वृक्षापासून परिस्थितीचा स्वीकार शिकल्याचं अवधूतानं सांगितलं. दुसरी गोष्ट वृक्षानं शिकवली ती म्हणजे आतिथ्य. अवधूत सांगतो, ‘‘आणिक एक लक्षण। वृक्षापासोनि शिकलों जाण। अतिथींचे पूजाविधान। तें सावधान परियेसी॥४००॥’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय ७ वा). हे अतिथीची पूजा करणं म्हणजेच सेवा करणं कसं आहे? अवधूत सांगतो, ‘‘अतिथी आल्या वृक्षापासी। वंचनार्थु न करीच त्यासी। पत्रपुष्पफळमूळच्छायेसीं। त्वचाकाष्ठांसीं देतसे॥४०१॥’’ जवळ आलेल्या अतिथीची तो कधीच वंचना करीत नाही. त्याच्यावर तो सावली तर धरतोच; पण पानं, फुलं, फळं, मुळं- इतकंच कशाला, साल आणि लाकूडसुद्धा देऊन तो माणसाला तृप्त करीत असतो. अवधूत म्हणतो, ‘‘जो वृक्षासी प्रतिपाळी। कां जो घावो घालूनि मूळीं। दोहींसी सममेळीं। पुष्पी फळी संतुष्टी॥४०२॥’’ जो वृक्षाचं पालनपोषण करतो, त्यालाही तो सावली, पानं, फळं, साल, लाकूड मुक्तहस्ते देतोच; पण जो आपल्यावर घाव घालायला आला आहे, त्यालाही देतो. तेव्हा अतिथीला विन्मुख जाऊ देऊ नये, हा गुण योगी आणि साधूंनी वृक्षाकडून ग्रहण केला, असं अवधूत म्हणतो (अतिथीस नव्हे पराङ्मुख। हा साधूसी गुण अलोकिक। अन्न धन उदक। यथासुखें देतसे॥४०४॥ ). तर अशा प्रकारे पृथ्वीच्या भूमी, पर्वत आणि वृक्षाकडून अवधूतानं काही सद्गुणांचे संस्कार मनावर ठसवले. यात तो धरतीकडून शांती, आंतरिक अखंडता हे गुण त्यानं घेतले. पर्वताकडून तो परोपकार आणि औदार्य शिकला, तर वृक्षाकडून परिस्थितीचा स्वीकार आणि अतिथीसाठी सर्वस्व दानाची वृत्तीही शिकला. आता चराचरातला दुसरा गुरू कोण, हे अवधूत सांगणार आहे. पंचमहाभूतातील पहिली पृथ्वी ही प्रथम गुरू ठरली, तर दुसरा गुरू आहे पंचमहाभूतातीलच वायू! अवधूत सांगतो, ‘‘गुरुत्व जें वायूसी। तें दों प्रकारीं परियेसी। एक तें प्राणवृत्तीसी। बाह्यवायूसी दुसरें॥४०७॥’’ या वायूला दोन प्रकारांनी गुरुपणा आला आहे. एक आहे तो प्राणवायू आणि दुसरा आहे तो चराचरांत वातावरणात विहरत असलेला बाह्य वायू. आता तसं पाहायला गेलं तर वायू आणि प्राणवायू काही वेगवेगळा दिसतो का? तर नाही. पण चराचरांत जे वायूतत्त्व भरून आहे, ते जसं आल्हाददायक रूपात प्रकट होऊन तप्त जीवांचा श्रमपरिहार करतं, परागकण वाहून नेत निसर्गचक्र कायम राखण्यात काही प्रमाणात साह्य़ करतं, तसंच प्राणवायू पुरवत जीवनाचं चक्रही अविरत ठेवत असतं. प्राणवायूच्याच बळावर माणूस अनंत क्रियाकलाप करीत असतो. पण ज्या  प्राणाच्या जोरावर जीवनाचा डोलारा उभा असतो त्या प्राणाला जीवाप्रमाणे कर्तृत्वाच्या अहंकाराचा स्पर्श होतो का? तर नाही! तो प्राणवायू जिवाला जगवतो, पण जिवाच्या क्रियाकलापांपासून अलिप्तच असतो. अवधूत म्हणतो, ‘‘प्राणास्तव इंद्रियें सबळे। प्राणयोगें देह चळे। त्या देहकर्मा प्राणु नातळे। अलिप्तमेळे वर्ततु॥४१४॥’’

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com