News Flash

१०. अनुभव

माउलीही सांगतात, की सद्गुरूशिवाय अनुभव कळणार नाही!

माउलीही सांगतात, की सद्गुरूशिवाय अनुभव कळणार नाही! म्हणजे गोष्ट अनुभवाचीच असते, तरी ती कळत नाही. आपण जगात अनेक अपेक्षांसह, अनेक लालसा-वासनांसह विखुरलो असतो. जगानं आपल्यावर प्रेम करावं, जग आपल्याला अनुकूल असावं, यासाठी अव्याहत धडपडत असतो. आणि मोह आणि भ्रमातून सुरू असलेली ही धडपड व्यर्थ असते. जग निमित्तापुरतं आपलं असतं, जगातला प्रत्येकजण त्याच्या त्याच्या हेतूंपुरता आपलेपणानं वावरत असतो, हा अनुभव अनेकवार येऊनही आपल्याला तो कळत नाही! खेळ जुनाच असतो, पण वासना नित्यनवं रूप घेऊन नाचवत असते.. आणि त्यामुळे या मोहात अडकण्यात काही अर्थ नाही, अंती आपलीच मानसिक, भावनिक हानी आहे, हे कळावं लागतं. आर्थिक हानी भरून निघू शकते, पण मानसिक हानी भरून निघणं कठीण असतं. त्यामुळे या मनालाच अज्ञानातून बाहेर काढणाऱ्या एका सद्गुरूशी एकरूप होण्याची अतिशय गरज असते. ती ऐक्याच्या कलेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न म्हणजे हा ‘एकात्मयोग’! तुम्ही म्हणाल, पंधरवडा झाला, आपली प्रस्तावनाच सुरू आहे! पण ही प्रस्तावना निर्थक नाही. इमारत जितकी उंच तितका तिचा पाया खोलवर लागतो. हा पायाच खणण्याचं काम सुरू असताना, अहो इतकं खोलवर नुसतं खणत चाललात, मग उत्तुंग इमारत बांधणार तरी कधी, हे विचारणं जसं अप्रस्तुत आहे, तसंच या प्रस्तावनारूपी पायाचं आहे. कारण हे सदर ज्या ‘एकनाथी भागवता’वर आधारित आहे त्या ग्रंथाचा ‘सद्गुरूशी ऐक्यता’ हाच प्रधान विषय आहे. त्यामुळे सद्गुरू ऐक्यतेचं महत्त्व आधी मनाला उमगलं तर पाहिजे! तेव्हा आज सुख-दु:खमिश्रित भासणारं आपलं जे जीवन आहे ते पूर्णत: आणि खऱ्या अर्थानं सुखमय व्हावं, असं वाटत असेल, तर जगण्यातलं अज्ञान, मोह, आसक्ती, भ्रम ओसरावा लागेल. त्यासाठी सद्गुरूंना, त्यांच्या सहवासाला, त्यांच्या बोधाला आणि त्या बोधानुरूप धारणा घडवून जगण्याला पर्याय नाही! त्यासाठीच श्रीमद्भागवत महापुराणातील एकादश स्कंधावर  एकनाथ महाराजांनी केलेल्या विस्तृत टीकेचा आधार घेणारं हे सदर आहे. अर्थात एकनाथी भागवताचा विस्तार विराटच आहे. मूळ भागवतातील एकादश स्कंधातील श्लोकसंख्या पंधराशेच्या आत आहे. त्यावर नाथांचा हा विस्तार तब्बल ३१ अध्यायांचा आणि १८ हजार ओव्यांपलीकडचा आहे. त्यामुळे प्रत्येक ओवीचा मागोवा घेत गेलो, तर हे सदर कित्येक वर्षांचं होईल. त्यामुळेच प्रत्येक ओवीऐवजी महत्त्वाच्या काही ओव्यांचाच हा मागोवा राहणार आहे. त्यामुळे वाचकांना विनंती की या सदरासोबत ‘एकनाथी भागवत’ वाचण्याचा परिपाठ जर त्यांनी ठेवला तर मग मांडल्या जाणाऱ्या विषयाचा त्यांना अधिक परिचय होईल. इतकंच नव्हे, तर या सदरात मांडल्या न गेलेल्या काही ओव्यांतील मला न उमगलेला असा मनोज्ञ अर्थही वाचकांना अंतस्र्फूतीनं जाणवू शकेल. या सदरासाठी आधार केवळ सद्गुरूकृपा हाच आहे आणि ते प्रत्येक ओवीचा अर्थ जाणवून देत असले तरी माझा तेवढा आवाका नाही. त्यामुळे माझ्या मर्यादित आकलनामुळे बराचसा अर्थ निसटण्याचीही शक्यता आहे. तेव्हा वाचकांनी आपल्या चिंतनाचीही जोड या वाचनाला द्यावी. तर आता मुख्य प्रतिपाद्य विषय सुरू करण्याआधी ‘एकनाथी भागवता’चा थोडा विचार करू.

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 12:10 am

Web Title: loksatta philosophy 2
Next Stories
1 ९. संत लाडका, देव बोडका!
2 ८. अनेकांतून एकाकडे
3 ७. द्वैत कवटाळून अद्वैत!
Just Now!
X