आघात माणसाला खचवून टाकतो, पण त्याच आघाताचं वंदनानं ऊर्जेत रूपांतर केलं. पण तुझ्या भावनिक आघाताचं काय, यावर तिचं उत्तर असतं, ‘‘सुरक्षिततेची किंमत मागणारी भावनिकता काय कामाची? संकटांनी निर्णय घ्यायला लावला, मग गुंता करण्यात काय अर्थ? ’’ यशस्वी उद्योजक आणि आदर्श माता व पिताही असणाऱ्या वंदना यांच्याविषयी..

भारतीय तत्त्वज्ञानात अर्धनारी नटेश्वराची संकल्पना आहे. जी तत्त्वज्ञानातून जनमानसात रुजली आणि आता ती आधुनिक शास्त्रांच्या कसोटीवरही हजार टक्के खरी ठरली. परिस्थितीनुरूप पित्याचीही भूमिका बजावणाऱ्या एकल मातांचा परिचय करून घेताना या विषयाचे विविध पैलू लक्षात येत आहेत.
वंदना, पुण्यातल्या एका उच्चशिक्षित, प्रतिष्ठित घरातली साधीसुधी मुलगी. संसाराची आवड म्हणून होम सायन्सला गेली. शिक्षण संपतानाच बहिणीच्या दिराशी विवाह करून एका चार्टर्ड अकाऊंटंटची पत्नी झाली. पती असाधारण बुद्धिमत्तेचा, चतुरस्त्र आवडीनिवडी आणि सामाजिक स्थान मोठं. त्या नांदत्या घरात वंदना मनापासून रमली. पहिल्या मुलीच्या जन्माच्यावेळी ती पुण्यात राहिली तेव्हा
पती-पत्नींमध्ये थोडी कुरबुरीला सुरुवात झाली. चांगले करिअर असताना ‘तो’ पैशाच्या नको त्या जोखमी घेतोय हे तिच्या लक्षात आले नाही. जेव्हा देणेकरी दारात उभे राहिले तेव्हा घरातून बाहेर पडणे अपिरहार्य झाले. मुलीवर याचा वाईट परिणाम होईल असा विचार करून लहान मुलीसह ती पुण्यातच राहिली. पण या एका धक्क्यानं ‘तो’ सावरला आणि नवीन नोकरी घेऊन दुबईला गेला.
दुबईला एका नामांकित शिक्षणसंस्थेमध्ये केवळ अकाऊंटंटचं काम करत न राहता त्यानं आपल्या प्रखर बुद्धिमत्तेनं मॅनेजमेंटमध्ये स्थान मिळवलं. कष्टानं ते वाढवलं आणि वंदना मुलीसह दुबईला गेली. पुन्हा सुखाचा संसार सुरू झाला. दुबईत वंदनाला मुलगा झाला. नमिता, तिची मुलगी, शाळेत जात होती. वडिलांचं शाळेतलं आणि समाजातलं स्थान, त्यांना मिळणारा मान आणि प्रतिष्ठा पाहात होती. मुलाचा सुखाचा संसार पाहायला आई-वडीलही तिथे येऊन राहिले. चार र्वष चांगली गेली. दरम्यान वंदनानं पुण्यात संगणकाचा कोर्स केलेला होता. तिनंही दुबईत काम स्वीकारलं. दुबईच्या राजघराण्याशी आणि प्रतिष्ठित वर्तुळाशी त्यांचे चांगले संबंध होते. त्या साऱ्यांचा तिच्या पतीवर विश्वास होता. सगळं छान चाललेलं असताना काही कारणाने ती नोकरी सोडावी लागली. दुसरी नोकरी अशी होती जिथे लोकांच्या पैशांची गुंतवणूक करणं हेच काम होतं. इथेही पुन्हा नको ते साहस त्याने केलं. या व्यवहारात तिच्या या साहसी पतीनं मोठा फटका खाल्ला. त्यात ज्यांचे पैसे बुडाले ते वंदनाला फोन करून धमकावू लागले. तेव्हा तिला खरी परिस्थिती समजली. पण खरं गांभीर्य तेव्हाच समजलं जेव्हा काही गुंड संपूर्ण कुटुंबाचे पासपोर्ट घेऊन गेले. तोपर्यंत येणाऱ्या फोनला ती उत्तरं द्यायची, ‘‘तुम्ही पैसे गुंतवताना मला विचारलं होतं का? मग बुडाल्याचं मला का सांगता.’’ पण पासपोर्टच जेव्हा नाहीसे झाले तेव्हा परतीचे मार्गच बंद झाले. अशा वेळी कुणीही पांढरपेशी व्यक्ती पार गडबडून गेली असती. पण परिस्थितीच खंबीरपणा शिकवते तसं झालं, आणि दुबईतल्या हितचिंतकांनी मदत केली. आता सासू- सासरे आणि दोन मुलांची ही जबाबदारी होती त्यामुळे सारं सोडून दुबईहून परत येणं याशिवाय पर्यायच राहिला नाही. दोन अनुभवांनंतर मात्र या वाटेला पुन्हा जायचं नाही हा तिचा निर्णय पक्का झाला. आणि ती
सासू-सासरे आणि मुलांसह भारतात परतली ती कायमचीच.
पुण्यात नमिता दहावीत गेली आणि निखिल सीनिअर के.जी.मध्ये. वंदनाच्या आई-वडिलांचा भक्कम आधार होता. त्यांनी मुलांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. पण भावनिक आघाताचं काय? वंदनाचं उत्तर असं की, ‘‘सुरक्षिततेची किंमत मागणारी भावनिकता काय कामाची? संकटांनी निर्णय घ्यायला लावला, मग गुंता करण्यात काय अर्थ?’’ पुण्यात वंदनानं ‘मॅसटेक् ’या सॉफ्टवेअर कंपनीत काम करताकरता क्वालिटी मॅनेजपर्यंत मजल मारली आणि मीना साने या तिच्या मैत्रिणीबरोबर स्वत:ची सॉफ्टवेअर क्वॉलिटी ऑडिटची कंपनी सुरू केली. ‘मॅसटेक्’ मध्ये कार्यसंस्कृती फार उच्च दर्जाची होती. त्यांनी आपल्याच तरुण सहकारी मुलींना छान मदत केली. द४ी२७३ र’४३्रल्ल२ या तिच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं तीन वर्षांत मोठी झेप घेतली.
‘या काळात मुलांना कसं समजावलं?’ या प्रश्नावर वंदनाचं म्हणणं, ‘मुलांना सांगता येत नाही पण समजत असतं.’ नमितानं निखिलला शाळेत नेणं-आणणं याची जबाबदारी स्वीकारली. आईनं खूप साथ दिली.’’ वंदनाच्या सांगण्यावरून दिसतं की, या काळात मुलांची घरातली आई म्हणजे आजी होती आणि त्यांचे बाबा म्हणजे वंदना. तांत्रिक ज्ञान, बाह्य़ जगाशी जोडलं जाणं, शिक्षणाच्या निवडीच्या क्षणी पाठीशी उभं राहाणं, ट्रेकिंगला जाणं, संगणक आणणं ही सारी तथाकथित बाबांची कामं वंदनाच करत होती. कंपनीतल्या वाढत्या जबाबदारीमुळे तिनं मुलांना कधी नकार दिला नाही. त्यांना पुरेसा वेळ दिलाच दिला. वंदनाच्या दृष्टीनं पालकत्वामधलं एक अवघड वळण होतं ते निखिलच्या असामान्य बुद्धीला आणि ऊर्जेला योग्य मार्गावर ठेवणं. त्यानं ७ वर्षांचा असताना कॉम्प्युटर असेंबल करण्याचं पुस्तक वाचून संपवलं. मग सोसायटीतल्या मोठय़ामोठय़ा मित्रांसोबत प्रात्यक्षिकही केलं. बाराव्या वर्षी त्याला शेजारी-पाजारी आमंत्रण घेऊन यायचे, ‘‘आमचा संगणक बघ जरा, अडकलाय’’ या क्षेत्रातली त्याची गती बघून तिनं एक हुशार वेंडरकडे निखिलला पाठवायला सुरुवात केली. यामुळे मोठय़ा मुलांच्या वायफळ गप्पांतून
त्याला सोडवलंच, पण आवडीच्या तंत्रज्ञानाशी तो जोडलेला राहिला.
नमिता सांगते ‘‘आईचा सर्वात मोठा गुण विचारांचा रोखठोकपणा आणि मागे काय घडलं यापेक्षा पुढे बघायला शिकवणं. आईनं आजवर बाबांविषयी एकही नकारात्मक शब्द काढला नाही. साऱ्या घटना मोकळेपणानं सांगितल्या. बाकी सारं आमच्यावरच सोडलं.’’
वंदनाही सांगते, ‘‘आमचे कुटुंबीय, मित्रमंडळ जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही समोरासमोर येतो. एकमेकांशी व्यवस्थित बोलतो. ‘तो’ मुलगा म्हणून, पती म्हणून आणि पिता म्हणून प्रेमळ, हवाहवासा गुणी माणूस होता. पण अती साहसानं साऱ्या गुणांची माती झाली. त्याबद्दल मी कधी अनादर दाखवून त्याचा अपमान करत नाही. आजही कायदेशीर घटस्फोट झाला नाही कारण त्या उस्तवारीपेक्षा मला पुष्कळ कामं आहेत. दुबई सोडतानाच सारे बंध आपोआप तुटलेच होते.’’ मागे न बघता सतत कंपनीची प्रगती, मुलांची प्रगती हे करताना वंदनानं स्वत:लाही सतत अपडेट केलं. देशापरदेशातून जे जे नवं शिकता येईल, आत्मसात करता येईल ते केलं. निखिल इंजिनीयिरगला गेला. नमितानं लंडनमध्ये पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर्स केलं.
आघात माणसाला खचवून टाकतो पण त्याच आघाताचं तिनं ऊर्जेत रूपांतर केलं असणार. म्हणून एवढय़ा गोष्टी करण्याइतकी शक्ती तिच्यापाशी होती. सगळं ठीक चाललेलं असताना आणखी एक फटका बसला. ‘युनायटेड वेस्टर्न बँक’ अचानक बंद झाली. पैसा असून लोकांचे पगार थांबले. शंभर कुटुंबं वंदना आणि मीनावर अवलंबून होती. सॉफ्टवेअर ऑडिटमध्ये स्पर्धाही वाढली होती. या टप्प्यावर वंदनानं एक इन्वेस्टर पार्टनर घेतला आणि नवीन कंपनी सुरू केली. ‘बुलियन एज्युकेशन’मार्फत प्रॅक्टिसिंग डॉक्टर्ससाठी प्रगत प्रशिक्षणाचा हा प्रकल्प, अल्पावधीतच लोकप्रिय झाला.
वंदनाच्या व्यावसायिक यशाकडे मुलं कसं बघतात? ‘‘अत्यंत अभिमानाने,’’ नमिता सांगते. ‘‘माझी आई एक कर्तबगार व्यक्ती आहे. आई म्हणून किंवा वडील म्हणूनही ती कुठेच कमी पडणार नाही.’’ नमितानं तिचं क्षेत्र सोडून बेकिंग हा आवडीचा छंदच व्यवसाय म्हणून करायचं ठरवलं. वंदनानं तिला प्रोजेक्ट रिपोर्ट-मार्केट रिसर्चपासून सारं मार्गदर्शन केलं. नमिताच्या पतीनंही तिच्या नव्या कल्पनेला साथ दिली. आता नमिता स्वतंत्र व्यावसायिक आहे.
निखिल आधी निखळ तंत्रज्ञानप्रेमी होता. इंजिनीअर होऊन अमेरिकेत नोकरी करता करता त्याचाही फोकस फायनान्शिअल मॅनेजमेंटकडे झुकला आहे. आणि यात तो आईशी एखाद्या बॉससारखी चर्चा करू शकतो. मार्गदर्शन मागतो. वडिलांनाही अधूनमधून भेटतो. आईनं त्यांना हा मनाचा मोकळेपणा शिकवला, असं तो मानतो.
आपल्याकडे असं मानतात की स्त्रिया दु:ख व्यक्त करून मोकळ्या होतात. पुरुष ते दाखवत नाहीत. बायपास करतात. मला वाटतं वंदनानंही दु:खाविषयी बोलून वाफ न दवडता ती ऊर्जा कामासाठी केंद्रित केली. नजर सतत भविष्याकडे ठेवली. मुलांना तर छान मोठं केलंच पण स्वत:लाही पुरुषी विश्वात सिद्ध केलं. आज ती एका मोठय़ा कंपनीची मालकीण आहे. यशस्वी उद्योजक आणि आदर्श माता..आणि पितासुद्धा आहे. एक परिपूर्ण विकसित व्यक्ती म्हणून तिचं हे स्थान फार महत्त्वाचं आहे. फार प्रेरक आहे.
vasantivartak@gmail.com