14 November 2019

News Flash

२०८. खरी उपासना

आपल्या अंतर्मनावर असलेला ‘मी’चा प्रभाव झुगारून देणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही.

(संग्रहित छायाचित्र)

आपल्या अंतर्मनावर असलेला ‘मी’चा प्रभाव झुगारून देणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. त्यासाठीचा उपाय सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन, त्यांच्या बोधाचं पालन हाच आहे. त्यांचा बोध हा माझ्या मनाच्या सवयींनाच मुरड घालणारा असतो. हा जो परमात्मा आहे, परमतत्त्व आहे तोच अंशरूपानं आपल्यात आहे. आपल्या अंत:करणात हे जे परमतत्त्व आहे त्याचं भान जागं करणं हीच साधना आहे! श्रीनिसर्गदत्त महाराजांना एकानं विचारलं की, आपल्याला आत्मसाक्षात्कार कसा झाला? म्हणाले की, ‘‘माझ्या सद्गुरूंनी सांगितलं की तूच ब्रह्म आहेस आणि माझा त्यावर विश्वास बसला!’’ या केवळ एका विश्वासानं संपूर्ण देहभाव लयाला गेला आणि आत्मभाव जागा झाला, हेच महाराजांना सूचित करायचं आहे. आपण ‘मी’भावात जगतो आणि त्यामुळे या ‘मी’च्या रक्षणासाठी, जोपासनेसाठी, जपणुकीसाठी अनंत गोष्टींची चिंता करीत राहतो, अनंत गोष्टी गमावण्याच्या काल्पनिक भीतीनंही तळमळत राहतो. जीवन जसं असेल तसं जगू, ही निर्भयता काही मनात नसते. त्यामुळे ‘अहं ब्रह्मास्मि’ या भावनेत जगणं आपल्याला आवाक्याबाहेरचं वाटतं. आणि एक खरंच आहे की, जोवर तशी धारणा नाही, तोवर तसं जगण्याची नक्कल करूही नये. पण आपल्यात एक सत् अंश आहे, दिव्य अंश आहे. ‘मी’युक्त अनेक ओढींनी तो दबला आहे, त्यावर भौतिकाच्या गोडीची माती पडली आहे. माउलींच्या शब्दांत सांगायचं तर त्या मूळ दिव्य स्वरूपावर वज्रलेप झाला आहे. तेव्हा तो दिव्यत्वाचा अंश जागा करण्यासाठी साधना आहे. निदान साधनेला बसल्यावर तरी आपण या जगाचे नाही, भगवंताचे आहोत, आपण संकुचित ‘मी’चे नसून व्यापक परमतत्त्वाचे आहोत, ही धारणा विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण देहभावात जगत असलेल्या आम्हाला अचानक काही वेळेपुरतीदेखील अशी दिव्यत्वाची भावना कशी साधेल, अशी रास्त शंका काहींच्या मनात येते. त्याला स्वामी चिन्मयानंद यांनी फार मनोज्ञ उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, गोपाळ म्हणून एक पोलीस अधिकारी होता. घरात मात्र त्याची बायको जे सांगेल ती पूर्व दिशा, अशी स्थिती होती. घरी तो बायकोच्या बोलांनी कधी कधी गांजतदेखील असे तसंच मुलांच्या ‘हे हवं, ते हवं,’ अशा मागण्यांनीही जेरीस येत असे. त्यांच्यासमोर मवाळ असलेला गोपाळ जेव्हा अंगावर वर्दी चढवून कामावर जात असे तेव्हा तो अनेक गुंडांना कर्दनकाळ भासत असे. अनेकजण त्याला वचकून असत. कायद्याचा एक समर्थ रक्षक म्हणून तो उत्तम काम करीत असे. म्हणजेच काही वेळेपुरतं का होईना प्रापंचिक जगण्यातील त्याची गौण भूमिका एकदम गळून पडे आणि तो एखाद्या निधडय़ा वीराप्रमाणे कर्तव्य बजावण्यात अग्रभागी असे. अगदी त्याचप्रमाणे साधनेच्या काळात प्रापंचिक विचारांचं ओझं हळूहळू गळून पडतं. आपण या प्रापंचिक ओढीत कसे गुंतून आहोत, याचीही स्पष्ट जाणीव होऊ लागते. आपल्याती भ्रम, मोह आणि आसक्ती स्पष्ट पणे जाणवू लागते. आपल्याच आसक्तीमुळे आपणच अनवधानामुळे कसे जगमोहात अडकून असतो, याची जाणीव तीव्रपणे होऊ लागते. मनाच्या तळातला अनंत कल्पना, वासना, भावना, इच्छांचा गाळ या वेळेत उपसला जात असतो आणि म्हणूनच ती खऱ्या अर्थानं ‘उपासना’ असते!

– चैतन्य प्रेम (बुधवार, ३० ऑक्टोबरच्या अंकातील ‘तत्त्वबोध’ हे कलावतीआई यांच्या विचारांचे संकलन होते.) 

First Published on October 31, 2019 2:47 am

Web Title: true worship akp 94