29 May 2020

News Flash

सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावर

सातारा! पश्चिम महाराष्ट्रातलं गावपण जपलेलं एक छोटंसं शहर.

आईची शिस्त आणि वडिलांची इच्छा म्हणून मुली आणि मुलगा शिकत गेले. एवढंच नाही तर प्रत्येकीनं शिकताना एकेक अशी गोष्ट शिकून घेतली, ज्यामुळे आज स्वतंत्र- स्वावलंबी आणि सेल्फ-मेड व्यवसायात साऱ्याजणी स्थिरावल्या आहेत. कमावत्या मुली एकमेकींना धरून आहेत आणि मुलगाही स्थिरावतोय याचं आईला समाधान आहे, त्याच वेळी दोन मुलींचा संसार मोडल्याचंही दु:ख आहे. जगणं म्हणजे सुख आणि दु:ख दोन्ही असायलाचं हवं का? सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावर जगणाऱ्या सलिमाबीविषयी..

सातारा! पश्चिम महाराष्ट्रातलं गावपण जपलेलं एक छोटंसं शहर. सातारा जिल्ह्य़ातील पाटणचे नायब तहसीलदार समशेर शेख आणि सलिमाबाई शेख यांचं घर म्हणजे एक नांदतं गाजतं गोकुळच होतं. समशेरभाई विचारांनी पुरोगामी असले तर त्यांची आई नातवाचं तोंड पाहाण्यासाठी आसुसलेली होती आणि सलिमाबीनाही ते स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. केवळ तिच्या हट्टाखातर सलिमांना आठ वेळा गर्भारपणाला तोंड द्यावं लागलं. आणि अखेर नवव्या वेळी मुलगा झाल्यानंतर त्यांची सुटका झाली असती; पण त्या मुलाला बघण्याआधीच सासुबाईंचं निधन झालं.

समशेर- सलिमा शेख दाम्पत्यानं मुलाच्या जन्माइतकंच मुलींचंही स्वागत केलं होतं. आपल्या अष्टकन्यांना खूप शिकवायचा त्यांचा निर्धार होता. सारं काही छान चाललेलं असताना अचानकच, ध्यानीमनी नसताना समशेर शेख यांचं निधन झालं. सलिमाबींवर आकाशच कोसळलं. मोठी परवीन त्यावेळी २० वर्षांची आणि धाकटा इरफान फक्त ४ वर्षांचा होता. आठ मुलींच्या डोळ्यातली कोवळी स्वप्नं जपायची तर स्वत: आधी उठून उभं राहायला हवं होतं. सलिमाबींना तोवर बाहेरच्या जगाचं वारंही लागलं नव्हतं. फक्त वाढत्या खर्चाला हातभार लावण्यासाठी त्या घरी शिवणकाम करू लागल्या होत्या. तेसुद्धा एक ओळखीचे टेलर घरी पाठवतील तेवढंच.
त्यावेळी मोठय़ा परवीन आणि नसरीननं आईला उभं केलं. बाहेरची कामं स्वत:च्या अंगावर घेतली. हळूहळू सलिमाबींनाही वास्तवाचं भान आलं. १९९०-९१ साली सरकारी पेन्शन खूपच कमी होती. आणि १० माणसांचं घर. साऱ्या मुली, मुलगा शिकत होता. हजार वाटांनी खर्च अंगावर येत असतील. नवं घर बांधायला कर्ज काढलं होतं. मिळालेल्या फंडातून ते आधी फेडावं लागलं. सलिमाबी सांगतात, ‘‘दिवस कठीण होते, पण शिक्षण आजच्याइतकं महाग नव्हतं. त्यामुळे निभलं. माझ्या मुलीही गुणी होत्या. त्यांनी गरजेपलीकडे काही मागितले नाही. घरी वेळेवर या असंसुद्धा कधी सांगावं लागलं नाही. मी मोठय़ा दोघींना सांभाळलं. त्यांची रीत-भात साऱ्या जणींनी उचलली. ‘आपण बरं नी आपलं काम बरं’ असं आमचं कुटुंब.’’

जाहिदा सांगते, ‘‘वडिलांनी आमचे खूप लाड केले होते. कपडे, खेळणी. तोंडातून शब्द काढायचा अवकाश मागितलेली वस्तू संध्याकाळीपर्यंत घेऊन यायचे. पण ते गेल्यानंतर मात्र आम्ही कधी नंतर आईकडे कसलाच हट्ट केला नाही.’’

रिहानालाही ते बालपणीचे दिवस चांगले आठवतात. ‘‘वडील गेल्यावर घरात कर्ता पुरुष नाही. मग सातारा शहरात मल्हार पेठेत असणाऱ्या आमच्या कुटुंबाच्या जागेतील भाडेकरूला फितवून काही  लोकांनी ती जागा बळकावण्याचा प्रयत्न केला. पण कधीही बाहेर न पडलेली आमची आई खंबीर राहिली. तिनं कोर्ट कचेऱ्या करत जागेचा ताबा मिळवला.’’ आज त्या जागेत खुर्शिद आणि रिहानाचं ब्युटी पार्लर आहे. पण सलिमाबी ती केस अजूनही लढतच आहेत. एखाद्या वासराला इजा होईल असं वाटलं तर गरीब गाय सुद्धा शिंगं रोखून उभी राहते. मग ही तर नऊ लेकरांची माय. मुलांच्या भल्यासाठी डोळ्यात तेल घालून सज्ज होती, यात काही नवल नाही.

सलिमाबींनी मुलांना शिकायला तर प्रवृत्त केलंच. पण धर्मातील अनेक गोष्टी मुलांच्या मनावर ठसवत राहिल्या. वाईट वागणाऱ्यांना पुढे काय शिक्षा होते त्याचं त्या भय घालत. कथा वाचून दाखवत. मुलांनी एक सहृदय, दयाळू, सदाचारी माणूस म्हणूनच वाढलं पाहिजे, शेजाऱ्यापाजाऱ्यांना मदतकेली पाहिजे, नम्रता ठेवली पाहिजे यावर त्यांचा भर असे.

सरकारी सेवेत अनुकंपा तत्त्वावर घरातील एका व्यक्तीला सामावून घेण्यात येतं. त्यावेळी काका-मामांनी सल्ला दिला. मोठय़ा तिघी लग्नाला आल्या होत्या. त्यांच्यापेक्षा चौथी जाहिदा नुकतीच बारावी झाली होती तिला नोकरीला लावावं. म्हणजे काही काळ तरी तिचा पगार सलिमाबींना उपयोगी पडेल. त्याप्रमाणे जाहिदाला सरकारी नोकरी मिळाली. परवीन आणि नंतर नसरीन पुढे पदवीधर होऊनही त्यांना चांगली नोकरी नाही मिळाली. पण मुली अतिशय कष्टाळू आणि जिद्दी. परवीननं आईचा शिवणकामाचा व्यवसाय वाढवला तर नसरीननं जीडीसी करून अकाऊंटन्सची कामं स्वतंत्रपणे घ्यायला सुरुवात केली. समशेरभाईंच्या पेन्शनला स्वत: सलिमाबीं आणि दोन्ही मुलींनी ताबडतोब हातभार लावला.

आर्थिक प्रश्न हळूहळू मार्गी लागले, पण इतर काही त्रास..अडचणी? बापाविना घर आणि आठ सुस्वरूप मुली..सलिमाबाई म्हणतात, ‘‘आमच्या सातारचं सामाजिक वातावरण फार सुरक्षित आणि माणसंही चांगली. मला मुद्दाम कुणी उपद्रव दिला नाही. माझ्या मुलीही सरळमार्गी. त्या रेषेबाहेर वागल्या नाहीत. लग्न-कार्य, मिटिंगा, भेटीगाठी सारं अजूनही मीच पाहाते. मुली पुढे पुढे करत नाहीत.’’
आईची शिस्त आणि वडिलांची इच्छा म्हणून आठही मुली शिकत गेल्या. एवढंच नाही तर प्रत्येकीनं शिकताना एकेक अशी गोष्ट शिकून घेतली ज्यामुळे आज स्वतंत्र- स्वावलंबी आणि सेल्फ-मेड व्यवसायात साऱ्याजणी स्थिरावल्या आहेत. कमावत्या मुली एकमेकींना धरून आहेत याचं आईला समाधान आहे.

पदवीधर परवीननं शिवणकामात आईला मदत करतानाच स्वतंत्रपणे शालेय गणवेषांचा व्यवसाय वाढवला आहे. नसरीन वेगवेगळ्या संस्था, पतपेढय़ांचे अकाउंटस् सांभाळते. रेहाना आयटीआयमध्ये प्रशिक्षक आहे. तर जाहिदा तलाठी म्हणून लागून आज कलेक्टर ऑफिसमध्येच काम करतेय. मन्सुरानं मानसशास्त्रात एम्. ए. केलंय. रिजवानानं फॅशन डिझायनिंग करून तेच शिकवतेय. खुर्शीदचा स्वत:चा सौंदयरेपासनेचा व्यवसाय आहे. (ब्युटी पार्लर) तर धाकटी सुमाय्या जिम प्रशिक्षक असून स्वत: जिम चालवते. ज्याला आज साताऱ्यात विश्वासानं स्त्रियांचा प्रतिसाद मोठा आहे.

या सर्वावर आनंदाची सर्वोच्च मोहोर उठलीय ती इरफानच्या यशाची. पती निधनानंतर सलिमाबींनी बावरलेल्या इरफानला शाळेत सोडण्यासाठी पहिल्यांदा पाऊल घराबाहेर टाकलं. त्यावेळी इरफानचं धरलेलं बोट त्यांनी त्याला एमबीए करूनच सोडलं. इरफाननं हॉटेल मॅनेजमेंट केलं. ‘कॉफी’ या विषयात पुढचा अभ्यास केला. त्याला इंग्लंडला एमबीए करायचं होतं. शेख कुटुंबीयांनी ‘स्टेट बँके’चं शिक्षण कर्ज काढून इरफानला इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण दिलं. आज तो ‘कोस्टा कॉफी’ या नामांकित कंपनीत असिस्टंट मॅनेजर आहे. देशा-परदेशात फिरतो आहे.

इरफानला वडील आठवतच नाहीत. आई त्याचं सर्वस्व आहे. शिक्षणातल्या प्रत्येक यशात त्याला महत्त्वाचं वाटतं ते आईचं समाधान. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहाण्यासाठी त्याला आणखी खूप यश मिळवायचंय. वडील आईसाठी कार घेणार होते. इरफाननं आईची ती अपूर्ण इच्छा पूर्ण केली. स्वत: आईला गाडीतून हिंडवलं तो त्याच्या आयुष्यातला ‘सर्वोच्च आनंद’ असं तो म्हणतो. लौकिकार्थानं ही सलिमाबींच्या कष्टाला मिळालेली पावती आहे. जिद्दीला मिळालेलं यश आहे. पण ‘फक्त एवढंच’ नाही. शिक्षणाचा ध्यास आणि स्वतंत्र विचारांचा धास घेणाऱ्या त्यांच्या मुली मुस्लीम समाजातल्या मुलींनी शिकावं म्हणून धडपडतात. मुलीनं गृहकृत्यदक्ष व्हावं म्हणून मुलीला शाळेतून काढून परवीनकडे शिवण-भरतकाम शिकायला पाठवणाऱ्या पालकांकडे परवीन आग्रह धरते, ‘‘हे तर मी केव्हाही शिकवीन. आधी मुलीला पदवीधर करा.’’ कलेक्टर ऑफिसच्या नोकरीत राहून जाहिदा सरकारी योजना स्त्रियांपर्यंत पोहचाव्या म्हणून धडपड करते, कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक भान दाखवते. रिजवाना आणि खुर्शीद मुस्लीम मुलींना फॅशन डिझायनिंग किंवा ब्युटिशिअनचा कोर्स व्यवसायासाठी करा म्हणून उत्तेजन देतात तेव्हा सलिमाबींना आपल्या संस्कारांचं सार्थक झालं असं वाटत असे.

सगळं चांगलं चाललं असताना दोघींचे संसार मात्र टिकले नाहीत. आठपैकी तीनच मुली संसारात रमल्या आहेत. स्थळ घरापर्यंत यायची आणि परत जायची. जाहिदाचा विवाह झाला पण पूर्ण चौकशी करणारं वडीलधाऱ्यांचं छत्र नसल्यानं अल्पावधीतच तिचे आजारी पती निवर्तले. तर नवऱ्याच्या संशयी स्वभावानं खुर्शीदला माघारी यावं लागलं. कर्तबगार गुणी मुलींना पाहून सलिमाबींना जेवढा आनंद होत असेल तेवढंच हे शल्यही बोचत असेलच. या कुटुंबाशी गप्पा केल्यानंतर रात्री उशिरा जाहिदाचा फोन आला. अस्वस्थ वाटली. म्हणाली ‘‘रागावू नका पण हे सारं तुम्ही कशासाठी लिहिता? मानधन की लेखिका म्हणून स्थान मिळवण्यासाठी?’’

मी म्हटलं, ‘‘नाही गं! तुमची कथा वाचून विफलतेच्या वाटेवर विकल होऊन कोसळणाऱ्या एखादीला पुढे जाण्याची जिद्द मिळेल. दाटून आलेल्या अंधाऱ्या वाटेवर एखादी आशेची ठिणगी पडेल..सफलतेचा मार्ग गवसेल. आणि एवढंच नाही जाहिदा, पुन्हा एकदा सांगते ‘सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असतं असं लेखात सुरुवातीला मी म्हटलं ना, पण कधी कधी ते सुखदही असू शकतं बरं का. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन, व्यावहारिक कुंडल्या ओलांडून विचार करणाऱ्या कुणाला तरी या, स्वयंप्रकाशी शलाकांचं कौतुक वाटेल. अशा तेजस्विनींचा हात हाती घ्यावा असंही वाटेल. अशा तेजस्वी साथीदारामुळे पुढचं आयुष्य उजळून जाईल अशी खात्री पटेल. असा ‘कुणी तरी’ तुमच्या दारात येऊन सलिमाबींपुढे उभा राहिला. मग मी पुन्हा म्हणीन, सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असतं. आणि ते सुखदही असू शकतं बरं का!’’
सकारात्मक ऊर्जेची एक पणती वाचकांसमोर उजळवताना, अशा ऊर्जेनं सारा आसमंत प्रकाशमान व्हावा, हीच तर इच्छा असते. आणि म्हणूनच अंधारातून उठून प्रकाशात पोहचलेल्यांची जीवनकहाणी सांगायची असते. ऐकायची असते.

– वासंती वर्तक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2016 1:10 am

Web Title: happiness and troubles in llife
Next Stories
1 आघात हीच ऊर्जा
2 कणखर धिटाई
3 एकल पालकत्वाची दुसरी इनिंग
Just Now!
X