02 March 2021

News Flash

९६. कर्ममुक्त

गृह म्हणजे भौतिकाचा आसराच नव्हे, तर गृह म्हणजे ज्या देहात आपला निवास आहे

(संग्रहित छायाचित्र)

 चैतन्य प्रेम

भगवंताच्या भजनात बुडालेला जो भक्त आहे, तो कर्मपाशातून कसा मुक्त असतो, याचं वर्णन आता पुढील काही ओव्यांत आहे आणि जर त्यांचा खरा अर्थ लक्षात घेतला नाही, तर या ओव्या कर्तव्यविन्मुख व्हायला प्रोत्साहन देत आहेत, विधिनिषेध न पाळायला सांगत आहेत आणि प्रमादाची पर्वा न करायला सांगत आहेत, असाच गैरसमज होण्याची मोठी शक्यता आहे. म्हणून या ओव्या नीट लक्षात घेतल्या पाहिजेत. यात पहिल्याच दोन ओव्यांत कवि सांगतो की, ‘‘ऐसे आचरितां भागवतधर्म। बाधूं न शके कर्माकर्म। कर्मासी ज्याची आज्ञा नेम। तो पुरुषोत्तम भजनामाजीं।। ३३६।। ऐसा भागवतधर्मे गोविंदु। तुष्टला चाले स्वानंदकंदु। तेथें केवीं रिघे विधिनिषेधु। भक्तां प्रमादु कदा न बाधी।।३३७।। ’’ या ओव्यांचा शब्दश: अर्थ असा की, ‘‘अशा प्रकारे भक्त भागवतधर्म आचरीत असता त्याला कर्माकर्म बाधू शकत नाही. कारण कर्माला ज्यानं आज्ञा आणि नियम घालून दिले आहेत, म्हणजेच कर्मावर ज्याची सत्ता आहे, तो पुरुषोत्तम त्या भक्ताच्या भजनात असतो. याप्रमाणे स्वानंदकंद जो गोविंद तो जिथं भागवतधर्माच्या आचरणानं संतुष्ट होऊन चालत असतो तिथं विधिनिषेधांचा शिरकाव कसा होणार? त्याच्या भक्ताला प्रमादाची कधी बाधा होत नाही.’’ कुणालाही वाटेल की, माणसानं फक्त भजनात दंग होऊन जावं, बाकी कर्म, कर्तव्यं, विधिनिषेध यांची पर्वा करू नये, प्रमादांचीही भीती बाळगू नये, असंच सुचवायचं आहे का? तर नाही! कारण भजनाचा जो व्यापक अर्थ याच अध्यायात कविनं सांगितला आहे, तो सदोदित ध्यानात ठेवला पाहिजे. मागेच आपण पाहिलं की, ‘‘दारा सुत गृह प्राण। करावे भगवंतासी अर्पण। हे भागवतधर्म पूर्ण। मुख्यत्वें ‘भजन’ या नांव।। २९९।।’’ म्हणजेच दारा म्हणजे केवळ पत्नी नव्हे तर दारा म्हणजे देहबुद्धीतून प्रसवणाऱ्या समस्त कामना, सुत म्हणजे नुसता पुत्र नव्हे तर सुत म्हणजे भवितव्यातील निश्चिंतीची आस, गृह म्हणजे भौतिकाचा आसराच नव्हे, तर गृह म्हणजे ज्या देहात आपला निवास आहे त्या देहाच्या समस्त चिंता आणि प्राण म्हणजे जीवनाचा मुख्य आधार; या सर्वाचं ओझं जेव्हा सद्गुरूइच्छेवर सोडलं जातं आणि आपण कर्तव्यकर्म करून मनानं, चित्तानं, बुद्धीनं आणि आंतरिक भावानं त्यापासून अलिप्त आणि सद्गुरूबोध आणि सद्गुरूस्मरणात एकरूप होत राहतो, तेव्हा खरं भजन सुरू असतं! तेव्हा याप्रमाणे जो भजनात दंग असतो  त्याला व्यवहारातील कर्माचं दडपण उरत नाही. याचा अर्थ तो कर्मात टाळाटाळ करतो, असा नव्हे! पण काय करावं आणि काय करू नये, या द्वंद्वातून तो मोकळा असतो. कर्मावर पूर्ण सत्ता असलेला भगवंत हाच खरा कर्ता आहे, या भावनेनं निमित्तमात्र होऊन तो कर्म करीत असतो आणि त्यामुळे त्याचं कर्म हेदेखील भजनच ठरतं. मग ते कर्म विधिपूर्वक होत आहे ना, या काळजीलाही वाव नाही. ‘आपण करतोय खरं, पण हातून काही चूक तर होणार नाही ना,’ अशी जी प्रमाद घडण्याची भीती कर्म करतानाही माणसाच्या मनात उद्भवू शकते ती भीती भक्ताच्या मनात नसतेच. पण त्या कर्मात  काही चूक घडलीच, तर भगवंतच कर्मात सुधारणा करण्याची प्रेरणा देऊन दुरुस्ती घडवून आणील, हादेखील भाव रुजलेला असतो. त्यामुळे असा जो भगवंतसमर्पित भक्त आहे त्याला योग्य मार्गावर राखण्याची जबाबदारीही भगवंतावरच येते!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 4:46 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 96
Next Stories
1 ९५. सांभाळी पदोपदी
2 ९४. भयनिरास
3 ९३. लय
Just Now!
X