03 June 2020

News Flash

प्रपंच वास्तव

मनाला त्रिगुणांच्या प्रभावातून सोडवणारा उपाय या दृष्टीनं आम्ही कधी मंत्रांकडे पाहिलंच नाही

 

चैतन्य प्रेम

मनाला त्रिगुणांच्या प्रभावातून सोडवणारा उपाय या दृष्टीनं आम्ही कधी मंत्रांकडे पाहिलंच नाही. उलट कित्येकदा त्रिगुणमय प्रपंच जोपासण्यासाठीच तो मंत्र आम्ही राबवला. स्तोत्रांची पारायणं खूप केली, पण परायण कधी झालो नाही. प्रपंचात, प्रपंचओढींत अहोरात्र अडकलेल्या मनाला काही काळ तरी प्रपंचाच्या पकडीतून सुटता यावं, यासाठी मंदिरं साकारली. पण त्या मंदिरातही आम्ही काही क्षणांपुरतंही प्रपंचाचं बोट सोडू शकलो नाही. मंदिरातील देवाभोवती प्रदक्षिणाही घातल्या, पण आंतरिक दक्षता आणि समज वाढेल अशी प्रदक्षिणा स्वत:भोवती कधी घातलीच नाही. आपल्यातील चुकांचं दर्शन त्यातून कधी घडलंच नाही. तेव्हा या सगळ्या भजन, पूजन, पारायणामागचं खरं वर्मच आपण नजरेआड करीत असल्यानं सगळं करूनही काही खरा लाभ होत नाही. कलावती आई सांगतात, ‘‘भजन-पूजन हे सगळे देवावर प्रेम करण्याचे मार्ग आहेत. पण भजन करता करता, आपण ते कशाकरता करतो हेच विसरतो. पूजा करता करता, आपण पूजा करण्याचं जे वर्म आहे तेच सोडून देतो. वाचनाचंही तसंच. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, दासबोध वाचतो. अमकं पारायण करतो, तमकं पारायण करतो. पण त्या पोथीमध्ये काय सांगितलं आहे, इकडे कोणी लक्ष देत नाही! म्हणजे देवावर प्रेम करण्याचे जे मार्ग संतांनी दाखवले आणि त्याच मार्गानं आपण जात असलो, तरी कर्तव्य काय आहे, जे करत आहोत त्याचा उद्देश काय आहे, हेच विसरत असल्यानं खरं काही साधत नाही.’’ म्हणजे ज्या मार्गानं जाऊन संतांना देवाच्या अक्षय प्रेमाचा लाभ झाला, त्याच मार्गानं जाऊन आम्ही प्रपंचाचंच प्रेम वाढवू पाहतो! आता यात आणखी एक गंमत अशी की, देवाचं म्हणून आम्ही कितीही करीत असलो, तरी तो देव प्रपंचाइतका खरा वाटत नाही! प्रपंचातल्या खस्तांना विटून आपल्यालाही कधी उबग येतो आणि ‘नको तो प्रपंच’ अशी भावना होते. पण काही क्षणांतच पुन्हा मोहाची ठिणगी पडते आणि प्रपंचच खरा हवाहवासा वाटू लागतो. याचा अर्थ प्रपंच सोडा असा नव्हे बरं! पण प्रपंचाच्या आसक्तीत रुतणं थांबलं पाहिजे. अध्यात्माचं सोडा; व्यवहारातही प्रपंचाची रीतच अशी आहे की, तो- आज ना उद्या तुम्ही बिनमहत्त्वाचे आहात, हे वास्तव शिकवत असतो! संसारासाठी अमाप कष्ट केले, ‘माझे’पणानं त्यात जखडलो, पण कालौघात पुढच्या पिढीकडे सूत्रं गेली की आपल्या काल्पनिक सत्तेला हादरे बसतात. बरं त्यातही काही गैर नाही. आपल्याकडे सूत्रं आली तेव्हा आधीच्या पिढीला आपणही हे हादरे दिलेच होते की! तेव्हा इतकं प्रपंचातलं ममत्व खरं तर ठिसूळ आहे, मग आजच का सावध होऊ नये? जो आज ना उद्या सोडावाच लागणार आहे, तो आज देहानं न सोडता मनानं तरी का सोडू नये? देहानं सगळी कर्तव्यं करतानाच मन त्या प्रपंचात चिकटणार नाही, असा अभ्यास का करू नये? आणि हे मन देवापाशी चिकटविण्याचा आत्माभ्यास का करू नये? या घडीला देव खोटा आणि प्रपंच खरा वाटतोय; पण प्रपंच खरेपणानं कधीच आपला नसतो, हे वास्तव लक्षात घेऊन आपल्याला खोटा वाटत असलेल्या देवाचा संतांनी उच्चरवानं सांगितलेला खरेपणा खरा मानून का पाहू नये? कदाचित या जगात एक देवच खरा आपला आहे, हा संतांचा सांगावा आपल्याही अनुभूतीचा विषय होईल. प्रपंच हाच हळूहळू परमार्थ होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 12:06 am

Web Title: loksatta tatvabodh article abn 97 7
Next Stories
1 अभक्ताची भक्ती
2 तत्त्वबोध : मुक्तद्वार
3 तत्त्वबोध – महाल आणि झोपडी!
Just Now!
X