चैतन्य प्रेम

आपल्यात एवढे विकार आहेत, ते आधी दूर झाले पाहिजेत, मगच खरी सद्गुरूभक्ती साधेल, असं काहीसं वारंवार मनात येई. मनातली ही तगमग ओळखून एकदा सद्गुरू म्हणाले, ‘‘तू विकार वगैरे सोडण्याच्या मागे लागू नकोस. हा जन्म संपेल, पण ते संपणार नाहीत! त्यापेक्षा मी जे सांगतो ते करायला लाग. मग मी त्या विकाराबिकारांकडे पाहीन!’’ तेव्हा एखादी गोष्ट दडपून टाकली, तर ती नष्ट होते असं नव्हे. उलट ती अधिक तीव्रतेनं कधी उफाळून प्रकट होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याऐवजी सद्गुरू सांगत आहेत ती साधना करणं, तसं जीवन जगू लागणं, तसा जीवनव्यवहार करणं, हेच साधलं पाहिजे. त्यावरच भर पाहिजे. नवनारायणांतील कविदेखील नकारात्मकतेचा मार्ग त्यागून सकारात्मकतेकडे वळवत आहे. हा मार्ग आहे हरिभक्तीचा. कारण,  ‘‘इंद्रियें कोंडितां न कोंडती। विषय सांडिता न सांडती। पुढतपुढती बाधूं येती। यालागीं हरिभक्ती द्योतिली वेदें।।’’ अहो इंद्रियं कोंडता येत नाहीत की विषय सांडता येत नाहीत, उलट जे त्यागावं ते मनात अधिक वेळा यायला लागंत! मग ही कोंडलेली इंद्रियं आणि वरकरणी त्यागलेले विषय हे पुढे पुढे अधिक बाधा आणू लागतात. त्यामुळेच वेदांनीही हरिभक्तीच सांगितली आहे, असं कवि जनक राजाला सांगतो.  ही हरीभक्ती जर खरेपणानं सुरू झाली, तर मग विषयांची पकड हळूहळू सुटू लागते. तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे ना? एका माणसानं झाडाला घट्ट मिठी मारली होती आणि ओरडत होता, सोडवा हो मला, पाहा या झाडानं मला कसं घट्ट पकडून ठेवलंय ते! तसं विषयांनी माणसाला पकडलेलं नाही, माणसानंच विषयांना घट्ट धरून ठेवलं आहे. बरं त्या विषयांतही तसं पाहू जाता काही वाईट नाही. सृष्टीक्रमात त्यांचं महत्त्वाचं स्थान  आहेच. त्याचप्रमाणे ज्या परमानंदाच्या प्राप्तीसाठी माणसाची जन्मापासून धडपड सुरू आहे, त्या आनंदाची अत्यंत कमी प्रतीची आणि अत्यंत क्षणिक अशी झलक देहसुखात भासमान होते आणि म्हणून त्या देहसुखात सर्वात मोठा वाटा असलेल्या कामभावनेत माणूस अडकतो. देहसुखाचा आनंद क्षणिक असला, तरी सहजप्राप्य असल्यामुळेच माणूस या विषयांच्या आहारी जातो  आणि त्यांच्यात अडकतो. मग विषयसुखप्राप्तीच्या त्याच्या प्रयत्नांत आयुष्याचा बहुमोल असा वेळ आणि मौल्यवान क्षमता तो त्या विषयपूर्तीच्या ओढीतच खर्च करीत जातो. या स्थितीतील मनाला भक्तीचा मार्ग कवि दाखवत आहेत, पण अगदी लहान मूल जे जन्मापासून खेळण्याबागडण्यात दंग आहे, घराच्या सावलीत वाढत आहे त्याचा शाळेचा पहिला दिवस कसा असतो? तो रडतो-भेकतो, त्याला शाळेत जायचंच नसतं. तसंच आहे हे! जो विषयसुखाच्या ओढींमध्ये आकंठ बुडाला आहे आणि देहबुद्धीच्या सावलीत स्वत:ला सुरक्षित मानत आहे तो भक्तीकडे काय सहजासहजी वळेल का? आणि वळला तरी तिथं टिकण्यासाठी प्रामाणिक असेल का? तर अर्थातच नाही! विषयसुखासाठी तळमळणारा माणूस त्या सुखप्राप्तीत अडचण आल्यावरच थोडा जागा होतो, पण तरीही तो विषयांना निर्थक मानत नाही आणि त्यांना त्यागण्याचा विचारही करू शकत नाही. उलट विषयसुखात आलेली ती अडचण दूर करण्याचा उपाय तो शोधू लागतो. त्या उपायात एक उपाय असतो तो भगवंताच्या भक्तीचा! भक्तीनं भगवंत प्रसन्न होईल आणि ही अडचण दूर होईल, असं त्याला वाटत असतं!