चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

ज्याचा ध्यास घेत माणूस प्राण सोडतो त्याच ध्यासात त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, असं सनातन तत्त्वज्ञान सांगतं. आसक्ती, देहबुद्धीतून चिवट होत असलेली ममता हीच जन्म-मृत्यूला कारणीभूत होते. नारद म्हणतात, ‘‘यालागीं साचचि जाण। ममतेपाशीं असे मरण। जो निर्मम संपूर्ण। त्यासि जन्ममरण स्पर्शेना।। १६०।। भरत तपिया थोर अंगें। तेथ काळ कैसेनि रिघे। ममतासंधी पाहोनि वेगें। मृत्यु तद्योगें पावला।। १६१।। देहासी येतां मरण। भरतासी मृगाचें ध्यान। तेणें मृगजन्म पावे आपण। जन्मांतरकारण जाहलें ऐसें।। १६२।।’’ भरताचा देह तपोमय होता तोवर काळ त्याच्या आधीन होता, पण जशी त्याच्या मनाला मृगाची ममता जडली तशी त्या ममतेची संधी काळानं साधली आणि त्यानं भरताला आपल्या कवेत घेतलं. ज्या क्षणी देहातून प्राण निघून जात होते त्या क्षणीही भरत मृगध्यानातच निमग्न होता आणि म्हणूनच त्याला हरणाचाच जन्म आला! मग नारद साधकांना सावध करणारा बोध सांगतात. ते म्हणतात, ‘‘कृपेनें केला जो संगु। तोचि योगियां योगभंगु। यालागीं जो नि:संगु। तो अभंगु साधक।।१६३।।’’ कृपेनं, करुणाभावानंही जो संग केला त्या संगानंच योगसिद्ध पुरुषाचाही योगभंग होतो आणि त्यामुळेच जो नि:संग असतो तोच अभंग असतो, हे साधकानं लक्षात ठेवावं! ‘‘मृगाचेनि स्मरणें निमाला। यालागीं तो मृगजन्म पावला। जो कृष्णस्मरणें निमाला। तो कृष्णुचि जाला देहांतीं।। १६४।। अंतकाळीं जे मती। तेचि प्राणियांसी जाण गती। यालागीं श्रीकृष्ण चित्तीं। अहोरातीं स्मरावा।। १६५।। ’’ मृगाच्या स्मरणात भरतानं प्राण सोडला आणि म्हणून त्याला हरणाचाच जन्म लाभला. जो हरीस्मरणात प्राण सोडतो, तो देहांतानंतर हरीमयच होतो! अंतकाळी जशी मती असते, तशी गती माणसाला लाभते आणि त्यामुळेच माणसानं अहोरात्र त्या श्रीकृष्णाचंच, त्या हरीचंच, त्या सद्गुरूचंच ध्यान करावं, स्मरण – मनन – चिंतन करावं. अर्थात भरताची तपश्चर्या काही वाया गेली नाही! हरणाच्या जन्माला आल्यावरही त्या तपबळानं त्याला गतजन्माचं स्मरण राहीलं होतं! त्यामुळे आपल्याला माणसाचा जन्म लाभून आणि विरक्तभाव जागा होण्याचं भाग्य लाभूनही तो जन्म एका मृगमायेनं कसा वाया गेला, याची तीव्र जाणीव त्याच्या मनात जागी होती. ‘‘परी मृगदेही जाण। भरतासी श्रीकृष्णस्मरण। पूर्वी केलें जें अनुष्ठान। तें अंतर जाण कदा नेदी।। १६६।।’’ त्या मृगाच्या जन्मात भरताला श्रीकृष्णाचं स्मरण होतं. पूर्वी त्यानं जे अनुष्ठानपूर्वक तप केलं होतं, ते वाया गेलं नव्हतं. आपण जे जे मनापासून करतो, निश्चयानं, निर्धारानं करतो, चिकाटीनं करतो त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहात नाही. मग जसं कृत्य असेल, तसं फळ असेल. भरतानं तपाचरणासारखं सत्कृत्य केलं होतं त्यामुळे त्याचं फळही हरीस्मरण हेच होतं आणि त्यानंही त्याचा लाभ झालाच. पण हा जन्मही गेला आणि त्यानंतरचा जो तिसरा जन्म मिळाला तो जडभरताचा होता! ‘‘मागुता तिसरे जन्में पाहें। तो ‘जडभरत’ नाम लाहे। तेथें तो निर्ममत्वें राहे। तेणें होय नित्यमुक्त।। १६७।।’’ जडभरताच्या जन्माला आल्यानंतर भरतानं ममतेच्या जाळ्यातून सुटून परम तत्त्वाशी ऐक्य साधलं आणि तो नित्यमुक्तच झाला!