समर्थ रामदास यांचा एक अभंग आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘देह चिरकाल राहो। अथवा शीघ्रकाळीं जावो।।१।। तुम्हीं वस्ति केली रामीं। आस्था नाहीं देहधामी।।२।। देहासि होवो उत्तम भोग। अथवा जडोत दु:खरोग।।३।। रामीरामदास मीनला। देह दु:खावेगळा जाला।।४।।’’ देह अनेक वर्ष जगो की आताच जावो; देहाला उत्तमोत्तम सुखोपभोग मिळोत की दु:ख आणि रोग वाटय़ास येवोत; अशी स्थिती आपण कधी तरी स्वीकारू शकतो का हो? तर नाही! कल्पनेतसुद्धा आपण ही परिस्थिती स्वीकारू शकत नाही. कारण देह आहे, तर जगणं आहे. देह हाच जगण्याचा आधार आहे. देह हाच सुख मिळवण्यासाठीच्या आणि दु:ख टाळण्यासाठीच्या उपायांकरिता महत्त्वाचं साधन आहे. त्यामुळे या देहावर आपलं अतोनात प्रेम आहे. हा देह अनेक वर्ष जगावा, अशीच आपली तीव्र इच्छा आहे. अट एकच आहे, ती म्हणजे- या देहाच्या वाटय़ाला दु:ख येऊ नये! त्या देहाला रोग आणि मनाला दु:ख नसेल तर सुख आहे, अशी आपली सुखाची व्याख्या आहे. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘दु:खाचा अभाव म्हणजे सुख’ अशी आपली सुखाची दु:खावलंबी कल्पना आहे! देहाला थोडं काही होऊ द्या, आपण लगेच अस्वस्थ होतो. देहाला रोगही एक वेळ स्वीकारता येतो, पण मनाच्या दु:खाचा स्वीकार साधणं फार कठीण! ‘मनोबोधा’त समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, ‘न होता मनासारखे दु:ख मोठे!’ हे खरं आहे. परिस्थिती मनाजोगती नसली, माणसांनी अपेक्षाभंग केला किंवा ती विरोधात गेली, की क्षणार्धात क्रोध उफाळून येतो. तेव्हा आपल्याला देह हवा आहे, पण त्या देहाला देहदु:ख नको आहे! समर्थ मात्र दोन्ही टोकं स्वीकारायची तयारी दाखवतात. देह भरपूर वर्ष जगो की आताच जावो, त्याला सुख मिळो की दु:ख, या दोन्हीचा स्वीकार करण्याची त्यांची तयारी आहे. आता ही तयारी कशी साधली? तर, ‘आम्ही वस्ती केली रामीं’! आम्ही रामात वस्ती केली आहे आणि त्यामुळे ‘आस्था नाही देहधामी’! आमची देहाची आस्थाच संपली आहे! हा देह कसला आहे? तर अस्थींचा आहे. मृत्यूनंतरही या देहाची मागे उरणारी काही गोष्ट असेल ना, तर ती अस्थी आहे! मग त्या अस्थी गंगेत सोडाव्या लागतात. तर ज्या देहाला आपलं अखंड प्रेम आहे, ज्या देहाची आपल्याला अहोरात्र काळजी आहे, त्या देहाची मरणानंतरही उरणारी खूण म्हणजे अस्थी आणि त्या देहावर खोलवर असलेल्या प्रेमाला शब्द आला आस्था! रामदास म्हणतात, त्या देहाची आस्थाच उरलेली नाही. का? तर, ‘आम्ही वस्ती केली रामीं’! ‘राम’ म्हणजे शाश्वत तत्त्व. ‘राम’ म्हणजे परमस्वरूप. ‘राम’ म्हणजे परमात्ममय सद्गुरूतत्त्व! आमच्या मनातून अशाश्वताची ओढ गेली, तळमळ गेली. जे शाश्वत आहे त्याच्याशीच मन एकरूप झालं. ही एकरूपता म्हणजे ‘रामीं रामदास मीनला’! रामदास रामांमध्ये मिसळून गेले, सद्भक्त हा सद्गुरूबोधात एकजीव झाला, तरच त्याच्या अंत:करणातला अशाश्वताचा प्रभाव ओसरतो.  जोवर ही स्थिती होत नाही, तोवर दु:खाच्या पकडीतून जीव सुटत नाही, ‘देह दु:खावेगळा’ होत नाही.

chaitanyprem@gmail.com

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा