03 June 2020

News Flash

भेद-अभेद

भेद हे अन्यायाचं, वर्चस्व भावना पोसण्याचं कारण होता कामा नये.

चैतन्य प्रेम

समभाव अर्थात समतेचं तत्त्व साधकाच्या जीवनात बाणलं पाहिजे, यावर संक्षेपानं आपण विचार केला. हे समत्व आपल्या अंत:करणातही असलं पाहिजे, हेही आपण पाहिलं. पण समतेचा अर्थ नेमका काय असला पाहिजे? समता म्हणजे सगळं काही एकाच साच्यात बसवायचं का? श्रीगुलाबराव महाराज यांनी समतेची मनोज्ञ व्याख्या केली आहे. ते म्हणतात, ‘‘समता म्हणजे सर्व वस्तूंच्या ठिकाणी परमेश्वर एकच आहे असे समजणे, पण भेद न मोडणे!’’ (‘सुबोध हिंदूधर्म’, पृ. १०२) इथं ‘भेद’ म्हणजे विषमता नव्हे, तर भेद म्हणजे वैविध्य! या मुद्दय़ाच्या पुष्टीसाठी श्रीगुलाबराव महाराज पुढे सांगतात, ‘‘भिंत आणि चूल या दोन्ही मातीच्याच वस्तू आहेत, पण भिंतीवर स्वयंपाक होऊ शकत नाही. कार्यदृष्टीने या दोहोंमध्ये भेद, पण कारणदृष्टीने अभेद समजावा. बुगडी, बाळी, सरी हे सर्व सोन्याचेच अलंकार आहेत, पण बाळी-बुगडी कानांत घालतात, तर सरी गळ्यात घालतात. या सर्व वस्तू ज्यापासून झाल्या त्याचे कारण एक (म्हणजे सोने), पण कार्यात भेद असतो. तो भेद मोडून टाकणे चांगले नाही.’’ याचा अर्थ असा की, या चराचरांत भेद म्हणजे वैविध्य आहे, पण त्याचं मूलतत्त्व एकच आहे- ते म्हणजे चैतन्य! त्या मूळ तत्त्वाची जाण सुटता कामा नये. भेद हे अन्यायाचं, वर्चस्व भावना पोसण्याचं कारण होता कामा नये. ते तसं जेव्हा होतं तेव्हा सर्व काही एकरंगी, एकसाची, एकांगी करण्याचा दुराग्रह उत्पन्न होतो. पण ही अवघी सृष्टीच अनेकरंगी, अनेकांगी आणि अनेकरूपी आहे. तिला एका साच्यात बसवणं म्हणजे समता नव्हे. पण त्या चराचरांमागचं एकच एक मूलतत्त्व जे चैतन्य, त्याचं भान वाढलं पाहिजे. समर्थ रामदासही म्हणतात ना.. ‘‘आपणास चिमोटा घेतला। तेणे कासाविस जाला। आपणावरोनी दुसऱ्याला। राखत जावे।।’’ म्हणजे आपल्याला चिमटा काढला तर जशी वेदना होते, तशीच वेदना इतरांनाही चिमटा काढला तर होते, हे जाणून इतरांशी दु:खकारक वर्तन करू नये. ही समतेची दृष्टी आहे. बरं, चराचरांत जे भेद आहेत ते नैसर्गिक आहेत. पण अनेक भेद मनुष्यनिर्मितही आहेत. उदाहरणार्थ, साक्षर-निरक्षर, गरीब-श्रीमंत, वगैरे. परिस्थितीनं निर्माण झालेले हे भेद परिस्थिती पालटताच मिटू शकतात. तरीही कोणी कोणत्याही परिस्थितीत असला आणि त्याच्या वाटय़ाला परिस्थितीनुरूप भेद आले असले, तरी तो माणूसच आहे, चैतन्य तत्त्वाच्याच आधारानं मी आणि तो दोघं अस्तित्वात आहोत, हे भान सुटता कामा नये. माणसाशी माणुसकीनं वागता आलं पाहिजे. समभावाचा तो अर्थ आहे. स्वामी विवेकानंद म्हणत की, ‘‘या चराचरांतला प्रत्येक जीव हा पूर्णत्वाच्याच दिशेनं अग्रेसर होत आहे!’’ माणसाला सूक्ष्माची शुद्ध जाणीव नाही; पण डोळ्यांना दिसणारं, त्याच्या अवतीभवती पसरलेलं आणि ज्यात तो जगत आहे ते स्थूल जग त्याच्या दृढ परिचयाचं आहे. त्यामुळे साहजिकच या स्थूल जगातली अपूर्णता त्याला प्रथम टोचते. मग ती दूर करण्यामागे तो लागतो. प्रपंचातली अपूर्णता, व्यक्तिमत्त्वातली अपूर्णता, सामाजिक स्थानातली अपूर्णता तो दूर करण्यासाठी धडपडत असतो. त्याच्या या संघर्षांला माणुसकीच्या नात्यातून जमेल तितकं सहकार्य करणं, हेही आपलं कर्तव्य आहे. हा ‘भेद’ पुसत असतानाच आपल्या अंतरंगात डोकावता आलं पाहिजे. आतला भेद लोपला पाहिजे. जग बदलायचं तेव्हा बदलेल, आपण मात्र आपल्यात विशुद्ध पालट घडविणारा जो आत्माभ्यास आहे, तो सुरू केलाच पाहिजे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2020 12:05 am

Web Title: loksatta tatvbodh article distinction abn 97
Next Stories
1 अशांतीचं मूळ
2 तत्त्वबोध : शांती आणि शक्ती
3 समाज-सूक्त
Just Now!
X