‘मी आहे’ यावरच सगळी जाणीव केंद्रित करायला श्रीनिसर्गदत्त महाराज सांगतात. याचाच अर्थ ‘मी गरीब आहे’ असो किंवा ‘मी श्रीमंत आहे’ असो; यातली गरिबी आणि श्रीमंती ही परिस्थिती आहे, तर ‘मी आहे’ ही वस्तुस्थिती आहे! परिस्थिती बदलू शकते, पण वस्तुस्थिती बदलत नाही! याचाच अर्थ मी आहे, या वस्तुस्थितीत अमुक-तमुक आहे, असा-तसा आहे हा जो भरणा असतो ना तो कायमचा टिकणारा नसतो. पण ‘मी आहे’ ही जी जाणीव आहे ती अखेरच्या श्वासापर्यंत टिकते. मग हा जो ‘मी’ आहे तो खरं तर चतन्यपुंज आहे. त्याच्यावर कित्येक ओळखींची जी झूल पांघरली गेली आहे त्यामुळे इच्छा- मोह-आसक्तीच्या वासनापुंजात हा ‘मी’ चिणला गेला आहे. तेव्हा या ओळखींच्या प्रभावातून मनानं मुक्त होत, जे खरं आंतरिक चतन्य तत्त्व आहे त्याला अनुरूप जगणं झालं, तर ते आनंदाचं आणि अर्थपूर्ण होईल! अध्यात्त्माचा मार्ग खरं तर ही जाणीव निर्माण करण्यासाठीच आहे. ही जाणीव जागी झाली ना की मग जे खरं आहे, शाश्वत आहे, अखंड आहे अशाच चतन्याच्या प्रकाशात जगणं सुरू होईल. मग आंतरिक ओढही केवळ शाश्वताचीच राहील. आता नीट लक्षात घेऊ की ओळखीच्या प्रभावातून मन मुक्त झालं पाहिजे. वरकरणी जगासमोर ती ओळख टिकेलच. म्हणजे समजा मी डॉक्टर आहे, पण माझ्या खऱ्या चतन्य स्वरूपाची जाणीव झाली, तर जगात डॉक्टर म्हणून वावरत असताना आतून मी त्या चतन्य तत्त्वाला अनुसरून जगू लागेन. माणूस स्वत:ला कुणीतरी समजून जगू लागला की कर्तृत्वाच्या अहंभावानं ग्रासला जाऊ शकतो. पण एकदा का, तो केवळ त्या चतन्य शक्तीचा अंश आहे, हे जाणवलं की हे कर्तृत्वसुद्धा प्रभुकृपेनंच आलं आहे, ही जाणीव जागृत राहते. अहंकारमुक्त कर्तृत्व मग खऱ्या अर्थानं आनंददायी ठरतं. पण तसं पाहता जो मनुष्य देह मला लाभला आहे तीसुद्धा भगवंताची कृपा नाही का? हा देह किती विलक्षण आहे? श्रीतुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला मागेही एकदा दिला होता. त्यात म्हटलं होतं की, डोळे पाहतात, पण आपण काय पाहिलं, ते सांगू शकत नाहीत कारण ते मुके आहेत! डोळ्यांनी काय पाहिलं, ते मुख सांगतं, पण ते मुख दृष्टिहीन आहे! कान ऐकतात, पण जे ऐकलं ते सांगू शकत नाहीत, कारण ते मुके आहेत! तेव्हा एका चेहऱ्यावरील अवयवांमध्येही हे विलक्षण संतुलन आणि समन्वय राखणारं ते चतन्य तत्त्व संपूर्ण देहातही तोच समन्वय राखत असतं. असा हा जो बहुमोल देह लाभला आहे ना त्याचा एक जरी अवयव निकामी झाला तर कृत्रिम बसवता येतो. पण तो त्या मूळ अवयवाइतक्या क्षमतेनं कार्य करू शकत नाही, शिवाय तो बसवणं अत्यंत खर्चीकही असतं. मग असा हा लाखमोलाचा देह आपल्याला काय किमतीत मिळाला हो? तर फुकट मिळाला. आणि जे फुकट मिळतं त्याची किंमत आपल्याला नसते! जोवर या देहाला दुखणं होत नाही, एखादा रोग ग्रासत नाही, तोवर या देहाची, या देहाद्वारे भगवंतांनं दिलेल्या अनमोल देणगीची कदर आपण करीत नाही. पर्वा करीत नाही. स्वत:च्याच चुकांनी देहदु:ख निर्माण करतो आणि ते निर्माण होताच, ‘आता कुठे गेला तो देव,’ असा प्रश्न विचारत भगवंतालाच दोषी ठरवतो. तेव्हा सगळे चमत्कार सोडा, आपण अशा अनमोल देहात जगत आहोत, या एका चमत्काराचं जरी भान ठेवलं ना, तरी निर्थक जगण्याची लाज वाटेल आणि जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची ओढही निर्माण होईल!

चैतन्य प्रेम