प्रपंचात बायको-पोरांसमोर सौम्य असलेला, पडती बाजू घेणारा एखादा गृहस्थ त्याच्या कार्यालयात अधिकार पदावर असेल, तर प्रसंगी कठोर भूमिकाही उत्तमरीत्या वठवू शकतो. अगदी त्याचप्रमाणे प्रपंचात अडकलेला साधकही उपासनेच्या काळापुरता का होईना, पण त्या प्रपंचाच्या ओझ्यातून मनानं दूर होऊ  शकतो, अलिप्त वा तटस्थ होऊ  शकतो. आता कुणाच्या मनात येईलही की, जर उपासनेनंतर पुन्हा प्रपंचातच खेचलो जाणार असू, तर उपासनेपुरतं मनानं मुक्त होण्यात काय अर्थ आहे? याचं उत्तर अगदी सोपं आणि आपल्या नित्याच्या अनुभवातलं आहे. दिवसभर आपण कामाच्या धबडग्यात गुंतून जातो, पण रात्री निवांत झोप लागावी, ही इच्छा बाळगतोच की नाही? असं म्हणतो का, की आता काय सकाळी उठून कामात गुंतून जायचं आहेच, तर मग रात्रीची झोप घ्याच कशाला? असं आपण मानतो का? तर नाही! कारण झोपेमुळेच देहाला खरा आराम मिळतो. त्यानं पुन्हा शक्ती गोळा होते आणि मन ताजतवानं होतं. अगदी त्याचप्रमाणे, उपासनेला लागल्यावर मन अगदी हळूहळू का होईना, पण थोडं तणावमुक्त होत असेल, तर त्याचा मोठा लाभ आहे. याचं कारण काही क्षण का होईना, मन चिंतामुक्त राहिलं तरी मनाला जी विश्रांती मिळते, त्याचाही मोठा प्रभाव पडतो. मग अशी विश्रांती ज्या उपासनेनं लाभते त्या उपासनेकडे मनाचा ओढा वाढू लागतो. अर्थात, मन त्या साधनेसाठी तयार होतं. आता काही जण तक्रार करतात, की आम्ही उपासनेला बसतो, पण आमचं मन काही त्यात रमत नाही, शांत होत नाही! अगदी झोपेच्या तक्रारींसारख्याच तक्रारी आहेत या. काही जण म्हणतात ना; अंथरुणावर पडतो, पण झोप काही येत नाही, शांत झोप लागतच नाही.. तसं आहे हे. का? कारण मन जागंच राहतं. मन जागं राहिलं, की त्यात नाना विचारांचं थैमान सुरू होतं आणि मग चिंतेच्या झंझावातात सापडलेला माणूस अंथरुणात रात्रभर तळमळत राहतो. तसंच उपासनेला बसल्यावरही ‘मी’ जागाच राहतो आणि मनाची कवाडं उघडून चिंतांना प्रवेश देतो! तेव्हा उपासनेच्या वेळेपुरतं मनाला बजावावं लागेल, की जी काही चिंता करायची आहे, ती खुशाल कर; पण ती एवढी साधना संपल्यावर कर! या स्वयंसूचनेचा उपयोग करीत गेल्यास काही मिनिटं मन स्वत:ला उपासनेत जुंपून घेतं. त्या तेवढय़ा क्षणांनीदेखील मनावरचा ताण कमी होतो. मग मनाला साधनेचं मोल उमगू लागतं. श्रीएकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात की, सद्गुरूंनी सांगितलेल्या उपासनेच्या जोरावरच लोभ, मोह, भ्रम, आसक्ती यांनी भरलेला मनाचा भवडोह तरून जाता येतो. अन्य कोणताही उपाय नाही. या उपासनेच्या नौकेशिवाय तो पार होत नाहीच, उलट त्यात बुडून जाण्याचीच भीती अधिक आहे. म्हणून हे माणसा, आयुष्याची जी संधी तुला लाभली आहे, तिचा त्वरेनं लाभ घे! (‘नाम हे नौका तारक भवडोहीं। म्हणोनि लवलाही वेग करा।।१।।’) या भवसागरात श्रीहरी अर्थात सद्गुरू हाच तारक आहे; त्याच्या प्राप्तीसाठी आणि त्याच्या बोधानुरूप जीवन घडवण्यासाठी वेगानं प्रयत्न करा. (‘बुडतां सागरीं तारूं श्रीहरी। म्हणोनि झडकरी लाहो करा।।२।।’)

– चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com