आपला देह हाच या जगात वावरण्याचा एकमेव आधार असतो. त्यामुळे या देहाला आपण सदैव जपत असतो. त्याची काळजी घेत असतो. आपलं बाह्य़ रूप सुंदर असावं, असं आपल्याला वाटत असतं. पण नुसत्या शरीराची काळजी घेऊन काही भागत नाही. माणूस म्हणजे नुसतं त्याचं शरीर नव्हे! तर देहाइतकंच त्याचं मनही फार महत्त्वाचं असतं. पण गंमत अशी की, हे मन काही शरीरात अमुकच जागी असतं, असं नव्हे. ते देहाला, देहजाणिवेला व्यापून आणखीही उरलेलंच असतं! या मनाचं आरोग्य खरं तर खूप महत्त्वाचं आहे. कारण या मनाचा थेट परिणाम देहावर होत असतो. मन खचलं असेल तर शरीरही खचतं, निराशेनं झाकोळलं जातं. पण हेच मन आत्मविश्वासानं भरलेलं असेल आणि शरीराला भले रोगानं ग्रासलेलं असेल, तरी मन त्यावर मात करत निर्धारानं त्या रोगाविरोधात उभं ठाकतं. तेव्हा शारीरिक आरोग्याबरोबरच, किंबहुना त्याहून अधिक काळजी आपण मानसिक आरोग्याची घेतली पाहिजे. आपण मात्र शारीरिक आरोग्याकडे जसं लक्ष देतो तसं मनाकडे देत नाही. पंत महाराज बाळेकुंद्रीकर म्हणतात, ‘‘स्थूल शरीर हे एका जागृतावस्थेत आमच्या उपयोगी पडतं म्हणून आम्ही त्या शरीराचं पोषण, मुंडण आणि अलंकरण करण्याकरिता धडपडत असतो. पण मन हे स्थूल आणि सूक्ष्म शरीरामध्ये फिरत असून जागृत आणि स्वप्नावस्थेतही हजर असतं. पण अशा या आम्हाला कधीही सोडून न राहणाऱ्या मनाचं पोषण, मुंडण आणि अलंकरण याकडे आमचं लक्ष जात नाही. केवढा हा अविचार!’’ शरीराचं पोषण, मुंडण आणि अलंकरण आपण जाणतो. शरीराचं पोषण करण्यासाठी आपण सकस अन्न खातो, शारीरसौंदर्य टिकवण्यासाठी डोक्यावरचे केस कापतो आणि उत्तम वस्त्रालंकारांनी शरीर सजवतो. पण या मनाचं पोषण, मुंडण करायचं म्हणजे काय आणि या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? पंत महाराज सांगतात, ‘‘मनाला पुष्ट आणि निरोगी राखण्यासाठी रोज चांगलं अन्न- म्हणजे संतांचे विचार भरवावेत! मन सुशोभित करण्यासाठी रोज त्याचं मुंडण करावं. म्हणजेच भेद-कल्पनारूपी केस तोडून टाकावेत. मनाचा भित्रेपणा जाऊन ते शूर व्हावं यासाठी त्याला संकटं आणि दु:ख सोसण्याचीही सवय लावावी.’’ मानसिक आरोग्यासाठी मनाशी आपला सुसंवाद असला पाहिजे. मनाशी सख्य असलं पाहिजे. पंत सांगतात, ‘‘मनाशी एकांत करावा, हितगुज करावं. सुख-दु:खाच्या गोष्टी सांगाव्यात. त्याच्याशी निरंतर सलोखा करीत जावे.’’ मनाशी एकांत कसा साधेल हो? त्यासाठी आपण अगदी थोडा वेळ का होईना, पण जगाच्या कोलाहलापासून दूर बसलं पाहिजे. ‘जगाच्या कोलाहलापासून दूर जायचं’ याचा अर्थ जगापासून दूर जायचं असं नव्हे! तर जगातच राहून अगदी थोडा वेळ का होईना, डोळे मिटून बसायचं आहे. पण होतं काय, आपण घरी एकटे असलो तरी तो एकांत सोसवत नाही. मग आपण वेळ घालवायला म्हणून, त्याच त्या बातम्यांचा रवंथ करण्याची सवय जडलेल्या वृत्तवाहिन्या बघत बसतो आणि जगाला घरात आणतो! एकांत आणि एकाग्रतेचा मोठा योग गमावतो! मग मनाशी हितगुज कसं होणार? जीवनातील सुख-दु:खाचा आढावा कसा घेतला जाणार? त्या सुख-दु:खाची सत्यासत्यता कशी तपासली जाणार?

– चैतन्य प्रेम