थापित केलं. देवांनाही अप्राप्य असे भोग त्यानं भोगले. सारं काही त्याला अनुकूल असंच होतं. तरीही त्याच्या मनातला वैराग्यभाव जागा होत तीव्र झाला होता. हरीभजनाची ओढ त्याच्या मनात जागी झाली होती. ‘‘ऐसे भोग भोगिलियापाठीं। सांडूनि वलयांकित राज्यसृष्टी। स्वयें निघाला जगजेठी। स्वहितदृष्टी हरिभजनीं।। १५१।।’’ जे राज्यवैभव भोगतात त्यांना त्या सर्वाचा त्याग करता येईल, अशी विरक्ती त्यांच्या मनात उपजणं कठीण असतं. भरतानं मात्र भोगांचा त्याग करून श्रीपतीचं भजन साध्य केलं होतं. खरं तर याच जन्मी भरतानं मोक्ष प्राप्त केला असता, पण तरी त्याच्या वाटय़ाला पुन्हा मृत्यू आणि अगदी वेगळा असा जन्म आला. ‘‘तो तेणेंचि जन्में जाण। होआवा मोक्षासी आरोहण। परी जाहलें जन्मांतरकारण। तेंही विंदाण सांगेन।। १५३।।’’ आणि मग नारदांनी तो घटनाक्रम सांगितला. सर्व सुखत्याग करून वनात तपश्चर्येसाठी भरत आला होता. ध्यानावस्थेत तो भगवंताच्या स्मरणानंदात बुडून जात असे. एकदा तो असाच ध्यानासाठी नदीकाठी बसला असताना एक गर्भार हरणी पाणी पिण्यासाठी आली. तोच एक शिकारी आला आणि त्याने नेम धरताच घाबरून तिनं पैलतीरी उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यात तिच्या पोटातील पाडस खाली पडले आणि हरिणी शिकाऱ्याच्या बाणाचा नेम चुकवत वनात पळून गेली. भरताच्या कोमल अंत:करणावर आघात झाला. त्या एकाकी पाडसाला त्यानं पाण्यातून बाहेर काढलं आणि मग त्याला तो आपल्या कुटीत घेऊन आला. हरणाचे डोळे मुळातच करुणेनं भरलेले भासतात. त्यात या एकाकी पाडसाच्या डोळ्यात पाहताच भरत विरघळला. ज्या मायाममतेचा त्यानं सहज त्याग केला होता, तीच ममता त्याच्या मनात पुन्हा जागी झाली. त्या पाडसाचं पालनपोषण तो मोठय़ा मायेनं करू लागला. त्या मृगमोहानं त्याच्या मनाचा असा ताबा घेतला की साधना करतानाही त्याच्या मनात भगवंताच्या जागी ते एकाकी पाडसच उभं राहू लागलं! क्षणोक्षणी त्या पाडसाचंच चिंतन, त्याचंच स्मरण, त्याचंच मनन सुरू झालं. ध्यानासाठी डोळे मिटावेत, तर डोळ्यासमोर ते पाडसच यावं. उठता-बसता, खाता-पिता त्याचेच विचार येऊ लागले. (मृगमय मन भरताचें।)पूर्वीप्रमाणे तो तपासाठी वनात जाऊ शकेना. वनात गेला तरी कुटीजवळ ते पाडस सुरक्षित असेल ना, त्याला कुणी वाघ खाणार तर नाही ना, अशी भीती मनात येताच तो धावतच कुटीपाशी येई. त्या पाडसाला पाहून त्याचं मन शांत होई. तेव्हा ज्यानं राज्यवैभवाचा त्याग केला, तो भरत मृगमायेत पुरता अडकला. मग अचानक ते पाडस जसं मोठं झालं तसं एकेदिवशी वनात आपल्याच नादात पळून गेलं. भरताच्या मनावर मोठाच आघात झाला. त्या मृगासाठी त्याचं मन तळमळू लागलं. त्यानं जंगलात कितीतरी पायपीट केली तरी ते हरण काही सापडलं नाही. अखेर त्या हरणाच्या चिंतनात तळमळतच भरतानं प्राण सोडला आणि मृगध्यानात प्राण गेल्यानं त्याला पुढचा जन्म मिळाला तो मृगाचाच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 12:11 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 72
Next Stories
1 ७१. निजात्मस्थिती
2 ७०. धर्माचरण
3 ६९. परमार्थनिष्ठ
Just Now!
X