25 September 2020

News Flash

३८८. मन-निवांत

बरेचदा आपण परिस्थिती प्रतिकूल वा नावडती भासत असेल, तर तिचा स्वीकारच करीत नाही.

चैतन्य प्रेम

आजच्या अनिश्चिततेनं घेरलेल्या काळात एखाद्याला दैवावर भरवसा ठेवून निवांत राहण्याचा सल्ला देण्यासाठी अजगराचं उदाहरण देणं पटणार नाही. पण या रूपकाचा खरा रोख लक्षात घेतला पाहिजे. अजगर हा खाद्य मिळवण्यासाठी जंगलभर सरपटताना दिसत नाही. तो आहे त्या जागी धडपड न करता स्वस्थ पडून असतो, पण म्हणून काही तो आहार न मिळाल्यानं प्राणास मुकत नाही. मग याचा अर्थ माणसानं आहे त्या जागी निवांत राहावं, असा आहे का? तर हो! पण हे निवांत राहणं देहाच्या नव्हे, तर मनाच्या पातळीवर आहे. म्हणजे देहानं कर्तव्यकर्म करीत राहावं, पण मन मात्र स्व-स्थ असावं! देहानं कर्म करताना मनानं स्थिर कसं राहावं, हे सांगताना श्रीगोंदवलेकर महाराज यांनी जात्याच्या पेडय़ांचं- अर्थात जात्याच्या दोन दगडांचं रूपक वापरलं आहे. जात्याचा वरचा दगड फिरत असतो आणि खालचा स्थिर असतो. दोन्ही दगड फिरू लागले तर पीठ होणार नाही. अर्थात परिश्रम करूनही निष्पन्न काहीच होणार नाही. बरं तो जो सतत फिरणारा वरचा दगड आहे, त्यात खुंटा आहे. तसा साधनेचा खुंटा रोवून जगात फिरावं, असं महाराज सुचवतात. तसं अजगर मिळेल तो आहार स्वीकारतो, धीर सोडत नाही, अशांत होत नाही, तसं माणसानं जगात राहावं. प्रयत्न अवश्य करावेत, पण जी परिस्थिती सामोरी येईल तिचा स्वीकार करावा. बरेचदा आपण परिस्थिती प्रतिकूल वा नावडती भासत असेल, तर तिचा स्वीकारच करीत नाही. ती टाळण्यासाठी धडपडतो. ती टाळण्यासाठी काय करतो? तर तिला सामोरंच जात नाही. त्यामुळे ती परिस्थिती ओढवण्याची भीतीही टळत नाही. त्या भयओझ्यानं आपण हतबल होतो. पंतमहाराज बाळेकुंद्रीकर म्हणत की, ‘‘अंधाराची भीती वाटते का? मग ती घालविण्याचा पहिला उपाय म्हणजे अंधारभरल्या खोलीत प्रथम पाऊल टाकणं हाच!’’ तसंच आहे हे. परिस्थिती टाळून आपण ती परिस्थिती ओढवण्याची भीती टाळू शकत नाही! ती भीती घालवण्याचा एकमेव उपाय म्हणजे परिस्थितीला सामोरं जाणं, तिचा स्वीकार करणं. कारण प्रश्न टाळून ते सुटतातच असं नाही. त्यांना कधी कधी भिडावंही लागतं. परिस्थितीला सामोरं जाऊनच ती बदलण्याचा प्रयत्न करता येतो. त्यासाठी देहानं प्रयत्न करीत असताना मनानं स्थिर राहणं आवश्यक असतं. आपल्याला पहिली भीती ही असते की, जगाचा आधार डळमळीत झाला तर आपण कसं जगू? आपला उदरनिर्वाह कसा चालेल? खरं पाहता, जर मनानंच निराश झालो, खचलो, तर मग प्रयत्नांसाठी आवश्यक बळ तरी उरेल का? त्यासाठीच अवधूत हा यदुराजाला अजगराचं उदाहरण देतो. अजगर घाबरून कधीही धीर सोडत नाही. कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचा त्याचा निर्धार असतो आणि योग्याची मनोवृत्तीही तशीच असते, असं अवधूत सांगतो. आता एक लक्षात ठेवा की, ‘‘तुम्ही इतके आनंदी दिसता, या आनंदाचं रहस्य काय?’’ या प्रश्नावर अवधूत उत्तर देत आहे. त्यामुळे आपण ज्यांना ज्यांना गुरू मानलं त्यांच्याकडून काय काय शिकलो, हे अवधूत सांगत आहे. त्या अनुषंगानं अजगराकडून आपण परिस्थितीचा स्वीकार करूनही निश्चिंतपणे राहता येतं हे शिकलो, असं अवधूत सांगतो. हे शिकलेलं अंगी भिनलंही आहे. त्यामुळेच योगी हा असाच, जे येईल त्यात समाधानी असतो, रस आसक्तीत कधीच गुंतलेला नसतो, असं अवधूत सांगतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2020 2:37 am

Web Title: loksatta ekatmyog part 388 zws 70
Next Stories
1 ३८७. अजगर आणि योगी
2 ३८६. अजगराची निश्चिंती!
3 ३८५. मनें मना सावधान
Just Now!
X