चैतन्य प्रेम

राजा रहूगणानं भरताला, मला आत्मज्ञान कसं होईल, हे विचारलं. त्यावर भरत सांगू लागला, ‘‘गृहस्थोचित यज्ञकर्मानी मिळणारं स्वर्गसुखही स्वप्नवतच आहे, हे ज्याला उमगत नाही त्याला ज्ञान देण्यात उपनिषदांची वाक्यंही अपयशी ठरतात! जोवर मनुष्याचं मन सत्, रज अथवा तमोगुणांच्या आधीन असतं तोवर त्याच्या ज्ञानेंद्रियांद्वारे आणि कर्मेद्रियांद्वारे शुभ आणि अशुभ कर्मे घडतच राहतात. हे मन वासनामय, विषयासक्त, त्रिगुणांनी प्रेरित, विकारी आणि इंद्रियरूपी कलांनी युक्त आहे. तेच विविध नामरूपांनी देवता आणि मनुष्यादी रूपे धारण करून जीवाच्या ऊध्र्वगती वा अधोगतीचं कारण ठरतं. हे मायामय मन संसारचक्रात जाचणारं आहे. तेच आपल्याला मोहात अडकवून सुख-दु:खरूपी अटळ कर्मफळं भोगायला लावतं, जोवर मन असतं तोवर जागृती आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार घडून दृश्य भासमान होत राहतं. त्यामुेळ ज्ञानी जन मनालाच त्रिगुणमय अधोगामी स्थूलप्रपंचाचं आणि गुणातीत ऊध्र्वगामी परम मोक्षपदाचं कारण मानतात. मनुष्याला जोवर ज्ञान होत नाही आणि त्याद्वारे मायेचं खरं स्वरूप जाणल्यानं ती निष्प्रभ होऊन, आसक्ती लयास जाऊन, कामक्रोधादी विकारावर ताबा येऊन आत्मतत्त्वाला जाणलं जात नाही आणि जोवर मन हेच अंतरंगातील संसारदु:खाचं मूळ कारण आहे, हे उमगत नाही, तोवर या जगात मनुष्याची भटकंती सुरूच राहते. कारण हेच चित्त त्याच्या शोक, मोह, रोग, राग, लोभ आणि वैर आदीचे संस्कार तसेच ममत्वाची वाढ करीत राहतं. राजन, हे मनच तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. तू त्या मनाच्या उपद्रवमूल्याकडे आजवर दुर्लक्ष केलंस त्यामुळेच त्याची शक्ती कमालीची वाढली आहे. हे मन खरं पाहता मिथ्याच आहे, तरीही त्यानं तुझ्या आत्मस्वरूपाला आच्छादित केलं आहे. त्यामुळे तू सावध होऊन, दक्ष होऊन श्रीसद्गुरू आणि हरीच्या चरणांच्या उपासनाअस्त्रानं त्याचा निरास कर.’’ भरताच्या या बोधानं राजा अंतर्मुख झाला आणि खऱ्या अर्थानं उपासनेला लागला. हा बोध ‘श्रीमद्भागवता’च्या पंचम स्कंधात अकराव्या अध्यायात आला आहे. जो मूळ बोध आहे त्याचं पूर्ण आकलन ज्याची जशी साधनेत प्रगती होत जाईल त्यालाच अधिकाधिक होऊ लागेल, पण शब्दांनी जितका बोध कळतो त्याहीपलीकडे खूप काही त्यात ओतप्रोत भरून आहे, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. यातलं प्रत्येक वाक्य म्हणजे जणू एक एक सूत्र आहे आणि त्याचा दीर्घ विस्तार होऊ शकतो. अत्यंत संक्षेपानं त्याचा विचार करू. पहिलंच वाक्य आपल्या मनोधारणेला पहिला धक्का देणारं आहे. यात स्वर्गसुखासारख्या उच्च पण अखेरीस नश्वर अशाच सुखाच्या प्राप्तीसाठी होणाऱ्या कर्मकांडावर थेट टीका आहे आणि ज्यांना स्वर्गसुखासाठी केली जाणारी ही र्कमही स्वप्नवत म्हणजे मिथ्या आहेत, हे उमगत नाही त्यांना उपनिषदंही ज्ञान देऊ शकणार नाहीत, असंही स्पष्ट सांगितलं आहे. माणसाचं मन त्रिगुणांच्या पकडीत असतं आणि त्यामुळेच सत्, रज आणि तम या गुणांच्या कमीअधिक प्रभावानुसार माणूस जगत राहतो. सत्त्व गुणाचा प्रभाव अधिक असेल, तर सत्कर्माकडे त्याचा ओढा अधिक असतो, रज आणि तम गुणाचा प्रभाव अधिक असेल, तर दुष्कर्माकडे त्याचा ओढा असतो. त्या शुभ आणि अशुभ कर्माचे संस्कार त्याच्या अंतरंगावर होत असतात आणि पुन्हा त्या संस्कारांनुरूप र्कम तो करीत राहतो.