20 February 2019

News Flash

दाहीयाजी

एक माणूस आणि कलाकार म्हणून निरनिराळ्या वाटांवर चालताना भेटलेली कितीएक माणसं.. साधी, अनवट, विक्षिप्त, बुद्धिमान, कलासक्त, ध्येयवेडी, सर्जनशील वगैरे.. त्यांची शब्दचित्रं! त्याची आणि माझी पहिली

एक माणूस आणि कलाकार म्हणून निरनिराळ्या वाटांवर चालताना भेटलेली कितीएक माणसं.. साधी, अनवट, विक्षिप्त, बुद्धिमान, कलासक्त, ध्येयवेडी, सर्जनशील वगैरे.. त्यांची शब्दचित्रं!

त्याची आणि माझी पहिली भेट बाथरूममध्ये झाली. वर्ष होतं सन २०००. माझं एन. एस. डी.चं पहिलं वर्ष. पहिल्या वर्षांतला पहिलाच दिवस. आधल्या रात्री आम्ही सगळेच हॉस्टेलवर पोहोचलो होतो. ‘इन्ट्रो फेस्ट’ सुरू झाला होता. ज्याला बाहेरच्या जगात ‘रॅगिंग’ म्हणत, त्याला आम्ही राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात ‘इन्ट्रो फेस्ट’ म्हणत असू. आणि खरंच तो ‘इन्ट्रो फेस्ट’च होता. इंजिनीयरिंग किंवा मेडिकल कॉलेजांमधून रॅगिंगचे चालणारे जे क्रूर प्रकार आपण ऐकतो, तसं काहीही घडत नसे. पण सीनियर्स पहिल्या वर्षांत प्रवेश घेणाऱ्या आम्हा ‘कोवळ्यां’ना काही अत्यंत गमतीदार ‘टास्क’ देत असत. त्यातून खूप मजा येई, आणि आमच्या सीनियर्सबरोबर त्याच काळात आमचे घट्ट बंधही जोडले जात. असो. तर एन. एस. डी. हॉस्टेलमधला माझा पहिलाच दिवस. प्रथम वर्ष छात्रांसाठी हॉस्टेलवर दोन डॉरमेट्री होत्या आणि बाहेर कॉमन बाथरूम. मी आंघोळ करीत असताना दारावर भेदरलेली थाप पडली. मी हलकं दार उघडलं तोच एक मुलगा आत शिरला. सावळा आणि डोक्याला तुळतुळीत टक्कल असलेला. मी आंघोळ करीत होतो. साहजिकच अंगावर एकही कपडा नव्हता. मी त्याच्याकडे, तो माझ्याकडे काही क्षण पाहत राहिलो आणि दुसऱ्याच क्षणाला त्यानं बाजूची बादली उचलून नळाखाली लावली. स्वत:चे कपडे काढून खुंटीवर टांगले आणि स्वत: आंघोळीसाठी सज्ज झाला. भुवया उंचावण्याचं काहीच कारण नाही. कारण चौदा लोकांत मिळून तीन बाथरूम्स अशी वाटणी आणि त्यात वर्गाच्या काटेकोर वेळा यांच्यामुळे आम्ही बऱ्याचदा ‘बाथरूम पूलिंग’ करीत असू. हॉस्टेलमध्ये आणि वर्गात आपल्या वर्गबंधूंचे इतके रंग इतक्या जवळून पाहायला मिळायचे, की त्या शारीरिक विवस्त्रपणाचं काहीच वाटेनासं व्हायचं. तर मी निवांत माझ्या पाठीला साबण रगडत असताना त्या मुलानं भयभीत सवाल केला, ‘‘बंधू, ये पुरे सालभर अब ऐसे ही पेलेंगे क्या?’’ ही माझी आणि दाहीयाजींची पहिली भेट.

द्वारिकाप्रसाद दाहीया हे त्याचं पूर्ण नाव. ‘द्वारिका दाहीया.. कटनी, मध्य प्रदेश’ हे दाहीयाजींचं ‘ऑफिशियल इन्ट्रोडक्शन’ होतं. भोपाळमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी बन्सी कौल यांची ‘रंगविदूषक’ नावाची संस्था आहे. दाहीयाजी बन्सी कौल यांचे शिष्य. ‘‘हम बस इतना जानते थे की थिएटर करने के लिए सिर्फ दो चीजें लगती है- एक फेविकोल, दुसरा बन्सी कौल.’ दाहीयाजी रंगात आले की त्यांचा हा ठरलेला विनोद समोरच्यावर भिरकावत. बन्सीजींची नाटकं कधीच वास्तववादी नसतात. उडय़ा, जिम्नॅस्टिक्स, उठापटक या गोष्टींवर त्यांची खूप श्रद्धा. त्यामुळे त्यांच्या संस्थेत काम करणारी बहुतांश माणसं हवेत कोलांटय़ाच मार, हातावरच चालून दाखव, पाय उचलून मानेभोवती टाक अशा क्रीडा अगदी सहज करून दाखवायची. दाहीयाजीही त्याला अपवाद नव्हते. आमच्या योगाच्या पहिल्याच वर्गात दाहीयाजींनी शरीराला इतक्या गाठी मारून आणि त्या पुन्हा सोडवून दाखवल्या, की पुढचे वर्ग आपण या आधुनिक पातंजलीकडूनच का घेऊ नयेत, असा आम्हाला प्रश्न पडला.

पण खरी गंमत आहे ती द्वारिका दाहीयाचा दाहीया‘जी’ कसा झाला, याची. मुळात दाहीयाजींच्या व्यक्तिमत्त्वातच ‘जी’पणा होता. वयानं तो आमच्यात बऱ्यापैकी मोठा होता. बोलणं अत्यंत संथ. चालणं तर त्याहून संथ. आणि खाणं तर सुपर संथ! कासवाच्या गतीनं चालणारा हा माणूस रंगमंचावर गेल्यावर माकडाला लाजवेल अशा उडय़ा मारतो यावर विश्वास बसत नसे. दाहीयाजी एन. एस. डी.ला आले तेव्हाच केसांची सीमारेषा मागे जाऊन भालप्रदेश बऱ्यापैकी विस्तीर्ण झाला होता. मेकअपच्या पहिल्याच वर्गात आमचे शिक्षक सुधीर कुलकर्णी यांनी त्याला ‘दाहीयाजी’ अशी हाक मारली आणि तेव्हापासून द्वारिकाप्रसाद दाहियाचा ‘दाहीयाजी’ झाला तो कायमचा!

दाहीयाजी मध्य प्रदेशातल्या एका छोटय़ा गाव-वजा शहरात वाढलेले. त्यामुळे इंग्रजीचा दुरूनही गंध नव्हता. सुमारे पाच हजार उमेदवारांमधून निवड झालेल्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या २० छात्रांपैकी एक असलेल्या दाहीयाजींना ‘Theatre’ या शब्दाचं स्पेलिंगही येत नव्हतं. त्यात गोची अशी, की रा. ना. वि.मध्ये शिकवण्याची भाषा ही बहुतांश इंग्रजीच होती. क्लासिकल इंडियन ड्रामा, मॉडर्न इंडियन ड्रामा, वर्ल्ड ड्रामा, थिएटर आर्किटेक्चर, एस्थेटिक्स हे सगळे वर्ग इंग्रजीत चालायचे. या वर्गामध्ये दाहीयाजींचा चेहरा पाहण्यासारखा असायचा. डोळे बारीक करून तो एकटक शिकवणाऱ्या शिक्षकाकडे पाहत राहायचा. जणू काही तसं पाहिल्यानं त्याला कधीतरी हे जडजंबाल इंग्रजी आपसूक कळणार होतं. वर्ग संपला की तो हताशपणे माझ्याकडे पाहायचा. ‘क्या बोले वो समझा देना बंधू. माअचो! ऐकटिंग के आडे अंग्रेजी आ रही है..’ असं म्हणत संथगतीनं वर्गाबाहेर पडायचा आणि मग आपली या संस्थेतली पात्रता सिद्ध करण्यासाठी पायऱ्यांवर उतरताना असं काहीतरी शारीरिक कर्तब करून दाखवायचा, की आमची बोटं तोंडात जायची.

दुसऱ्या वर्षांला येईपर्यंत दाहीयाजींना जवळजवळ अख्खं रा. ना. वि. आणि आसपासचा परिसर ‘दाहीयाजी’ म्हणू लागला होता. शिकवायला येणारी व्हिजिटिंग फॅकल्टी.. अगदी परदेशी शिक्षकसुद्धा द्वारिकाला ‘दाहीयाजी’च म्हणत. दुसऱ्या वर्षांपासून आम्हाला हॉस्टेलमध्ये स्वतंत्र खोल्या मिळत. एका खोलीत दोघंजण. आपला रूममेट म्हणून दाहीयाजींना पटकावण्यासाठी आम्हा मुलांमध्ये चढाओढ लागली. कारण सोपं होतं. दाहीयाजी गृहिणीच्या निगुतीनं खोली स्वच्छ ठेवत असत. त्याचं झोपायच्या आधी सुरकुत्या न पाडता बिछाना घालणं हा एक प्रेक्षणीय सोहळा होता. एका योग्यानं मंत्रमुग्ध होऊन योग करावा तसा तो बिछाना घालत असे. डॉरमेट्रीमध्ये असताना तो आपल्या भागाच्या स्वच्छतेबरोबरच आजूबाजूचा भागही स्वच्छ करी. त्यामुळे दाहीयाजी ज्याचे रूममेट- त्याला जवळजवळ एका गृहिणीबरोबर राहण्याचं सुख मिळणार, हे ओळखून आम्ही सर्वानीच दाहीयाजींवर ‘क्लेम’ लावला होता. शेवटी माझाच ‘नावबंधू’ बंगाली चिन्मॉय दासला लॉटरी लागली. दाहीयाजीला रूममेट बनवण्यात आणखी एक स्वार्थ होता. तो म्हणजे दाहीयाजी अद्वितीय मसाज करीत असे. आमच्या एका नाटकाच्या बंगलोर दौऱ्यात एकदा माझी मान आखडली होती. उजव्या बाजूला वळवताच येईना. दाहीयाजींनी जादूई बोटांनी वीसएक मिनिटं मसाज केला. मला झोप लागली. एखादी ग्रँड मेजवानी लक्षात राहावी तशी ती झोप मला आजही आठवते. दुसऱ्या दिवशी बाटलीच्या बुचासारखी माझी मान फिरू लागली होती.

हे सगळं खरं असलं तरी दाहीयाजींचं समोरच्यावर ‘फर्स्ट इम्प्रेशन’ हे एका बावळट माणसाचंच पडे. पण दाहीयाजी धक्के देण्यात मास्टर होते. दुसऱ्या वर्षांचा अ‍ॅक्टिंग क्लास. अभिलाष पिल्लई हे रा. ना. वि.चे स्नातक आणि शिवाय ते लंडनला जाऊन ‘रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स’  या परदेशी शाळेत शिकून आलेले. त्यांनी एक एक्सरसाईज दिली.. ‘तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या खऱ्या अनुभवावर आधारित एक इम्प्रोव्हायजेशन करा.’ सगळे आळीपाळीनं काहीतरी करीत होते. त्यावर चर्चा होत होती. दाहीयाजींची पाळी आली. त्यांनीही काहीतरी करून दाखवलं. त्यानं जे केलं त्यावरून हा माणूस खूप कंटाळलाय, एवढंच कळलं. त्यांचं झाल्यावर प्रश्न विचारण्यात आले. आपली मिशी खाजवत खाजवत पिल्लई मास्तरांनी विचारलं, ‘आप कहां थे दाहीयाजी?’ दाहीयाजी शांतपणे वदले, ‘पैरिस में. इतना बडा शहर है, पर शाम को हम वहां बहुत बोअर होते थे सर.’ आम्ही सगळेच चक्रावलो. दाहीयाजी! पॅरिस!! आमच्या सगळ्यांच्या मनातले प्रश्न शेवटी पिल्लई मास्तरांनीच विचारले, ‘आप कभी पॅरिस गए हैं?’ दाहीयाजी चेहऱ्यावरची माशीही न हलवता म्हणाले, ‘छ: महिने वहां रहा हूं सर.’ त्या रात्री दाहीयाजींच्या पासपोर्टचं जाहीर वाचन झालं तेव्हा आम्हाला कळलं, की ‘ळँीं३१ी’ या शब्दाचं स्पेलिंगही न येणारा हा आमचा मित्र जगभरातले तेवीस देश फिरला होता. बन्सी कौल नेहमीच ‘एक्सपोर्ट क्वालिटी’ची नाटकं करतात. त्या चमूबरोबर आमचे दाहीयाजी जग पाहून आले होते.

तिसरं वर्ष सुरू होत असताना दाहीयाजींच्या भोवती मुलींचा गराडा दिसू लागला. आमच्या बाजूलाच असलेल्या ‘कथ्थक केंद्रा’मधल्या अनेक मुलींबरोबर गोपिकांमध्ये वावरणाऱ्या कृष्णाच्या थाटात दाहीयाजी दिसू लागले. एकदा मी मुद्दय़ाला हात घातलाच. ‘और दाहीयाजी! आप तो पुरा का पुरा जनानखाना लिए घूम रहे हो.’ त्यावर दाहीयाजींनी विषण्ण नजरेनं माझ्याकडे पाहिलं. ‘अबे माअचो! काहे का जनानखाना? सालों तुम लोगोंने यहां आते ही नाम के आगे ‘जी’ लगा दिया. अब वो सारी लडकियां हमे भैया मानती है. दाहीयाजी, दाहीयाजी! कोई तो हमें ‘द्वारिका’ कह के बुलाए! दाहीयाजी इज इक्वल टू भैयाजी!’

रा. ना. वि.चे मंतरलेले दिवस संपले. आम्ही सगळेच आपापल्या मार्गाला लागलो. दाहीयाजी पुन्हा आपल्या जन्मशहरीच परतले. तिथे स्वत:ची संस्था स्थापन करून इमानेइतबारे रंगकर्म करू लागले. एके रात्री मी गाडी चालवत असताना मला मेसेज आला.. ‘बंधू, शादी कर रहें हैं.’ मी तडक गाडी रस्त्याच्या कडेला लावली. ‘अरेंज्ड या लव?’ मोठय़ा पॉजनंतर दाहीयाजींचा मॅसेज आला- ‘लऊ’! दाहीयाजींच्या ‘जी’पणाची भिंत भेदून कुणाची तरी नजर आतल्या, प्रेमासाठी आसुसलेल्या ‘द्वारिका’पर्यंत गेली होती तर!

काही दिवसांपूर्वी दाहीयाजी, सवितावहिनी आणि मास्टर दिव्यांश दाहीया यांचा एक हसरा फोटो फेसबुकवर पाहिला. मी लाइक केला. कमेंट लिहिली- ‘ज्युनियर दाहीयाजी आप पर गऐ हैं.’ दाहीयाजींचा तडक रिप्लाय आला- ‘माअचो! हमें दिये सो दिये, हमारे मुन्ने को अब शाप न दो!’

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com

First Published on January 15, 2017 4:16 am

Web Title: artist dwarika prasad dahiya