जीवन अशाश्वत आहे, हे कोण जाणत नाही? पण आजच्या वैश्विक अनारोग्याच्या संकटामुळे जीवनाची अनिश्चितता अधिकच तीव्रपणे जाणवू लागली आहे. एक साधकदेखील माझ्याशी बोलताना अनाहूतपणे म्हणून गेला की, ‘‘मला मृत्यूची भीती वाटत नाही हो, पण जगण्याची भीती वाटू लागलेय!’’ माझ्या मनाला हे ऐकून धक्का बसला. अहो, आजवर सगळं तत्त्वज्ञान हे आत्म्याच्या अमरत्वाचे दाखले देत मृत्यूचं भय सोडायला शिकवत होतं. पण आता मृत्यूचं भय कमी वाटावं इतकं जगण्याचं भय वाढतंय की काय, असा प्रश्नही मला अस्वस्थ करून गेला. पण जगण्यापेक्षा मरण सोपं वाटणं, ही गोष्ट कधीच चांगली नाही. एवढंच नाही, तर सनातन तत्त्वज्ञानाच्या आधारावर सांगायचं तर- जगण्यातले जे प्रश्न असतात ना, ते मरणानं कधीच सुटत नाहीत! त्यासाठी जीवनालाच सामोरं जावं लागतं! मृत्यूला कवटाळून प्रश्न सुटत नाहीतच, उलट आपल्याच जवळच्या अन्य काही जणांच्या जीवनात नाहक नवे प्रश्न निर्माण होतात. प्रारब्ध हे आपल्याच चांगल्या वा वाईट कर्माचं फळ असतं आणि ते भोगूनच संपवावं लागतं. अर्थात, चुका सुधारणारी कृती आणि आपल्या वाटय़ाला आलेली कर्तव्यं पार पाडावीच लागतात. ती पार पाडताना मन खचून जावं, अशीही परिस्थिती निर्माण होत असते. पण तरीही नाउमेद होऊन चालत नाही. सम्राट अकबराच्या उजव्या हाताच्या बोटात एक अंगठी होती. तिच्यावर एक मंत्र कोरला होता. काय होता तो मंत्र? तर, ‘हेही दिवस जातील’! क्षणोक्षणी राजाचं लक्ष या अंगठीकडे जायचं. मग प्रसंग सुखाचा असला, हर्षोल्हासाचा असला, तरी ही अंगठी स्मरण करून द्यायची की, ‘हेही दिवस जातील’! आणि प्रसंग प्रतिकूल असला, मनानं हताश व्हावं, निराश व्हावं, खचून जावं असा असला, तरी हीच अंगठी सांगायची, ‘हेही दिवस जातील’! आपणही हा मंत्र मनात का जपू नये? त्यामुळे सुखानं शेफारणं आणि दु:खानं ढासळणं, या दोन्ही टोकांवर आपण सुरक्षित राहू. मृत्यू कोणत्याही क्षणी येणं ही गोष्ट अटळ आहे. आजच्या अनारोग्याच्या वैश्विक संकटाआधीही ही स्थिती होतीच की! मृत्यू हा अटळच असतो, पण त्याच्या भीतीनं खचून, जगण्याची संधी का टाळायची? तेव्हा मृत्यूचा नाही, तर जगण्याचाच विचार आपण करायला हवा. ते जगणं कसं अर्थपूर्ण, परिपूर्ण होईल याचाच विचार करायला हवा. जगण्याचं मोल फार फार अलौकिक आहे. ही सृष्टी विराट आणि अद्भुत आहे. या सृष्टीत जीवनाचं संगीतच भरून आहे. वाहत्या नद्या, अथांग सागर, अगणित वृक्षवेली, त्यावर उमलणारी अनंत रंगांची फुलं.. सृष्टीतली प्रत्येक गोष्ट जगण्यातला आनंदच दर्शवते. सगळ्या प्रकारचे प्रवाह सामावून घेणारे विराटपणाचे संस्कार समुद्र बिंबवतो. अथक वाहतं राहत व्यापकत्वात मिसळण्याची वृत्ती नदी शिकवते. फुलं, पानं, फळांनी लगडून निर्लिप्त परोपकाराचे सहज संस्कार वृक्ष ठसवतात. सृष्टीतली प्रत्येक गोष्ट जगण्याचा पाठ शिकवत असताना, सर्वाधिक क्षमतांनी युक्त देह लाभूनही आपण जर जीवनाकडे पाठ फिरवत असू, तर आपल्यासारखे करंटे आपणच. तेव्हा मरणाचंच नव्हे, तर जगण्याचं भयही न बाळगता आपण जीवनाला सकारात्मक मनानं सामोरं गेलं पाहिजे. मरणभयाचा मृत्यू साधत जीवनानंदाचा जन्म आपण साधला पाहिजे. जरा मनाचे डोळे उघडून जगाकडे पाहिलं किंवा ती दृष्टी आत वळवून अंतर्मनात डोकावलो ना, तरी त्यासाठी आवश्यक शक्तीचे स्रोत सहज दृष्टीस पडतील!

– चैतन्य प्रेम