मातेनं तिच्या थर्ड इयर डिप्लोमा प्रॉडक्शनसाठी मुख्य भूमिकेत मला निवडलं होतं, हे कळल्यावर माझी जी अवस्था झाली त्याची तुलना- मी एकदा लोकल ट्रेन पकडताना घाईगडबडीत डब्याच्या मधल्या उभ्या दांडय़ावर आपटून तसाच दणकन् मागे फेकला गेलो होतो, त्यावेळच्या माझ्या अवस्थेशीच होऊ शकेल. तीच हतबलता. तोच सात्विक संताप. तीच चारचौघांत हसं झाल्याची भावना. माझे सगळे बॅचमेट्स सीझरच्या पाठीत सुरा खुपसणाऱ्या गद्दार रोमन्ससारखे वाटायला लागले. माता तिची अनाऊन्समेंट करून निघून गेल्यावर ज्यांनी ज्यांनी माझं अभिनंदन केलं त्या सगळ्यांना ‘तुम्ही आयुष्यभर रामायणात जांबूवंताचाच रोल कराल..’ असा मन:पूर्वक शाप दिला मी. मला काही कळेचना. जी मुलगी माझ्याशी काही दिवसांपूर्वी साप-मुंगूसासारखी भांडली, तिनं तिच्या नाटकात मला प्रमुख भूमिका द्यावी? हे म्हणजे जया भादुरीनं रेखाला मंगळागौरीसाठी बोलावण्यासारखं होतं.

त्या रात्री मी मातेला मेसबाहेर गाठलं. दिवसभरात विचार करकरून मी या निष्कर्षांला पोहोचलो होतो की, बहुदा प्रमुख भूमिकेत मला कास्ट करून नंतर पदोपदी माझा अपमान करण्यासाठी आणि छळ करण्यासाठीच मातेनं हा कट रचला असावा. जेवणानंतर मी मातेच्या समोर जाऊन उभा ठाकलो. माझ्यासाठी ही भेट सिकंदर आणि पोरस यांच्या युद्धोत्तर भेटीसारखी होती. त्यामुळे मी अत्यंत गंभीर असं बेअरिंग घेऊन तिच्यासमोर उभा राहिलो. माता मात्र नेहमीप्रमाणे पाईप फुटलेल्या कारंज्यासारखी बोलायला लागली. त्या बोलण्यात तिच्या नाटकाचा, सकाळी तिनं केलेल्या घोषणेचा काहीही विषय नव्हता. दुपारी आम्ही सगळ्यांनी मिळून पाहिलेल्या एका परदेशी नाटकाचा विषय काढून ती पाच मिनिटं अत्यंत असंबद्ध काहीतरी बोलली. शेवटी मी धर्मराज युद्धिष्ठिराच्या धैर्यानं म्हटलं, ‘यार वो तेरे डिप्लोमा में..’ ‘हां, स्क्रिप्ट मैं तुम्हें कल दे दूंगी..’ असं म्हणून ती निघू लागली. आता मात्र माझा धीर सुटला. ‘यार, लेकिन वो अपना झगडा हुआ था..’ हे बोलताना मी स्वत:च स्वत:ला जगातला सगळ्यात भोटम माणूस वाटून गेलो. ती वळली. ‘तो..?’ मला काही सुचेचना. ‘नहीं, मतलब वो..’ यानंतर हीरोला सोडून जाणाऱ्या हीरोइनसारखे शब्द मला सोडून निघून गेले. मी बावळटासारखा तसाच उभा राहिलो. माता दोन पावलं माझ्या दिशेनं आली. ‘झगडा हो गया. अभी नाटक करते हैं..’ असं टाळीबाज वाक्य माझ्या अंगावर मारून माता निघून गेली.

spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?
Ajith Kumar made biryani video viral
बाईकने रोड ट्रिपवर निघालाय सुप्रसिद्ध अभिनेता, कॅम्पमध्ये मित्रांसाठी बनवला खास पदार्थ, व्हिडीओ व्हायरल

मातेनं आपल्या डिप्लोमा प्रॉडक्शनसाठी अ‍ॅरिस्टोफेनेस या ग्रीक नाटककाराचं ‘फ्रॉग्ज्’ हे नाटक निवडलं होतं. मातेच्या इतर सगळ्याच तऱ्हांप्रमाणे तिचा हा चॉइस अनाकलनीय होता. सामान्यत: तिसऱ्या वर्षी दिग्दर्शक डिप्लोमा प्रॉडक्शनसाठी धीरगंभीर, क्लासिक नाटक निवडतात. वयोमानानं  ‘फ्रॉग्ज्’ही तसं क्लासिकच; पण ती कॉमेडी आहे. बरं, ‘फ्रॉग्ज्’चा विषयही तसा अनवटच. डायनेशियस ही ग्रीकांची देवता. मदिरा, उत्सव आणि नाटय़ यांचा तो देव. थोडक्यात म्हणजे ‘किंग ऑफ गुड टाइम्स!’ तर हा डायनेशियस देव नुकत्याच मृत्यू पावलेल्या युरिपिडीज् या नाटककाराच्या शोधात नरकाच्या यात्रेवर निघतो. त्याच्या सोबत त्याचा हरकाम्या झांतियास आहे. (थोडक्यात- आपल्या वगांमधले मूर्ख राजा आणि इब्लिस प्रधानजी!) नरकाच्या वाटेवर डायनेशियसला अनेक अतक्र्य घटनांचा सामना करावा लागतो आणि शेवटी नरकात पोहोचल्यावर त्याला युरिपिडीज् आणि श्रेष्ठ नाटककार अ‍ॅस्केलिस यांच्यातल्या वादविवाद स्पर्धेत जज् म्हणून बसवलं जातं. मूळ ग्रीक नाटकातला विनोद हा अत्यंत जुना आणि उग्र. त्यात ज्या माणसाला हे सगळे संदर्भ माहीत नाहीत त्याच्यासाठी तर हे नाटक म्हणजे खरंच ग्रीक किंवा लॅटिन वाचण्यासारखंच. ‘टेक् ऑफ घेतल्यावर तुमचं विमान हमखास पडेल..’ असं सांगितल्यावर प्रवासी ज्या उत्साहानं विमानप्रवासाला निघेल, त्याच उत्साहानं आम्ही मातेच्या तालमींना लागलो. सुरुवातीचे काही दिवस चाचपडणे, चिडचिडणे, मातेच्या पाठी तिला नावं ठेवणे, तिची अक्कल काढणे हे सगळं करण्यात गेले. पंधरा दिवस नाटकाची तालीम करूनही आपण नेमकं काय करतो आहोत याचा कुणालाच अंदाज येईना. माता आम्हाला ग्रीक इतिहास, त्यातले संदर्भ निकरानं समजावण्याचा प्रयत्न करत होती. तिनं नरकाचं रेखाटलेलं सेट डिझाइनही वेगळं होतं. पण आम्ही मातेला कुठल्याही हुशारीचं क्रेडिट द्यायला तयारच नव्हतो. एके दिवशी तालीम संपवून मी चहा पीत बाहेर बसलो होतो. कधी एकदा या नाटकाची तालीम संपतेय आणि कधी एकदा आपली या नरकातून सुटका होतेय असं झालं होतं. माता शेजारी येऊन बसली. आता ही परत नाटकाचा विषय काढून पिडायला घेईल म्हणून मी उठायला गेलो. ‘यू पीपल डोन्ट ट्रस्ट मी नो?’ तिचा प्रश्न आला. मी थांबलो. म्हटलं, का आपण तरी हिच्या मागे बोला? समोरासमोरच काय ते होऊन जाऊ दे. मी इतक्या दिवसांचं साचलेलं भळाभळा उघडं करायला सुरुवात केली. मुळात हे नाटकच का निवडलं? हे संदर्भ कुणाला कळतायत? कोण डायनेशियस? कोण युरिपिडीज्? कोण अ‍ॅस्केलिस? का यांचं भांडण प्रेक्षकांनी ऐकायचं? नाटक कॉमेडी आहे असं पुस्तकात म्हटलंय. कुठे आहे यातली कॉमेडी? दुधाची पिशवी फुटावी तसा मी भसकन् सगळं बोलून गेलो. माता शांत. ‘यू पीपल आर टेकिंग इट व्हेरी सीरियसली. कॉमेडी है. तुम एन्जॉय नहीं कर रहे हो. युरिपिडीज्, अ‍ॅस्केलिस ये नाम छोडो. दो नाटक लिखनेवाले इंटलेक्च्युअल्स है, उनके बीच जो विवाद हो रहा है, उस में से एक लब्ज भी आम आदमी की समझ में नहीं आ रहा है. और वो आदमी तुम हो. डायनेशियस.. ही इज नॉट अ गॉड, ही इज द ऑडियन्स. नाटक करनेवाला दावा करते हैं कि हम सब कुछ उसके लिये कर रहे हैं. पर उस बेचारे को कुछ समझ में नहीं आ रहा. यू आर नॉट द हीरो ऑफ माय प्ले. यू आर द जोकर.’ मी ऐकत राहिलो. जिच्या रोजच्या जगण्यात दोन वाक्यांमधली संगती कधीच लागली नाही, ती कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातल्या या विसंगतीवर भाष्य करू पाहत होती. मंदगती गोलंदाज असलेल्या मातेकडून मला इतक्या विचारांची अपेक्षाच नव्हती. त्यानंतर मी ती गोष्ट केली- जी त्यानंतरच्या माझ्या सगळ्याच नाटकांमध्ये मी करत आलोय. दिग्दर्शकाला शरण जाणे. १ नोव्हेंबर २००२ ला ‘फ्रॉग्ज्’चा पहिला प्रयोग राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या सक्र्युलेशन युनिटमध्ये झाला. प्रयोग बंपर झाला. मी, ‘एअरलिफ्ट’ चित्रपटात ज्याची इराकी जनरलची भूमिका गाजली तो इनाम इल हक आणि ‘दंगल’मध्ये अंडीवाल्याची छोटीशी, पण छान भूमिका करणारा माझा दुसरा बॅचमेट बदर इल इस्लाम- आमच्या भूमिकांची खूप कौतुकं झाली. एन. एस. डी.च्या धीरगंभीर वातावरणात बऱ्याच दिवसांनी कुणीतरी काहीतरी हास्यस्फोटक केलं होतं. संयोग मातेकडून अशा नाटकाची कुणालाच अपेक्षा नव्हती. नाटकाच्या ब्रोशरमध्ये दिग्दर्शकीय टिप्पणीत मातेनं एकच वाक्य लिहिलं होतं ‘..बीकॉज आय लव्ह लाफिंग.’

नाटकाच्या दुसऱ्या प्रयोगानंतर माता एका मुलाचा हात धरून रंगपटात आली. ‘गाईज् ही इज द गाय..’ असं तिने जाहीर केलं. आम्ही सगळे वळलो. समोर बारीक, शामळू, सावळासा मुलगा उभा होता. हाच मातेचा मारकुटा प्रियकर यावर आमच्या कुणाचाच विश्वास बसेना. आणि गंमत म्हणजे त्यावेळी त्याचाही खालचा ओठ सुजलेला होता. म्हणजे मातेचं प्रेम आणि प्रेमातला व्हायोलन्स दोन्ही ‘वन वे’ नव्हतं तर!

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com