22 October 2020

News Flash

तत्त्वबोध : सुख-निश्चय

सुखानं आपण आत्मनिर्भर होण्याऐवजी सुखकारक भासणाऱ्या साधनांसाठी परावलंबी झालो, लाचार झालो.

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम

मरणभय न बाळगता जीवनानंद भोगत जगायचा निश्चय आपण केला पाहिजे. त्यासाठी संतांच्याच बोधाचा आधार घेत आपण जीवन घडवलं पाहिजे. खरं सुख मिळवून जीवन जगण्याची कला अगणित संत-सत्पुरुषांनी आपल्याला शिकवली आहे. या भूमीत रुजलेले ते संस्कार कधीच नष्ट होणार नाहीत. ते आनंदाचे, निर्भयतेचे, नि:शंकतेचे संस्कार आपल्यातही रुजावेत, असं वाटत असेल तर प्रथम चिंतेची सवय सोडून चिंतनाची सवय जडवली पाहिजे. चिंतन म्हणजे नुसता विचार करीत बसणं नव्हे बरं! तर चित्त आणि तन अर्थात अंतरंग आणि बहिरंग- म्हणजेच देह आणि मनाला सकारात्मकतेचं वळण लावणारा, आचरणातून अनुभूतीचा आनंद देणारा सद्विचार अंत:करणात घोळवणं म्हणजे चिंतन आहे! बघा, चिंतनापाठोपाठ त्याला अनुरूप कृती घडली नाही, तर चिंतन झालेलंच नाही, हे लक्षात ठेवा. चिंतनातून निर्णयापर्यंत येता आलंच पाहिजे. चिंतन कशाचं करायचं? तर प्रथम आपल्या जीवनप्रवाहाचं करावं. आपल्या जीवनातील सुखाचे आणि दु:खाचे प्रसंग आठवून पाहावेत. दोन्ही प्रकारचे ते प्रसंग टिकले का, ते आठवून पाहावं. मग लक्षात येईल की, सुखाचे क्षण जसे आले तसे गेले व दु:खही कायमचं सोबतीला राहिलं नाही. मग सुखानं आपल्याला शिकवलं की दु:खानं, याचा विचार करावा. मग लक्षात येईल की, दु:खानंच आपल्याला जागं होण्याची, जीवनाच्या हेतूचा शोध घेण्याची, कणखर बनण्याची संधी दिली. सुखानं आपण आत्मनिर्भर होण्याऐवजी सुखकारक भासणाऱ्या साधनांसाठी परावलंबी झालो, लाचार झालो. सुखाची तृप्ती फार थोडा काळ टिकली, पण ते सुख गमावण्याची भीती सुखाला चिकटूनच होती! तेव्हा दु:खांनी आपल्याला खूप काही शिकवलं, हे जाणवून घडून गेलेल्या व्यक्तिगत दु:खाबाबतची तक्रार मावळू लागेल. जी माणसं त्या दु:खाला कारणीभूत ठरली, त्यांच्याबाबतही आश्चर्यकारक असा कृतज्ञ भाव मनात येईल! जिथं अपेक्षा आल्या तिथं भविष्यात उपेक्षा येणं अटळ आहे, हे जाणवून मन अपेक्षामुक्त होण्याचा अभ्यास करू लागेल. मन जसजसं या चिंता, अपेक्षांच्या ओझ्यातून मुक्त होत जाईल ना, तेव्हा खऱ्या सुखाचा मार्ग प्रकाशमान होऊ लागेल. त्या मार्गानं जायचा अवकाश, की सद्बोध, सद्प्रेरणांचा अखंड प्रवाह अंतर्मनात वाहू लागेल! तोच पुढचा मार्ग दाखवील. तेव्हा भीतीच्या जागी निर्भयतेचा, नकारात्मकतेच्या जागी सकारात्मकतेचा अभ्यास आपण सुरू केला पाहिजे. तो अभ्यासच आपलं मनोबळ वाढवील व टिकवील! वाचकहो, वैश्विक अनारोग्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून या भागापर्यंत- म्हणजे जवळपास दोन महिने ‘एकनाथी भागवता’च्या नियमित चिंतनाला ‘स्वल्पविराम’ दिला होता. आता त्या चिंतनाला म्हणजे ‘एकात्मयोग’ सदराला आपण सोमवारपासून पुन्हा प्रारंभ करणार आहोत. तरी माउलींच्या शब्दांत सांगायचं, तर ‘अवधान एकले दिजे’!

chaitanyprem@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 2:59 am

Web Title: loksatta tatvabodh article happiness determination zws 70
Next Stories
1 मनोपासना
2 सुख-दु:ख किनारे
3 लाट आणि समुद्र
Just Now!
X