03 June 2020

News Flash

आहे अन् नाही

आपल्यापाशी जे नाही ते मिळालं तरच मी सुखी होईन, ही भावना आहे

 

चैतन्य प्रेम

आपल्यापाशी जे नाही ते मिळालं तरच मी सुखी होईन, ही भावना आहे. त्यामुळे जे आहे त्याचाही आनंद नाही! प्रत्यक्षात डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं तर जाणवेल की, आपल्याकडे जे आहे त्यापासून वंचित असलेले किती तरी लोक समाजात आहेत. मग ‘आणखी.. आणखी’ची जी हाव मनाला लागली आहे ती बरोबर आहे का? याचा अर्थ प्रयत्न करू नयेत, परिश्रम करू नयेत असा नाही. ते अवश्य करावेत. पण ते करीत असतानाच जे माझ्यापाशी आहे, मग ते ज्ञान असेल, संपत्ती असेल, अनुकूलता असेल; त्याबद्दल कृतज्ञतेची भावनाही मनात असली पाहिजे. शास्त्रज्ञ आणि तत्त्वचिंतक डॉ. मो. रा. गुण्ये यांनी ‘ज्ञानेश्वरीचे भावविश्व’ म्हणून ग्रंथ लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘माणूस जे काही मिळवतो, त्यात त्याचं एकटय़ाचं कर्तृत्व नसतं. समाजाचाही त्यासाठी हातभार लागलेला असतो.’ किती खरं आहे हे! गरिबीतून कष्टानं वर आलेला आणि कोटय़धीश झालेला एखादा उद्योगपती आपण पाहतो. पण ज्या अन्नावर त्याचा देह पोसला गेला ते पिकवणारा शेतकरी आणि शेतमजूर, ज्या घरात तो राहिला ते घर बांधणारा मजूर, त्याला शाळेत शिकवणारे शिक्षक, त्याच्या परिसराची स्वच्छता राखून रोगराईला आळा घालणारे सफाई कर्मचारी.. अहो, असे शेकडो लोक अज्ञात राहून कार्यरत असतात आणि त्यांचाही अप्रत्यक्षपणे माझ्या यशाला हातभार असतो. मग आपल्यापाशी जे नाही त्याबद्दल कुढताना या वंचितांचं स्मरण कधी होतं का हो? ते होत नाही आणि त्यामुळे स्वार्थाच्या परिघाबाहेर सहसा आमची नजरच जात नाही. मग अखंड अतृप्ती आणि अखंड असमाधानानं आमचं धावणं सुरूच राहतं. रात्री बिछान्यावर अंग टाकतानाही प्रापंचिक काळजीच्याच कुशीत आम्ही शिरतो आणि सकाळी चिंतांचीच भूपाळी आळवत उठतो. मग या जगण्याचा अर्थ काय? खरं कसं जगावं? कशासाठी- म्हणजे कोणत्या ध्येयासाठी जगावं? या प्रश्नांचा अंतर्मुख होऊन आपण विचार केला पाहिजे. जे मिळालेलं नाही त्यासाठी रडण्यात आणि कुढण्यात, जे मिळालं आहे त्याचा आनंदही आम्ही धड भोगत नाही, हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. ज्या-ज्या माणसांना आणि वस्तूंना कवटाळून आम्ही जगत आहोत त्या-त्या वस्तू आणि माणसांपासून एक ना एक दिवस आपण कायमचे दुरावणार आहोत. काळाची मुदत संपताक्षणी एक तर ते तरी माझ्यापासून दुरावतील, नाही तर मी तरी त्यांच्यापासून दुरावीन! आज आता आहे आहे.. पुढच्या क्षणाचा काही भरवसा नाही, इतकं जीवन अनिश्चित आहे. तरी आम्ही बेसावधपणा सोडत नाही! म्हणून तो दोहा सावध करीत बजावतो की, ‘‘बहुत यत्न कर के जो संग्रह किया है। सभी छोडकर कल तो जानाही होगा।।’’ केवळ स्वार्थासाठीच जगत आलो, पण खरा स्वार्थच कळला नाही! असा आनंद मिळावा की दु:ख म्हणून काही वाटय़ाला येऊच नये; नव्हे! दु:ख जरी वाटय़ाला आलं ना, तरी इतका आनंद हृदयात भरून ओसंडून वाहत असावा, की ती दु:खंही त्यात वाहून जातील! अंत:करणापर्यंत पोहोचणारच नाहीत. असं घडणं शक्य आहे का हो? संत सांगतात की, निश्चितच असं घडणं शक्य आहे!! त्यासाठी आनंदाचा मूळ स्रोत जो परमात्मा आहे त्याच्याशी सख्य जडलं पाहिजे. अंत:करण संकुचिताच्या खोडय़ातून सुटून व्यापक परमतत्त्वाशी एकरूप होत गेलं पाहिजे. ही गोष्ट कठीण नाही, कारण अभ्यासानं कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असं भगवंतानंच ‘गीते’त सांगितलं आहे, याकडे संत लक्ष वेधतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2020 12:08 am

Web Title: loksatta tatvabodh article abn 97 8
Next Stories
1 तत्त्वबोध : तहान-भूक
2 जीवन-ध्येय
3 जीवन विचार
Just Now!
X