02 June 2020

News Flash

लाट आणि समुद्र

समुद्राची रौद्र लाट वेगानं उसळत किनाऱ्याकडे झेपावते, पण ती काही कायमची टिकत नाही.

चैतन्य प्रेम

स्वामी विवेकानंद यांचं एक सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, ‘‘समस्त समुद्राकडे बघा, एकेका लाटेकडे बघू नका!’’ म्हणजे काय? तर जीवनाचा जो विराट प्रवाह आहे त्याकडे पाहा; जीवनातल्या एखाद्या संकटरूपी लाटेकडे बघून गांगरून जाऊ नका! समुद्र म्हटला की, भरती आणि ओहोटी आलीच! अगदी त्याचप्रमाणे जीवन म्हटलं की, चढ-उतार आलेच. समुद्राची रौद्र लाट वेगानं उसळत किनाऱ्याकडे झेपावते, पण ती काही कायमची टिकत नाही. ती येते तशीच शमते आणि माघारी फिरते! तशाच जीवनाच्या प्रवाहात संकटांच्या लाटा उसळतात आणि कालांतरानं शमतात आणि माघारीही फिरतात! पण उसळत येणारी लाट पाहून घाबरून पळ काढण्यापेक्षा आणि एखाद्या लाटेकडे पाहून हबकण्यापेक्षा विराट जीवनप्रवाहाचं निरीक्षण केलं, तरी मनात उमटत असलेल्या संकटाच्या प्रतिक्रियेची तीव्रता कमी होईल. आजवर किती संकटरूपी लाटा आपल्या जीवनाच्या किनाऱ्यावर आदळल्या, तेही आठवून पाहायला हरकत नाही. मग लक्षात येईल की, आज जसं संकटामुळे मी भयभीत झालो आहे वा खचून गेलो आहे, तसं आधी जेव्हा जेव्हा संकटं आली त्या त्या वेळीही मी इतकाच घाबरून गेलो होतो. मग त्या संकटांना सामोरं जाताना त्याच्या भीषण परिणामांबद्दल मी ज्या कल्पना केल्या होत्या; त्या खऱ्या ठरल्या का, प्रत्यक्षात तसं विपरीत घडलं का, याचा आढावा घेतला तर लक्षात येईल की, बऱ्याचदा संकटापेक्षा संकटाची भीतीच अधिक होती! आणि ही नित्याची बाब आहे बरं. संकटापेक्षा संकटाचा विचारच माणसाचं मन अस्थिर करतो. संकटाच्या कल्पनेनं काळजी आणि चिंतेनं मन व्याप्त होतं. समजा, एखादा प्रसंग आपल्यावर ओढवू नये, अशी तीव्र इच्छा असूनही तो प्रसंग आयुष्यात उद्भवणार आहे. तर तो प्रसंग प्रत्यक्षात उद्भवेपर्यंत आपण किती विचार करतो? ‘अमुक झालं, तर काय होईल?’, ‘तमुक झालं तर काय होईल?’ अशा उलटसुलट विचारांचा झंझावात मनात सुरू होतो. तो बहुतांश नकारात्मकच असतो. आपलं मन भीतीचंच बोट पटकन पकडतं आणि त्यामुळे आपले विचार अविचारात कधी रूपांतरित होतात, तेच आपल्याला उमगत नाही. बरं, नुसती चिंता करून, भीती बाळगून परिस्थितीत पालट होत नाही. तुम्ही दहा तास चिंता केलीत म्हणून संकट किंचितही सौम्य होत नाही. उलट चिंतेनं, काळजीनं आपण स्वत:हून मनाची शक्ती कमी करीत असतो, हे लक्षातही येत नाही. संत म्हणतात की, ‘‘चिंतेपेक्षा चिंतन करा.’’ आता कुणी म्हणेल की, चिंतेनं जर संकट टळत नाही, तर मग ते चिंतनानं टळेल का? तर तसं नाही. चिंतनानं संकट टळणार नाही, पण चिंतनानं मनाची शक्ती टिकेल आणि वाढेल. असं का? कारण चिंतनानं सकारात्मकता वाढते. सकारात्मकतेनं मनाचं बळ वाढतं. येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी होते. त्यामुळे जीवनातल्या एखाद्या संकटरूपी लाटेनं खचून न जाता आजवरच्या आपल्या आणि इतरांच्या जीवनाच्या विराट प्रवाहाकडे पाहिलं तरी मनाची उमेद वाढेल. आपल्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत जगताना ज्यांनी परिस्थितीवर मात केली, संकटांना समर्थपणे तोंड दिलं, त्यांच्या जीवनातूनही प्रेरणा घेता येईल. आकाशात काळे ढग जमतात, पण ते कायमचे नसतात. तसेच संकटांचे काळे ढगही विरतात आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पसरतो, या सत्याचं दर्शन सृष्टीनंही किती वेळा घडवलं आहे, नाही का!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2020 12:06 am

Web Title: loksatta tatvabodh article abn 97 9
Next Stories
1 तत्त्वबोध : जगण्याचं भय!
2 शाश्वत अभ्यास
3 व्यापकतेचा मार्ग
Just Now!
X