– चैतन्य प्रेम

माणसाच्या मनात सदोदित इच्छा उत्पन्न होत असतात. यांपैकी अनेक इच्छा या अवास्तवच असतात. त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून तो देवाची आळवणी करतो. ही सवय अगदी लहानपणापासून असते. प्रयत्न न करता किंवा प्रयत्नांत कुचराई करूनही देवानं त्या इच्छेची पूर्तता करावी, अशी आपली भावना असते. पण श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘आपल्या सगळ्याच मागण्या भगवंत पूर्ण करीत नाही ही त्याची मोठी कृपाच आहे.’’ कारण आपल्या मागण्या या त्या क्षणी जरी सुखाच्या वाटत असल्या तरी त्या खरं तर आपल्या हिताविरुद्धच असतात. ते त्या क्षणी कळत नाही. पण सद्गुरू ते जाणतात. पण आपलं मन ते मानत नसतं. देवानं इच्छा पुरवावी म्हणून देवाला साकडं घालू लागतं. देवाची ‘भक्ती’ही करू लागतं. ही भक्ती सकाम म्हणजे कामनेसाठी आणि कामनेपुरती असते. धुंडामहाराज देगलूरकर म्हणत की, ‘‘भोगासाठी होणारे भजन कधीही अखंड होत नाही. अखंड भजनाकरता संतकृपेचीच आवश्यकता असते. तसंच लौकिक कामना चित्तात धरून केलेली पूजा ही भक्ती नव्हे! कारण यात पूज्यावर खरे प्रेम नसते.’’ सुखभोग प्राप्त व्हावा यासाठी जे भजन केलं जातं त्या भजनात सगळं लक्ष भौतिक भोगाकडेच असतं. तो प्राप्त होताच भजनाची ‘गरज’ संपते! त्याचप्रमाणे भौतिकात अमुक व्हावं, या संकल्पासाठी केलेल्या पूजेतही भौतिकात अपेक्षित ते घडण्यावरच प्रेम असतं. भगवंत मात्र प्रत्येक इच्छा पूर्ण करीत नाही. त्यानं ती करावी तरी का? पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात, ‘‘आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या इच्छेनुसार भगवान नाचू लागेल, तर त्याचे भगवानपणच खलास होईल. भगवंताला एक स्वतंत्र ताल आहे. त्या तालावर तुम्हाला नाचायचे असेल तर नाचा. नाचायचे नसेल तर नाचू नका, पण त्यामुळे तुम्ही फेकले जाल.’’ भगवंताचा ताल हा आंतरिक समतोलाचा आहे. तो जीवनप्रवाहाला सुसंगत आहे. भगवंताची इच्छा ही आत्मस्वरूपाशी एकरूप आहे. त्यानुसार आपण जगण्याचा प्रयत्न केला, तर आपलं जगणं सुसंगत होईल. तसं जगलो नाही, तर  जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकून राहू. भगवंताप्रमाणेच जगानंही आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात असं आपल्याला वाटत असतं. त्यासाठी शक्य तिथे आपण फर्मानही सोडतो. पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात की, ‘‘माणसाला आज्ञा करण्याची हौस आहे. आपल्यात मालकी हक्काची भावना आहे म्हणून आज्ञा करावीशी वाटते. आज्ञा केली, पण ती दुसऱ्यानं पाळली नाही की संताप होतो. तसंच माणूस अनंत इच्छाही करतो. पण इच्छा सफल झाली नाही की संताप होतो. इच्छा व आज्ञा असा अंत:संताप (आंतरिक अशांती) निर्माण करतात. त्यांच्यावर ताबा आला तर अंत:संताप होणार नाही.’’ जगानं आपल्या आज्ञेचं उल्लंघन केलं, आपल्या इच्छेची पूर्तता केली नाही, तर आपल्या अंत:करणात अशांती निर्माण होते. क्षोभ उत्पन्न होतो. पण आपल्याला जे हवं आहे ते आपल्या प्रयत्नांनी मिळवलं पाहिजे. ते हिताचं असेल, तर प्रयत्नांना यश येईल आणि इच्छेनुसार गोष्टी घडतील. ते जर हिताचं नसेल, तर इच्छापूर्तीत बाधा येईल, हे साधकानं स्वीकारलं पाहिजे. प्रयत्नांना यश आलं नाही, तर नव्यानं प्रयत्न अवश्य करून पाहावेत. आधीच्या प्रयत्नांत काही चुका घडल्या का, याचाही विचार करून त्यानुसार योग्य ते बदल करून पाहावेत. पण त्यानंतर जे घडेल ते स्वीकारावं, असं सद्गुरूंचं सांगणं असतं.