चैतन्य प्रेम

श्रीरामकृष्ण परमहंस यांनी देह ठेवला आणि त्यांचे शिष्य सैरभैर होत विखुरले. अर्थात साधनेच्या मार्गावरून कोणी ढळले नाहीत, पण वाट फुटेल तिकडे भ्रमण आणि तपस्या सुरू होती. त्याच काळात स्वामी विवेकानंद संन्यासी अवस्थेत देशाटन करत होते, तेव्हाचा एक प्रसंग आहे. हिमालयाच्या दुर्गम प्रदेशात स्वामी राहात होते. दिवसातून एक वेळ भिक्षा मागून आणावी आणि उरलेला वेळ ध्यान आणि साधनेत व्यतीत करावा, असा दिनक्रम होता. आधीच दुर्गम भाग. लोकवस्ती तुरळक आणि बहुतेक सर्वानाच गरिबीनं आपलंसं केलेलं. घरातल्या लोकांचंच पोट भरण्याची मारामार, तिथं संन्याशाला मुक्तहस्ते भिक्षा कुठून मिळावी? त्यामुळे जेमतेम भिक्षा लाभत असे. विवेकानंदांचं पोट तेवढय़ा भिक्षेनं भरत नसे. पण स्वत:च्या पोटाला चिमटा सोसून हे लोक ही भिक्षा घालत आहेत, या जाणिवेनं त्यांचं मन व्यथितही होत असे. यावर उपाय एकच, भिक्षा मागायची नाही हाच! भिक्षा न मागता झऱ्याचं पाणी पोटभर प्यावं आणि जंगलात शिरून एकांतस्थळी ध्यानस्थ व्हावं, असा दिनक्रम सुरू झाला. एकदा ते असेच निश्चल ध्यानस्थ बसले होते. बऱ्याच वेळानं त्यांनी डोळे उघडले, तर समोर एक ढाण्या वाघ उभा होता. त्याच्या हिरव्याजर्द पिवळसर डोळ्यांत भक्ष्याला न्याहाळणारी भूक होती. स्वामींनी मंदस्मित केलं. वाघ जणू भिक्षेला आला होता! आपल्यामुळे निदान एका जीवाची तरी भूक भागणार आहे, या विचारानं आनंदून स्वामींनी डोळे मिटले आणि वाघ झेपावण्याची वाट पाहू लागले. काही क्षण तसेच सरले. त्यांनी आश्चर्यानं डोळे उघडून पाहिलं, तर तो वाघ दूर निघून जाताना दिसला. त्या वाघाच्या डोळ्यांत दिसलेली भूक खोटी नव्हती आणि आता त्याचं गुर्गुरत जंगलात जाणंही खोटं नव्हतं. हा प्रसंग नंतर आपल्या गुरूबंधूंना सांगताना स्वामीजी उद्गारले की, ‘‘माझ्याभोवती परमेश्वरी कृपेचं कवच आहे आणि त्यामुळेच माझं रक्षण झालं आहे, हे मला जाणवलं. माझ्या हातून काही कार्य व्हायचं आहे आणि ते पार पडेपर्यंत माझी या जगातून सुटका नाही, हे मला पुरतं समजलं होतंच; पण ईश्वर माझं रक्षण करीत आहे, हेदेखील कळलं होतं.’’ हे संकट सामान्य नव्हतं. प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा होता. त्यापासून बचावाचा प्रयत्न करण्याचंही बळ नव्हतं. पण तरीही स्वामी निर्भय, निश्चिंत राहिले आणि मग भुकेला असूनही वाघ परत गेल्याचं दिसताच त्यांना एक सत्य गवसलं की, साधकाचा जन्म कोणत्या ना कोणत्या कारणासाठी झालेला असतो. काहीतरी कार्य भगवंतानं सोपवलेलं असतं. त्या कार्याशी तो प्रामाणिक असेल आणि साधनानिष्ठही असेल, तर परमेश्वर त्याचं रक्षण करतच असतो. आता खरं पाहता सर्वसामान्य माणूसही प्रारब्धाचं बोट पकडून जन्माला आलेला असतो. जन्माच्या क्षणीच त्याचा मृत्यूही कधी, कसा, कुठे आणि का होणार, हे ठरलेलं असतं. मग जगत असताना मृत्यूची भीती बाळगून का जगावं? अर्थात, याचा अर्थ बेफिकीरीनं जगावं, दुसऱ्याचं जगणं धोक्यात येईल असं वागावं, असा नव्हे. पण मृत्यूच्या भीतीनं मरतुकडं जीवन जगण्याऐवजी आपल्या जगण्याचं काय कारण असावं, याचा शोध सुरू करावा. आपलं जगणं निर्थक होऊ नये, अर्थपूर्ण व्हावं, असाही प्रयत्न असावा. जीवनातल्या प्रत्येक क्षणाचं मोल लक्षात ठेवावं, कारण प्रत्येक क्षण लाखमोलाचा आहे आणि कितीही पैसे दिलेत तरी एकदा गेलेला क्षण पुन्हा अनुभवायला मिळणार नाही!