14 November 2019

News Flash

तत्त्वबोध ; संतसंगतीचे महत्त्व

संतांची संगत क्षणभर जरी घडली, तरी मनुष्याला तिच्यापासून अमोघ असा लाभ होतो

(संग्रहित छायाचित्र)

 

संतांची संगत क्षणभर जरी घडली, तरी मनुष्याला तिच्यापासून अमोघ असा लाभ होतो. पण संतांना सहजासहजी ओळखता येत नसल्याने त्यांचे खरे दर्शन दुर्लभ आहे. आपल्याला संतांना ओळखायचे असेल तर भाषा, वेष, एकंदर त्यांच्या वागण्यावरून त्यांचे संतत्व ओळखता येणार नाही. ज्यांच्या दर्शनाने विषयांचा विसर पडून मनुष्याचे हृदय आनंदाने भरून जाते, तीच संतांची खूण समजली पाहिजे. विजेचे मुख्य बटण बंद केले असता घरातील सर्व दिवे जसे बंद होतात, त्याप्रमाणे सिद्धपुरुषांच्या प्रेमाच्या सामर्थ्यांने त्यांच्या सहवासात गेलेल्या माणसांच्या मनोवृत्ती सहजच आकर्षिल्या जातात. त्याकरता मन सहजपणे स्थिर होण्यास संतसंगती हाच एक रामबाण उपाय आहे. दु:संगतीत वासना दिवसेंदिवस अधिकाधिक बळावत जाते आणि सत्संगतीत तिची शक्ती कमी कमी होते. वासनेचा पूर्ण क्षय झाल्याशिवाय अक्षय सुखाचा उदय होत नाही. ज्याप्रमाणे पेटविलेल्या अग्नीत लाकडे टाकत गेल्यास अग्नी अधिकच पेट घेतो, त्याप्रमाणे वासना सारखी वाढवीत गेल्यास आपले मन अधिकच अस्थिर होते. त्याकरता सुखाची इच्छा असलेल्या माणसाने प्रथम सत्संगती करावी. कारण त्या संगतीत वासनेला आळा बसतो आणि मन स्थिर होऊन खरे सुख प्राप्त होऊ लागते. एका ठिकाणचे झाड दुसऱ्या ठिकाणी लावले असता प्रथम त्याची जुनी पाने गळून पडतात आणि त्यावरच त्याला जशी नवी पालवी फुटते, त्याप्रमाणे विषयासक्त मन सत्संगतीत रमू लागल्यावर प्रथम त्याचे कुसंस्कार नाश पावतात आणि त्यावरच त्याच्या ठिकाणी आत्मतत्त्वाची पालवी फुटते. संतांचा प्रत्यक्ष सहवास जरी लाभला नाही, तरी हरिप्रेमाने रंगलेल्या त्यांच्या हृदयातून मधुरवाणीच्या द्वारे ओव्या, दोहे, अभंग, श्लोक, आर्या इत्यादि रूपाने जे शब्द बाहेर पडले ते प्रसादपूर्ण आणि सामथ्र्यवान असल्याने प्रत्येक माणसाने दिवसातून काही वेळ तरी त्याचे मनन करण्याचा परिपाठ ठेवावा. त्यामुळे त्याच्यातील अशुद्धता नाहीशी होऊन मनुष्य परमपवित्र होतो. अर्थात दु:खाचा समूळ नाश होऊन तो अखंड सुखी होतो. ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामांचे अभंग, मोरोपंतांच्या आर्या किंवा वामनपंडितांचे श्लोक असोत, या सगळ्यात मनुष्याला जन्माला येण्यापूर्वी कोणत्या प्रकारे कष्ट सोसावे लागतात, मनुष्य देह कशासाठी देवाने दिला आहे, त्याचे सार्थक कोणत्या प्रकारे करायचे, याचेही मार्गदर्शन केले आहे. कमळातील मकरंद जसा अत्यंत गुंग झालेल्या भ्रमराला सेवन करता येतो, त्याप्रमाणे अत्यंत नम्रतापूर्वक आणि परिपूर्ण लक्ष देऊन त्या अभंग-ओव्यातील अर्थ स्वत:कडे लावून (म्हणजे तो बोध आपल्यासाठीच आहे, असे मानून) घेतल्याशिवाय मनुष्याला भवाच्या बागुलबुव्याच्या भीतीपासून सुटता येत नाही. संतवचनांचा गूढार्थ जेव्हा मनुष्याच्या लक्षात येतो तेव्हा मनुष्य पशूवृत्तीपासून सुटून खऱ्या अर्थाने माणूस म्हणून घडू लागतो. मेघांनी वर्षांव केला की जमिनीत गुप्तपणे असलेले बीज रुजते. रुजलेले बी चांगले असेल तर त्याला पालवी फुटते आणि झाड वाढीस लागते. त्याप्रमाणे संतांच्या उपदेशाने बद्ध जीवाच्या ठिकाणी मुमुक्षुत्व उत्पन्न होते. मग त्याने तो बोध एकाग्रतेने ग्रहण केला असता तो साधक बनतो आणि साधकाने त्या बोधानुसार आचरण सुरू केले असता त्याचा सिद्ध होतो. तेव्हा संतांचा उपदेश केव्हाही कल्याणकारकच समजावा.

  (‘बोधामृत’ पुस्तकातून) – चैतन्य प्रेम

First Published on October 30, 2019 1:51 am

Web Title: the importance of saintly association akp 94