चैतन्य प्रेम

धारणा आणि प्रत्यक्ष आचरण अशा सूक्ष्म आणि स्थूल या दोन्ही पातळ्यांवर साधकाच्या जीवननिष्ठेचा कस लागत असतो. खरं पाहता, जीवनाचे दोन भाग नाहीत. जीवन एकच आहे. पण आपण त्याचे भौतिक आणि आध्यात्मिक असे दोन सूक्ष्म कप्पे मानतो. अर्थात, भौतिक म्हणजे प्रपंच आणि आध्यात्मिक म्हणजे परमार्थ. या दोन्ही संकल्पनांच्या आकलनात आपण घोळ घालतो. त्यामुळे आपला प्रपंच हाच परमार्थ होण्याऐवजी परमार्थ हाच प्रपंच होतो. आधी म्हटल्याप्रमाणे, साधन पथावर येण्याआधी प्रपंच आणि परमार्थ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असं आपण मानत होतो. ‘परमार्थ’ म्हणजे काय? तर देवाची पूजाअर्चा, उपासतापास, एखादं व्रत, नित्याचं काही पारायण, तीर्थयात्रा, उत्सव, भजन म्हणणं वा भगवंताचं नाम घेणं- अशी ‘परमार्था’ची काहीशी ढोबळ रूपरेषा मनात असते. त्यामुळे हा ‘परमार्थ’ करण्यासाठी सुरुवातीला प्रपंचातलाच काही वेळ द्यावा लागतो. या किंवा यातील काही गोष्टी पार पाडल्या की ‘परमार्थ’ पार पडला, असंही आपण मानतो! प्रपंचातला कमीत कमी वेळ आपण या परमार्थाला देतो आणि त्यातही ज्या वेळी काहीच करायचं नसतं, तेव्हा आपण तो उरलासुरला वेळ ‘परमार्था’ला म्हणून देत असतो. खरं पाहता, ‘प्रपंच’ कुणाचा असतो? तर ‘मी’ हा या प्रपंचाचा मुख्य पाया असतो. ‘मी’ म्हणजेच देह आणि या देहाला अनुकूल असे जे कुणी माझ्या जीवनात आहेत त्या ‘माझे’शी देहभावानं जोडलेल्या संबंधांचा गुंता म्हणजे माझा प्रपंच झाला आहे. तो ‘मी’ आणि ‘माझे’शी जखडल्यानं संकुचित झाला आहे. आता या प्रपंचाचा पायाच खरं तर ठिसूळ आहे. कारण तो ज्या ‘मी’च्या मुख्य आधारावर उभा आहे तो ‘मी’ ठिसूळ आहे, अशाश्वत आहे! कारण हा ‘मी’ काळाच्याच पकडीत आहे. तसंच हा ‘मी’ ज्या ‘माझे’साठी तळमळत आहे, तेदेखील तितकेच अशाश्वत आहेत. हाच संकुचित प्रपंच जेव्हा व्यापक होतो, तेव्हा तोच खरा परमार्थ होतो. मात्र ही काही स्वबळावर सहज साध्य होणारी गोष्ट नाही. त्यासाठी जो खऱ्या अर्थानं व्यापक आहे, त्याच्या बोधानुसार जगण्याचा प्रयत्न करणं हाच अभ्यास अनिवार्य आहे. हा अभ्यास जितक्या ठोस आधारावर, चिकाटीनं सुरू राहील, त्या गतीनं ‘मी’चा विलय होत जाईल आणि ‘तू’ची लय निर्माण होऊन जगणं व्यापक होईल. जिथं स्वार्थ संपतो आणि स्वपीडेइतकंच- किंबहुना स्वपीडेहून अधिक परपीडेचं भान येतं, ते जगणं इतरांसाठीही आनंदाचंच होतं, नाही का? आता काहींना अगदी स्वाभाविकपणे आणि प्रामाणिकपणे असं वाटेल की, मनाचा संकुचितपणा जाऊन ते व्यापक होण्यासाठी परमात्मा किंवा आध्यात्मिक सत्पुरुषाची कासच का धरावी? समाजसेवेनं तसंच शुद्ध तात्त्विक तर्कनिष्ठ विचारानंही माणूस मनानं व्यापक होऊ शकतोच की? तर हो, अशी काही उदाहरणं आहेत आणि निदान माणूस म्हणून जगण्याचं किमान भान येण्यासाठी असे आधारही उपयुक्त आहेत, यात शंका नाही. पण त्या मार्गानं खरी व्यापकता न गवसता, मधल्या मध्ये अडकण्याचा धोकाही मोठा आहे. आमच्या विचारानंच समाजाचं खरं भलं होईल, असा दुराग्रहदेखील प्रसवण्याचा धोका असतो. त्यामुळे त्या व्यापकतेला मर्यादा आहे. तसंच थोडी बुद्धी विकसित झाली किंवा आपल्यामुळे समाजाचं भलं होत आहे, असा सूक्ष्म भाव निर्माण झाला तरी अहंकाराच्या जाळ्यात अडकण्याचा धोका जास्त. त्यामुळे जिथं ‘मी’चा खरा निरास होत जातो आणि भक्तीप्रेमाचा विकास होत जातो तो मार्ग अधिक सोयीचा, असा संतांचाही सांगावा आहे.