03 June 2020

News Flash

तत्त्वबोध : तहान-भूक

आसक्त भावानं अशाश्वताचा संग्रह करून आणि त्यावर विसंबून शाश्वत सुखाची प्राप्ती होत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

माझ्या सद्गुरूंचा एक दोहा आहे. त्यात म्हटलं आहे की, ‘‘बहुत यत्न करके जो संग्रह किया है। सभी छोडकर कल तो जानाही होगा।। सही अर्थ स्वारथ का जो तू न समझा। सभी कृत बृथा पछतानाही होगा।।’’ माणूस जन्मभर सुखाच्या आशेवरच जगत असतो. हे सुख बाह्य़ जगात, प्रपंचात तो शोधत असतो. ज्या माणसांच्या आधारावर त्याचा स्वार्थ पोसला जात असतो, त्या माणसांचा भरणा आयुष्यात ज्या प्रमाणात असेल, तसंच सुखकारक वस्तूंचा संग्रह जितका साधेल तितके आपण आयुष्यात सुखी होऊ, असं त्याला वाटत असतं. म्हणून तो अशा माणसांना जोडण्यासाठी आणि वस्तूंच्या प्राप्तीसाठी धडपडत असतो. प्रपंचाचं झाड फळावं, फुलावं, टवटवीत राहावं म्हणून तो प्रत्येक फांदीवर, पाना-पानांवर पाणी शिंपडण्याचे सायास अहोरात्र करीत राहतो; पण त्या प्रपंचवृक्षाचं मूळ जो परमात्मा त्याला भक्तिप्रेमाचं जल तो कधीच अर्पण करीत नाही. मग तो वृक्ष खऱ्या अर्थानं कसा बहरावा, कसा फळावा? आसक्तीची कीड त्या झाडाला पोखरत असते. भावनिक आधाराची मोहग्रसित बांडगुळं त्या झाडावर नांदत जीवनरस शोषून घेत असतात. मग त्या प्रपंचात सुख कुठून लाभायचं? जिथं आसक्ती आहे तिथंच बंधन आहे. आसक्त भावानं अशाश्वताचा संग्रह करून आणि त्यावर विसंबून शाश्वत सुखाची प्राप्ती होत नाही. जे जे आज मिळवलं आहे ते ते इथंच सोडून एक ना एक दिवस जावंच लागणार आहे. मग जे सोडायचंच आहे त्याचा मोह मनातून काढण्याचा विचार तरी का करू नये?

एका माणसावर एक राजा खूश झाला. एका विस्तीर्ण भूप्रदेशापाशी त्याला नेऊन राजा म्हणाला, ‘‘सूर्यास्तापर्यंत जितका भूप्रदेश तू पादाक्रांत करशील, तो तुझा!’’ श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात ना? की किती मिळालं म्हणजे पुरे हे माणसाला माहीत नाही, त्यामुळे कितीही मिळालं तरी त्याला पुरेसं वाटत नाही! तसं झालं. खरं तर फार थोडी जमीन मिळाली असती तरी त्याला पुरेशी होती. तेवढय़ा जमिनीच्या जोरावर शेती झाली असती, घरदार झालं असतं, संसार झाला असता; पण ‘संध्याकाळपर्यंत पादाक्रांत करशील तेवढी जमीन तुझी’ ही मुभा कानात घुमत होती. त्यामुळे चालत जाण्याऐवजी धावत गेलो तर जास्तीत जास्त जमीन आपली होईल, या मोहानं तहानभूक विसरून क्षणाचीही उसंत न घेता तो पळत सुटला! तहान लागली तरी वाटे, आता पाणी शोधण्यात कशाला वेळ घालवा? संध्याकाळी यथेच्छ पाणी पिऊ! तीच गोष्ट भुकेचीही! यामुळे झालं काय की, धावताना दमूनभागून तो निष्प्राण होऊन त्याच धरणीवर कोसळला, जी त्याच्या मालकीची होणार होती! आपणही आरशात पाहिलं तर त्या माणसाच्या जवळ जाणारा चेहरा दिसू लागेल! आपणही असंच तर आजवर धावत आलो आहोत. कधी ते धावणं थांबवून क्षणभर स्वत:शी विचार केला नाही की, का एवढं धावतोय? त्या धावण्यात अंतरात्म्याला लागलेली शाश्वत आनंदासाठीची तहान-भूकही आपण दडपून टाकली आहे. हे धावणं संपलं की तो आनंद मिळणारच आहे किंवा धावूनच तो आनंद मिळणार आहे, अशी आपली भ्रामक भावना आहे. जीवनातल्या कर्तव्यांसाठी आवश्यक वेळ देऊनही किती तरी वेळ खरं तर आमच्या वाटय़ाला उरू शकतो; पण जे आपल्यापाशी नाही, त्यातच समाधान आहे, या भावनेनं जे आहे त्यात समाधान नाही आणि त्यामुळे त्या क्षणांतही मनाला स्वस्थता नाही.

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 2:37 am

Web Title: loksatta tatvabhodh article thirst hunger
Next Stories
1 जीवन-ध्येय
2 जीवन विचार
3 प्रपंच वास्तव
Just Now!
X