चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

शुभ कर्माची म्हणजेच सत्कर्माची शुभ फळं असतात, तर अशुभ कर्माची म्हणजेच दुष्कर्माची वाईट फळं असतात. सत्कर्मानी पुण्यप्राप्ती होते, तर दुष्कर्मानी पाप साचतं. सत्कर्माच्या योगे लाभणाऱ्या शुभ फळांना माणूस सुख मानतो आणि दुष्कर्माच्या द्वारे वाटय़ाला येणाऱ्या अशुभ फळांना दु:ख मानतो.  पुण्याची परिसीमा झाली की स्वर्गप्राप्ती होते, देवलोक प्राप्त होतो, देवत्वही प्राप्त होतं. पापाची परिसीमा ही नरकात ढकलते आणि त्यानं राक्षसत्व प्राप्त होतं, असं सनातन तत्त्वज्ञान मानतं. समाजाचं मानसिक स्वास्थ्य वाढावं आणि लोकहिताला अनुकूल अशी परंपरा टिकावी, यासाठी सत्कर्माना संतांनीही प्रोत्साहनच दिलं आहे. पण सत्कर्मातून खरी सेवा घडली नाही आणि त्यांचा अहंकार झाला तर दुर्गुणांइतकाच सद्गुणही वाईटच ठरतो. पुण्यसंचयानं स्वर्गप्राप्ती होते आणि पापसंचयानं नरकप्राप्ती होते, पण अखेरीस दोन्ही जन्म-मृत्यूच्या चक्रातून सोडवत नसल्यानं नरकाइतकाच स्वर्गही वाईटच ठरतो. जणू एक लोखंडी बेडी आहे, तर दुसरी सोन्याची बेडी आहे. पण दोन्हीचा हेतू एकच, जिवाची जखडण! तेव्हा शुभ आणि अशुभ कर्मामध्ये कर्तेपणानं गुंतण्याऐवजी जी काही सत्र्कम घडत आहेत ती भगवंतच करवून घेत आहे, या भावनेनं ती भगवंताच्या स्मरणात करणं आणि भगवंतालाच अर्पित करीत जाणं, हाच एकमेव मार्ग आहे. त्यानं अहंकार निर्माण होण्याचा धोका नाही आणि लोकहितातही बाधा येण्याची शक्यता नाही. पण तसं सद्गुरुबोधाशिवाय घडू शकत नाही. म्हणूनच जे निव्वळ स्वर्गसुखासाठीच सत्र्कम करीत राहतात त्यांना भरतानं सावध केलं आहे. कारण भरताच्या सांगण्यानुसार पराकोटीच्या पुण्यांशामुळे देवत्वही प्राप्त होईल, पण खरी मुक्ती लाभणार नाही! भरताच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘मनच विविध नामरूपांनी देवता आणि मनुष्यादि रूपं धारण करून जिवाच्या ऊध्र्वगती वा अधोगतीचं कारण ठरतं.’’ याचा अर्थ काय? तर स्वर्गात, देवलोकात स्थान लाभतं. ‘देव’ हे पदच आहे म्हणा ना! इंद्रापासून विविध गोष्टींचा अधिष्ठाता देवही असतो ना? वरुणदेव, वायुदेव, जलदेवता आदि.. तर गीतेतही म्हटलं आहे की, पुण्य क्षीण झालं की या देवांनाही मृत्युलोकात ढकललं जातं! तेव्हा ऊध्र्वगतीला जाऊन देवत्वही लाभतं आणि अधोगतीला येऊन मनुष्यादि योनीही लाभतात. या दोन्ही स्थितींमध्ये अहंकाराला कुठे अटकाव नाही! त्या अहंकारानं अधोगती निश्चित आहे. मग तुम्ही स्वर्गात असा की मृत्युलोकात असा! तेव्हा अहंकार चिकटला तर सत्त्वगुणी माणूसही अधोगतीला जातो. इंद्रालाही आपलं पद वाचविण्याची भीती जडते आणि तो अनेकानेक उलटसुलट कृत्यं करून परिस्थिती अधिकच बिकट करून ठेवतो! पुराणात या कथा आहेतच. या सर्वाचं मूळ आहे ते मनात! भरत सांगतो की, ‘‘मन असतं तोवर जागृती आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार घडून दृश्य भासमान होत राहतं. त्यामुळे ज्ञानीजन मनालाच त्रिगुणमय अधोगामी स्थूल प्रपंचाचं आणि गुणातीत ऊध्र्वगामी परम मोक्षपदाचं कारण मानतात.’’ आता जागेपणी आणि स्वप्नं पाहतानाही मनाचं अस्तित्व असतंच. स्वप्नातही ‘मी’ची ओळख कायम असते आणि म्हणूनच जागेपणाइतकंच स्वप्नातलं जगही माणसाला खरं वाटत असतं!