चैतन्य प्रेम

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘या झोपडीत माझ्या..’ या भजनाची काही कडवी आपण पाहात आहोत. पहिल्या कडव्यातील ‘महाल’ आणि ‘झोपडी’ या रूपकांचा आध्यात्मिक अंगानं वेगळा अर्थ आपण पाहिला. महाल म्हणजे अहंकाराचा विस्तार. कबीरांना मानणारा एक रजपूत राजा होता. राणा वीरसिंह हे त्याचं नाव. त्यानं एक मोठा महाल बांधला होता. कबीरांनी एकदा तरी आपल्या राजप्रासादास भेट द्यावी, असं त्याला वाटत असे. तो योग आला. महाल पाहून झाल्यावर राजानं कबीरांना स्वाभाविकपणे विचारलं की, ‘‘गुरुदेव, महाल कसा वाटला?’’ कबीर म्हणाले, ‘‘एक दोष आहे बरं!’’ त्यानं आश्चर्यानं विचारलं, ‘‘काय दोष आहे?’’ म्हणाले, ‘‘हा कायमचा टिकणारा नाही! इतकंच काय, तर तो ज्यानं बांधला आहे तोसुद्धा कायमचा टिकणारा नाही!’’ म्हणजे काय? तर माणूस जे जे दृश्यात उभारतो, ते आज ना उद्या कालौघात नष्ट होतं. पण अदृश्यात तो जे जे काही घडवतो किंवा घडायला वाव देतो, ते पटकन नष्ट होत नाही. दृश्यातल्या पसाऱ्याचं मूळ ज्या अदृश्य, सूक्ष्म वासनेत असतं ती वासना जन्मोजन्मी नष्ट होत नाही. त्या वासनात्मक ओढी देहभावालाच चिकटून असतात आणि त्यामुळे अंत:करण अहंकार, भ्रम, मोह, आसक्तीनं व्याप्त असतं. त्या वासना जर सद्वासनेत परिवर्तित झाल्या, देहभावाऐवजी देवभावाशी जोडल्या गेल्या, तर अहंकाराचा निरास होऊन अंत:करण शुद्ध भावानं व्याप्त होतं. पण हे आपल्याही जीवनात घडावं, असं वाटत असेल, तर त्यासाठी एकच उपाय आहे! तो कोणता? तर तुकडोजी महाराज सांगतात :

‘‘भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे।

प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या।।’’

जर अंत:करणाची स्थिती विशुद्ध भक्तीमय हवी असेल, तर एकच उपाय म्हणजे- भूमीवर पड आणि ताऱ्यांकडे पाहा! थोडक्यात, प्रपंचरूपी भूमीवरच विचरण कर, वास्तवाची भूमी सोडू नकोस- पण त्यात गुरफटूही नकोस. माथा नेहमी उन्नत ठेव, उन्मत्त नको! डोक्यात सडके विचार नकोत, उदात्त विचारच घोळू देत. ताऱ्यांकडे पाहण्याचा आणखी एक अर्थ आहे. तारे कधी दिसतात? तर रात्री दिसतात. तारे जसा माणूस आनंदासाठी पाहतो, त्याचप्रमाणे ते दिशादर्शनही करतात. तेव्हा रात्र म्हणजे अज्ञान. जीवनातलं अज्ञान मावळलेलं नाही. अशा वेळी ताऱ्यांच्या साहाय्यानं माणसाला ज्याप्रमाणे योग्य दिशा कळते, त्याप्रमाणे सद्गुरू-बोधरूपी अढळ ध्रुवताऱ्याकडे लक्ष दे, योग्य दिशेनं जा, असंच जणू हा चरण सुचवतो. माणूस भूमीवर पडतो त्याला आणखी एक वाक्प्रयोग आहे तो म्हणजे- ‘जमिनीवर अंग टाकणे’! थोडक्यात, सर्व भार भूमीवर टाकायचा आहे. ही भूमी म्हणजे मूळ आधार आहे. ती सद्गुरूच आहे. तेव्हा सद्गुरूवर सर्व चिंतारूपी भार टाकून बोधविचारात माथा ठेव. आणखी काय करा? तर ‘प्रभुनाम नित्य गावे’! मुखानं ‘अहं’च्या भजनात न रमता ‘सोऽहं’ भावात एकरूप व्हा! मनुष्य जन्माला आल्यावर अहंभावाचा महाल पाडून टाकायची संधी प्रत्येकाला लाभत आहे. त्यासाठी दुनियेच्या झगमगाटापासून दूर असलेला गुरूबोधानुसारचा स्वाध्याय करण्यास मुक्त वाव आहे. भक्तीच्या या मार्गावर कोणतंही ओझं नाही, उलट सगळी ओझी अलगद दूर होणार आहेत. म्हणूनच महाराज सांगतात, ‘‘येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा। कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या।।’’