अकराही इंद्रियवृत्ती या भक्तीकडे कशा वळवाव्यात, हे कविनं सांगितलं, पण उल्लेख मनासकट काही इंद्रियांचाच केला. अर्थात या इंद्रियांपुरतं वळणही व्यापकच आहे. पहिलाच स्पर्श आहे तो मनाला. याचं कारण मन जर विरुद्ध दिशेला असेल, तरी इतर इंद्रियांकडून भक्तीला अनुकूल कृती घडणार नाही किंवा तशी कृती घडली तरी मनापासून ती न केल्यानं त्या कृतीत ती तळमळ नसेल आणि म्हणूनच ती प्रभावी ठरणार नाही, सार्थक ठरणार नाही आणि परिणामकारक ठरणार नाही. म्हणून भक्तीच्या मार्गावर पाऊल टाकायचं असेल तर मनाला जो भौतिक जगाच्या ध्यानाचा छंद लागला आहे त्यातून त्याला हळूहळू सोडवावं लागेल आणि त्या मनाला हरीच्या ध्यानात मुरवावं लागेल. म्हणून कवि सांगतो की, ‘मनें’ करावें हरीचें ध्यान! मनानं हरीचं ध्यान करावं! आता हरी म्हणजे कोण? तर भगवंताशी एकरूप असलेला जो सद्गुरू आहे, आपल्या समस्त भवदु:खाचं हरण करणारा जो सद्गुरू आहे, त्याचं ध्यान हे हरीचंच ध्यान आहे आणि हे ध्यान सोपं आहे! कारण भगवंताला काही आपण पाहिलेलं नाही, पण या सद्गुरूला पाहू शकतो, त्या भगवंताशी काही बोलू शकत नाही, पण या सद्गुरूशी बोलू शकतो, त्या भगवंताला स्पर्शू शकत नाही, पण या सद्गुरूला स्पर्शू शकतो. म्हणूनच तर ज्ञानेश्वर माउलीसुद्धा निवृत्तिनाथांकडे निर्देश करीत म्हणतात की, ‘‘तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा!’’ तो जो सर्वत्र भरून राहिलेला विठ्ठल आहे ना, तोच या निवृत्तिनाथरूपी सद्गुरूत प्रकटपणानं आहे आणि तो आमच्यासाठी बरवा म्हणजे सोपा आहे! त्याच्याशी बोलणं सोपं आहे, त्याला पाहणं सोपं आहे, त्याचे बोल ऐकणं सोपं आहे, त्याच्या सहवासात राहण्याचे प्रयत्न करणं सोपं आहे. तेव्हा हरीचं ध्यान म्हणजे सद्गुरूंचं ध्यान. आणि सद्गुरूंचं ध्यान म्हणजे काय? तर त्यांच्या लीलाचरित्रातले प्रसंग, त्यांचा बोध, त्यांचे अमृतबोल आणि त्यांच्या आठवणी यांचं मन:चक्षूंसमोर होणारं दर्शन आणि त्या दर्शनसुखात डुंबणं हे स्थूल ध्यान आहे. मग त्या लीलाप्रसंगांमागचा गूढ अर्थ जसजसा जाणवू लागेल तसतसं सद्गुरूंना जाणणं सर्वथा अशक्य आहे, या जाणिवेनं त्यांच्याविषयीच्या प्रेमादरानं मन भरून जाऊ लागल्यावर सूक्ष्म ध्यान सुरू होऊ लागतं. मग सर्वत्र एकच तत्त्व आहे, ही जाणीव स्थिर होऊन मनात निर्भयता, नि:शंकता, निश्चिंतता रुजू लागते. जेव्हा मनाची धारणा अशी सूक्ष्म आणि शुद्ध होऊ लागते तेव्हा, ‘श्रवणें’ करावें कीर्तिश्रवण। ‘जिव्हेनें’ करावें नामस्मरण। हरिकीर्तन अहर्निशीं।। ‘करीं’ करावें हरिपूजन। ‘चरणीं’ देवालयगमन। ‘घ्राणीं’ तुलसी आमोदग्रहण।जिंहीं हरिचरण पूजिले।। या गोष्टी वेगानं आवाक्यात येऊ शकतात. पण मनाची धारणा हरिध्यानात पक्व झाली नसतानाही या गोष्टी सुरू करायला हव्यात. त्यातली पहिली आहे, ‘श्रवणें’ करावें कीर्तिश्रवण! म्हणजे कानांनी हरीची कीर्ती ऐकायची आहे. आपल्याला कानांनी आपलीच कीर्ती ऐकायची ओढ असते. खरं तर देह ठेवल्यावर जी पसरते त्याला कीर्ती म्हणतात. पण आपली स्तुती, आपला गवगवा म्हणजे आपली कीर्ती असं आपल्याला वाटत असतं. त्यातही दुसऱ्याची स्तुती आपल्याला तितकीशी आवडतेच असं नाही, उलट आपली स्तुती करून घ्यायला, ऐकायला आणि स्वत:ही करायला आवडतं. ती थांबवायला कवि साधकाला सांगत आहे.

– चैतन्य प्रेम