18 September 2020

News Flash

८३. नाम-धेनु!

माणसाचा जन्म आणि अलौकिक क्षमतांनी युक्त असा मनुष्य देह लाभूनही माणूस खरा लाभ घेत नाही

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

माणसाचा जन्म आणि अलौकिक क्षमतांनी युक्त असा मनुष्य देह लाभूनही माणूस खरा लाभ घेत नाही. नाथ सांगतात, ‘‘नाना विनोद टवाळी। नित्य विषयांची वाचाळी। त्यासी जपतां रामनामावळी। पडे दांतखिळी असंभाव्य।। २३७।।’’ दिवस-रात्र विनोद, टवाळक्या आणि वैषयिक गप्पांमध्ये सरला तरी माणसाला कंटाळा येत नाही, पण रामनामाचा जप करण्यासाठी बसताच जणू दांतखीळ बसते! खरं पाहता नाम जपण्यास काही खर्च येतो का? उलट बसल्याजागी ते सहज साधण्यासारखं आहे. पण तरीही अंतर्मुख होण्याची प्रक्रिया ज्यायोगे सुरू होते, ती प्रक्रिया माणूस टाळतोच. त्याला अंतर्मुख होण्याचीच भीती वाटते. त्यापेक्षा बाह्य़ भौतिक जगातल्या भ्रामकतेचा आधार त्याला अधिक भावत असतो. नाथ सांगतात, ‘‘घरा आली कामधेनु। दवडिती न पोसवे म्हणूनु। तेवीं श्रीरामनाम नुच्चारूनु। नाडला जनु नरदेहीं।। २३८।।’’ कामधेनु म्हणजे मनातल्या सर्व कामना पूर्ण करणारी दिव्य गाय. ती घरी आली, तर तिला पोसणं परवडत नाही म्हणून तिला हाकून लावण्यासारखंच, सर्व भ्रम नष्ट करणारं आणि सर्व कामना फलप्रद करणारं रामनाम मुखात सहज येत असतानाही ती संधी दवडून माणूस आपल्या स्वत:चाच घात करतो. स्वत:लाच नाडत असतो. या देहानं माणूस भौतिक जगात देहबुद्धीचं प्रेम शोधत भरकटत असतो, पण भगवंताचं प्रेम जोडून देणाऱ्या भक्ताचा संग त्याला तितकासा रुचत नाही. त्या सत्संगातही तो आपल्या देहबुद्धीनुसारच वागत, बोलत असतो आणि या सत्संगाच्या लाभानं किंवा त्या सत्संगानुसार सुरू होणाऱ्या मोडक्यातोडक्या साधनेनं आपल्या देहबुद्धीतून प्रसवणाऱ्या विकारवश इच्छांचीच पूर्ती व्हावी, अशी अपेक्षा राखत असतो. नाथ अगदी स्पष्टपणे सांगतात, ‘‘करितां नरदेहीं अहंकार। तंव तो देहचि क्षणभंगुर। देहीं देहवंता भाग्य थोर। जैं भगवत्पर भेटती।। २३९।।’’ या नरदेहाचा अहंकार धरून जगण्यात काही अर्थ नाही. कारण तो मुळचाच क्षणभंगुर आहे. तरी अशा या देहानं जगात वावरताना भगवंताशी एकरूप झालेला भक्त भेटण्यासारखं भाग्य नाही! ‘‘ज्यांसी भगवद्भक्तीची अति गोडी। त्यांवरी भगवंताची आवडी। त्यांची भेटी तैं होय रोकडी। जैं पुण्याच्या कोडी तिष्ठती।। २४०।।’’ ज्यांना भगवंताच्या भक्तीची अत्यंत गोडी असते त्यांच्यावर भगवंताचंही प्रेम असतं. अशा भगवद्भक्ताची भेट काय सोपी का आहे? अहो, कोटी कोटी पुण्यांचं पाठबळ जेव्हा मिळतं तेव्हाच ही भेट घडते. या भेटीसाठी पुण्याबरोबरच दोन महत्त्वाच्या गोष्टींची गरज नाथ सांगतात त्या म्हणजे, ‘‘निष्कामता निजदृष्टी।’’ म्हणजे मनातली इच्छांची खळबळ ओसरली पाहिजे आणि आपलं खरं स्वरूप जाणण्याची खरी ओढ निर्माण झाली पाहिजे. कारण, ‘‘व्याघ्रसिंहांचें दूध जोडे। चंद्रामृतही हाता चढे। परी हरिप्रियांची भेटी नातुडे। दुर्लभ भाग्य गाढें मनुष्यां।। २४४।।’’ वाघ-सिंहांचंही दूध एकवेळ मिळेल, चंद्राचं अमृतही एकवेळ हाती येईल, पण हरीभक्ताची भेट हे दुर्लभ भाग्य आहे!  थोडक्यात भगवंताशी एकरूप असलेल्या सद्गुरूची भेट हीच या जन्मातली दुर्लभ, पण मोठी भाग्याची गोष्ट आहे! त्या भेटीसाठी या देहाचा आणि जन्माचा खरा वापर माणूस करीत नाही, ही नाथांची खंत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 1:41 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 83
Next Stories
1 ८२. अमृत आणि मृगजळ
2 ८१. विश्वकणव
3 ८०. चैतन्यगाभा साकार!
Just Now!
X