एकल पालकत्व हे संजीवनी चाफेकर यांनी पूर्ण विचारांती, जबाबदारीनं उचललेलं पाऊल होतं. हे पालकत्व आनंददायी असलं तरी आव्हानात्मक होतंच, दतक पालकत्व असल्यानं ते जास्तच. पण आज लेकीला, प्रणतीला जर्मनीमध्ये लॅण्डस्केप आर्किटेक्चरमध्ये मास्टर्स करण्यासाठी पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली आहे. ‘सोफोश’मध्ये मुलं दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना अनुभव सांगण्यासाठी, त्यांचं शंकासमाधान करण्यासाठी ती मनापासून जाते. कसा झाला हा घडवण्याचा आणि घडण्यामधला प्रवास. त्याविषयी..

‘एका अपत्याचा जन्म होतो तेव्हाच एका आईचाही जन्म होतो, बाळ जसजसं मोठं होतं तसतसं आईपण परिपक्व होत जातं’ ही आपल्याकडची एक ठाम समजूत असते. त्यातूनच मग ‘नऊ महिने भार वाहिलाय, आईपणाच्या वेदना सोसल्यात’ किंवा ‘आईचं मन..नाही कळायचं कुणाला’ असे ‘मालिकेतील’ संवाद जन्म घेतात. खरं तर शरीराने आईपण न अनुभवलेल्या पण विशाल मातृहृदयाच्या अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. प्रेमळ आई आणि जबाबदार पालक हे काही फक्त जन्म देण्याच्या प्रक्रियेतून घडत नसतात, हे आपल्याला तार्किकदृष्टय़ा पटत असतं. तरीही मनात शंका-कुशंका असतातच.
संजीवनी चाफेकर या दत्तक पालकत्व स्वीकारलेल्या अविवाहित एकल मातेला बघितलं आणि अशा अनेक शंका-कुशंकांची जळमटं पार झाडून काढली गेली. प्रारंभीच संजीवनींनी स्पष्ट केलं, ‘‘एकल पालकत्व हे माझ्यावर कोसळलेलं नाही. पूर्ण विचारांती, स्वत: निर्णय घेऊन जबाबदारीनं उचललेलं हे पाऊल आहे. यात संघर्ष, परिस्थितीशी झगडा असं काही नाही, मग तुम्ही का लिहावं?’’
प्रत्यक्षात मात्र लिहिण्यासारखं खूप काही सापडलं. संजीवनी व्यवसायानं स्ट्रक्चरल इंजिनीअर. मुळात स्वतंत्र विचारांच्या, व्यक्तिस्वातंत्र्यवादी, निरीश्वरवादी आणि पटलेल्या जीवनमूल्यांशी प्रामाणिक राहून दैनंदिन आचरणातही तडजोड न करणं या स्वभावामुळे संजीवनीनं योग्य जोडीदार मिळाला तरच लग्न करायचं ठरवलं होतं. ‘‘मी पारंपरिक पत्नीच्या प्रतिमेत बसत नाही,’’ असं त्यांचं स्वत:चच मत आहे. मात्र मुलांची अतिशय आवड असल्यानं विचारपूर्वक त्यांनी प्रणतीला दत्तक घेतलं. घरातल्या सर्वानी तसंच मित्रमंडळींनीही संजीवनीच्या निर्णयाचं आणि प्रणतीचंही स्वागत केलं. मुलीची जबाबदारी आपणहून स्वीकारल्यामुळे त्यांच्या मते सगळं आनंददायी पालकत्व होतं. अर्थात आनंददायी असलं तरी आव्हानात्मक होतंच.
संजीवनीच्या मते, या सगळ्यात खरा संघर्ष करावा लागला तो प्रणतीला! दत्तक मुलांची मानसिक स्थिती काही काळात नाजूक असते. एक तर जन्मदाते पूर्णपणे अज्ञात, समाजाकडून अनेक प्रश्न, त्या प्रश्नांची नकळत टोचणी..स्वप्रतिमेचा प्रश्न..स्वीकारताही येत नाही आणि डावलताही येत नाही अशी अवस्था.. प्रणतीच्या बाबतीत तर फक्त एकाच पालकाची उपस्थिती.
संजीवनीने पहिली काळजी ही घेतली की प्रणतीला अगदी लहान असल्यापासूनच त्या त्या वयाला पचनी पडेल अशा पद्धतीनं तिच्या जन्माविषयी सांगितलं. त्यामुळे पुढचा गुंता टळला. ‘मी कुणासारखी दिसते’ या बालसुलभ प्रश्नाला प्रणतीला उत्तर मिळालं नाही. पण तिने ‘मला आईनं दत्तक घेतलं आहे’ असं वेळ पडली तर स्वत:ही सांगितलं. असे प्रश्न शालेय वयात खूप त्रास देतात. मुलीचं शिक्षण मातृभाषेतच व्हावं असा संजीवनीचा आग्रह होता. त्यांनी मुलीला ‘अक्षरनंदन’ या वेगळ्या विचारधारेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं. त्यांनी अर्धी लढाई तिथेच जिंकली असं म्हणायला हवं. कारण या शाळेत अनेक दत्तक मुलं होती. वर्गात ३५-४० मुलं आणि जवळजवळ शाळेतील प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी आणि पालक एकमेकांना ओळखणारे. त्यामुळे शाळेत प्रणतीला सतत अशा प्रश्नांना तोंड द्यावं लागलं नाही.
याचा अर्थ सगळंच आलबेल होतं असं नाही. काही वळणं निश्चितच अवघड होती. साधारण सहावी-सातवीचं वय हे अनेक बदलांची सुरुवात असते. त्या वर्षांत प्रणतीची शाळेतली कामगिरी खालावली होती. ‘अक्षरनंदन’ ही शाळा मार्काना महत्त्व देणारी नाही. तरीही त्यांनी असं सुचवलं की प्रणतीला पुन्हा त्याच इयत्तेत बसवावं. वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून माहीत असले तरी आपण ‘दत्तक’ आहोत म्हणजे काय याची जास्त खोलवर कल्पना याच सुमारास प्रणतीला यायला लागली होती. कदाचित आजूबाजूला चाललेल्या चर्चेतून असेल पण ‘दत्तक मुलं शिक्षणात मागेच पडतात’ अशीही तिची चुकीची समजूत झाली होती. इथे संजीवनीने फार विचारपूर्वक पावलं उचलली. शिक्षकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांना विचारून घेतलं की प्रणती आकलनात कमी नाही ना? आणि मग आग्रहच धरला की तिला पुढच्या इयत्तेत बसवावं. त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सुरुवात केली आणि पुढच्या वर्षीपासून प्रणतीची प्रगती व्हायला लागली.
१२ वीनंतर तिने आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम निवडला. त्या शाखेच्या अभ्यासक्रमाला गेल्यावर मात्र तिच्यात सातत्याने बदल होत गेला. त्याचं फळही तिला मिळालं. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून तिनं सुवर्णपदक पटकावलं. त्यानंतर एक वर्ष अहमदाबादमध्ये राहून नोकरी केली आणि आता तर तिला जर्मनीमध्ये लॅण्डस्केप आर्किटेक्चरमध्ये मास्टर्स करण्यासाठी दोन वर्षांसाठी पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली आहे. कुठल्याही व्यक्तीला तिचा नेमका सूर सापडला की काय घडू शकतं याचं प्रणती हे उत्तम उदाहरण आहे आणि मुख्य म्हणजे या सगळ्याचा ती दत्तक असण्याशी काहीच संबंध नाही हे प्रणती आवर्जून सांगते. संजीवनीचं म्हणणं असं की, ‘‘प्रणतीला सहावीत जर त्याच इयत्तेत पुन्हा बसायला लागलं असतं तर तिची चुकीची समजूत पक्की झाली असती आणि पुढील आयुष्यात तिच्याकडून आत्मपरीक्षण न करता अपयशाचं खापर परिस्थितीवरच फोडत राहण्याचा आणि पर्यायानं सततच्या अपयशाचा धोका कायम राहिला असता.’’
प्रणतीला पूर्वी तिच्या दत्तक असण्याची चर्चा करणं, कौतुक करणं किंवा बोट दाखवणं मुळीच आवडत नसे. आता मात्र ती सहजपणे उत्तरं देते. तिच्या मते कुठल्याही आई-मुलीचं असेल तसंच आमचं नातं आहे. भांडणं, रुसणं, हट्ट करणं सगळं सगळं तसंच आहे. मग कशाला मला वेगळं काढता? आज ती मोकळेपणानं मान्य करते की, ‘‘लहान असताना जरा वादावादी झाली की त्याचा संबंध मी दत्तक असण्याशी लावायची. पण हे अगदी थोडाच काळ! आईनं मला समतोल विचार करायला शिकवलं. माझ्या जन्मदात्रीची असहायता काय काय असू शकते ते समोर मांडलं. तिचा तिरस्कार करण्याचं कारण नाही हेही लक्षात आणून दिलं.’’ प्रणतीने ‘मिळून साऱ्याजणी’मध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हटलं आहे.. ‘‘पालकत्व म्हणजे जन्म देणं, खर्च करणं, लाड पुरवणं नसून मुलाला योग्य-अयोग्य काय हे सांगावं, ते ‘जन्मदाते’ आहेत की ‘दत्तक पालक’ यानं काहीच फरक पडत नाही. त्यामुळे एकेरी दत्तक पालकत्व तेवढंच सक्षम असू शकतं, जेवढं एखादं संपूर्ण परिवाराचं असतं.’’
आता प्रणती ‘सोफोश’मध्ये (सोसायटी ऑफ फ्रेण्ड्स ऑफ ससून हॉस्पिटल्स) मुलं दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना अनुभव सांगण्यासाठी, त्याचं शंका-समाधान करण्यासाठी मनापासून जाते. ती देश-परदेशात कुठेही राहिली तरी एक सक्षम संवेदनाक्षम स्वतंत्र व्यक्ती म्हणून छान सामावून जाईल हा विश्वास संजीवनींना आहे.
‘‘मी माझं आयुष्य निवडलं. ते आतापावेतो आनंदानं व्यतीत केलं. त्यात प्रणतीचा मोठा वाटा आहे, तिचं दत्तक असणं तर केव्हाच मागे पडलंय. पालक म्हणून तिनं मला समृद्ध केलं आहे, आता आई आणि मुलगी हे नातंही मागे पडतंय. यापुढे दोन स्वतंत्र सक्षम व्यक्ती म्हणून आम्ही एकमेकींशी जोडलेल्या राहू. याहून अधिक आनंद कोणता?’’
‘आईपण किंवा मातृत्व’ याविषयीच्या आपल्या परंपरागत कल्पनांपेक्षा अगदी वेगळी अशी ही आई-मुलीची जोडी..मानवी नातेसंबंधांबद्दल आणि पालकत्वाच्या कल्पनांबद्दल खूप काही सांगून जाणारी!
vasantivartak@gmail.com

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”