१९७१ चे युद्धाचे दिवस होते. हे जग माणसाच्या कल्पनेचा खेळ आहे, या आशयाच्या आध्यात्मिक उत्तरानं अस्वस्थ झालेल्या एका साधकानं उद्विग्न सुरात श्रीनिसर्गदत्त महाराजांना विचारलं की, ‘‘जगात एवढं दु:खं का आहे?’’ महाराजांनी विचारलं, ‘‘कोणाच्या जगात?’’ चिडून साधक म्हणाला, ‘‘याच जगात- ज्यात तुम्ही आणि मी राहतो!’’ महाराज म्हणाले, ‘‘नाही. मी तुमच्या जगात राहत नाही. तुम्हाला माझ्या जगाची कल्पनादेखील नाही. या लढाया, ही दु:खं सारं काही तुमच्या जगात आहे आणि त्याला कारण तुम्हीच आहात!’’ महाराजांच्या सांगण्याचा आशय हा होता की, बाहेरच्या जगातल्या युद्धाचं बीज माणसाच्या अंतर्मनातच आहे! आतदेखील बाहेरच्या जगापेक्षा मोठं युद्ध सुरू आहे. अंतरंगात खदखदत असलेला द्वेष, मत्सर, अहंकार आणि वर्चस्वाची हाव यातूनच बाहेरच्या जगात युद्ध आणि घातपात घडत आहेत. बाहेरच्या जगातला सर्व प्रकारचा अनाचार आणि अत्याचार थांबावा, असं वाटत असेल तर अंतर्मनातली त्याची बीजं नष्ट झाली पाहिजेत! ‘भगवंतमय स्थिती’ हाच त्यासाठीचा उपाय आहे. आता ‘भगवंतमय स्थिती’ म्हणजे तरी काय, असा स्वाभाविक प्रश्न पडेल. त्याचं अगदी प्राथमिक पातळीवरचं उत्तर तेवढं पाहू. कारण त्याचं अंतिम उत्तर म्हणजे ‘सद्गुरुमयता’ आणि तोच या सदराचा गाभा आहे! मग प्राथमिक पातळीवर काय सांगता येईल? तर, भगवंत कसा आहे? तो परम स्वतंत्र, परम दिव्य आहे, निर्लिप्त आहे. भक्ताची तशी आंतरिक वृत्ती होणं ही खरी भगवंतमयता. म्हणजेच भक्त सर्व मनोनिर्मित बंधनांपासून मोकळा झाला पाहिजे. त्याच्या आचार-विचारांतला समस्त संकुचितपणा लोपत गेला पाहिजे. जगाच्या प्रभावापासून तो अलिप्त झाला पाहिजे. हा अभ्यास सोपा नाहीच. त्यासाठी जो स्वत: पूर्णपणे भगवंतमय आहे अशा सद्गुरूचा संग लाभणं, हाच एकमेव उपाय आहे. तर स्वस्वरूपात निमग्न भगवंत आणि अनेक रूपांत प्रकटलेली आणि लीलया सर्व दृश्य जगाचा विस्तार करीत असलेली त्याची माया यांचा हा खेळ आहे! आणि खेळ म्हटला की हार-जीत आलीच! मग कधी यश, तर कधी अपयश; कधी सुख, तर कधी दु:खं हे अटळच आहे. जो खेळाबाहेर आहे, त्याच्यावर मात्र हे द्वंद्व परिणाम करू शकत नाही. तो खेळाकडे खेळ म्हणूनच पाहू शकतो आणि खेळाचा आनंदही घेऊ  शकतो. या खेळात तो कोणत्याही एका बाजूचा झाला, तर मात्र हार-जीतीचं सुख-दु:खही त्याच्या वाटय़ाला आल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ, आपल्या मायदेशाचा अन्य देशाशी क्रिकेटचा सामना सुरू आहे. मग आपण आपसूक आपल्या देशाच्या बाजूचे होत खेळ पाहू लागतो. पण समजा, वेगळ्याच दोन देशांचा क्रिकेट सामना सुरू असेल, तर कुणाच्याही हार-जीतीची आपल्याला तशी फिकीर नसते. मग तो खेळही आपण अलिप्तपणे पाहू शकतो आणि त्याचा आनंदही घेऊ  शकतो. तेव्हा आसक्त अशा ‘मी’ आणि ‘माझे’ भावानं जगात गुंतलो नाही, तर ‘खेळाऐसा प्रपंच मानावा,’ हा श्रीगोंदवलेकर महाराजांचा बोध आचरणात येऊ  लागेल. आपण जगातच राहू, पण जग आपल्या अंत:करणात तळ ठोकून राहणार नाही! आपण जगातली आपल्या वाटय़ाची कर्तव्यं पार पाडू, हौस-मौजही करू, पण कशातही अडकून, गुंतून पडणार नाही. हे जग ज्याचं आहे त्याच्या आधारावर निर्धास्त जगण्याची कला संत शिकवत आहेतच. त्या अभ्यासालाही मग उसंत मिळेल!