23 February 2019

News Flash

निघोजकर

उसनवारीवर जग चालतं. आपल्याकडे नसलेली गोष्ट उसनी घेणे ही जगाची रीतच आहे.

जे. बी. नगर ते अंधेरी स्टेशन नेणारा ३३५ नंबर बसचा स्टॉप आला आणि त्या बसस्टॉपवर निघोजकर भेटला.

उसनवारीवर जग चालतं. आपल्याकडे नसलेली गोष्ट उसनी घेणे ही जगाची रीतच आहे. मग ती एखाद्या राष्ट्रानं वर्ल्ड बँकेकडून घेतलेलं कर्ज असो, एखाद्या कुलकर्णीनं घर विकत घेण्यासाठी घेतलेलं कर्ज असो, किंवा तांबट काकूंनी आपल्या सोन्याच्या हाती वाटी पाठवून पावसकर काकूंकडून घेतलेली साखर असो. क्रेडिट इज द लाइफब्लड ऑफ कॉमर्स! निघोजकरनं आपली सगळी ओळखच उसनी घेतली होती. वास्तविक त्याची माझी मैत्रीच काय, साधी ओळखही होण्याचा खरं तर काहीच संबंध नव्हता. आमची मैत्री बस स्टॉपवरची. दहावीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही वडिलांवर उपकार म्हणून कॉलेजमध्ये प्रवेशकर्ते झालो. मुळात मला जायचं होतं आर्ट्सला. माझी तोवरची प्रगती पाहता बाबांनीही माझ्या या निर्णयापुढे मान तुकवली होती. आपलं पोरगं चाळीस टक्के घेऊन घरी परतलं तरी भरून पावलो अशाच मन:स्थितीत ते होते. किंबहुना, त्यांची तशी मन:स्थिती माझ्या तोवरच्या कारकीर्दीनं तयार केली होती. पण १९८३ साली कुणालाच अपेक्षा नसताना कपिलदेवच्या भारतीय संघानं विश्वचषक जिंकला, तसेच माझ्या दहावीच्या मार्कशिटवर कुणाचीच अपेक्षा नसताना जवळजवळ ऐंशी टक्के मार्क उमटले. बाबा म्हणाले, ‘सायन्सला जा.’ मी आर्ट्सवर अडून बसलो. शेवटी ‘तुला नाही मला, घाल कुत्र्याला’च्या न्यायानं आम्ही मांडवली केली आणि मी कॉमर्सला गेलो! या निर्णयामुळे आयुष्याला लागलेल्या वळणांचं कथन मी आत्मचरित्रासाठी राखून ठेवतो. सांगण्याचा मुद्दा हा की, कॉमर्सला जाण्याच्या निर्णयामुळे आयुष्यात डहाणूकर कॉलेज आलं. जे. बी. नगर ते अंधेरी स्टेशन नेणारा ३३५ नंबर बसचा स्टॉप आला आणि त्या बसस्टॉपवर निघोजकर भेटला. उंचीला माझ्यापेक्षा कमी. किंचित लठ्ठ. डोळ्याला चष्मा. कसं कोण जाणे, पण त्या चष्म्यातून त्याचे डोळे आहेत त्या साइजपेक्षा थोडे मोठेच दिसायचे. पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने बॅगी पॅण्ट आणि शर्ट घातला होता. त्याच्या माझ्या ओळखीची सुरुवात मी त्याला ‘किती वाजले?’ हा प्रश्न विचारण्यापासून झाली होती. ‘‘तेरा एकतीस..’’ निघोजकरनं उत्तर दिलं होतं. आधी क्षणभर मला वाटलं, हा गाडीचा नंबर सांगतोय. मग माझी टय़ूब पेटली. निघोजकर नेहमी मिल्ट्री टाइम सांगायचा. ‘‘दीड वाजला..’’ अशी देशी भाषा नाही. ‘‘तेरा एकतीस!’’

‘‘तू इथेच राहतोस का?’’ मी विचारलं.

‘‘नाही. कोलडोंगरीला. इथे कॉलेज..’’ अचानक बोलता बोलता तो थांबला. माझ्या लक्षात आलं. आमच्या जे. बी. नगरात ‘बगडका महाविद्यालय’ नावाचं एक पुद्दी कॉलेज होतं. निघोजकर तिथला विद्यार्थी होता. बगडकाचा स्टुडंट आहे हे सांगताना तो बहुदा ओशाळला असावा. म्हणूनच त्यानं हिंदी सिनेमाची हीरोइन ‘‘मैं तुमसे प्यार करती हूं..’’ म्हणताना जशी लाजत वाक्य अध्र्यावर सोडते, तसंच आपलं वाक्य अध्र्यावर सोडलं होतं.

त्यानंतर तो बसस्टॉपवर भेटत राहिला. ओळख वाढत गेली. डहाणूकर कॉलेज पार्ले पूर्वेला आहे. एकदा आमचं कॉलेजहून चालत जुहू बीचला जायचं ठरलं. आम्ही निघालो. खिशात तेव्हा वट्ट पाच रुपये होते. पार्ले स्टेशन क्रॉस करून एन. एम. कॉलेजजवळ आल्यावर तिथला वडापाव खायचा असा ठराव पास झाला. मुळात वडापावपेक्षा आम्हाला एन. एम.- मिठीबाईच्या त्या नाक्याचंच आकर्षण. आमचं डहाणूकर महाविद्यालय म्हणजे साधंसुधं वरण-भात कॉलेज. आता कॉलेजची इमारत खूप मोठी झालीय, पण आमच्या वेळी डब्यासारखी दोन मजली इमारत होती. शाळेत असताना जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, गोविंदा वगैरे नवतरुण सुदर्शनचक्रासारखे हातावर वह्य़ा फिरवत ज्या भव्यदिव्य कॉलेजांमध्ये जाऊन गाणी म्हणायचे तसली कॉलेजं आमच्या डोळ्यासमोर. त्या तुलनेत आमचं म. ल. ड. महाविद्यालय अगदीच छोटं. त्यामुळे एन. एम.- मिठीबाईच्या त्या कॉस्मोपॉलिटन कट्टय़ाचं आम्हाला आकर्षण होतंच. सो.. आम्ही एन. एम.समोरच्या त्या वडापाववाल्याकडे उभे राहून आजूबाजूला बहरलेले ताटवे न्याहाळू लागलो. आणि गुलाबाच्या ताटव्यात अचानक सुरणाचा गड्डा दिसावा तसा मला तिथे निघोजकर दिसला. त्याला पाहून मला काही मारुतीरायाला प्रभुरामचंद्रांच्या भेटीनं झाला तसा आनंद झाला नाही. तरीही ओळखीचं माणूस दिसल्यावर आपल्याला जो एक उत्साह वाटतो, त्या उत्साहानं मी निघोजकरला हाक मारली. ती निघोजकरला ऐकू गेली. त्यानं माझ्याकडे पाहिलं. मी हात केला. निघोजकरनं मान वळवली आणि तो त्याच्याबरोबर असलेल्या दोन मुलांबरोबर पुन्हा गप्पा मारू लागला. माझी अवस्था कुणीतरी ‘हाड्’ म्हटलेल्या गरीब कुत्र्यासारखी झाली.

काही दिवसांनी निघोजकर बसस्टॉपवर भेटला. समोरून बोलायला आला. ‘‘त्या दिवशी तू एन. एम.च्या नाक्यावर काय करत होतास?’’

‘‘त्या दिवशी ओळख दाखवली असतीस तर त्याच दिवशी सांगितलं असतं.’’

‘‘अरे, सॉरी यार.. ते.. तू पटकन् काहीतरी विचारलं बिचारलं असतंस म्हणून मी तुला इग्नोअर केला.’’ मला काहीच कळेना.

‘‘म्हणजे?’’

निघोजकरनं उगीच आजूबाजूला पाहिलं. मग माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ‘‘मी रोज एन. एम.ला उभा राहतो.’’ मला अजूनही कळेना. लोक इलेक्शनला उभे राहतात, एवढंच मला ठाऊक होतं. ‘‘अरे, सालं माझी अ‍ॅडमिशन झाली बगडकाला. पण हे काय सालं कॉलेज आहे काय? बाहेर कुठे बोललो बगडकाला जातो, तर लोक साले छोटय़ात गिनती करतात आपली. म्हणून मी सांगतो- मी एन. एम.ला आहे म्हणून.’’ मला गरगरायला लागलं.

‘‘सांगतो म्हणजे कुणाला सांगतो?’’

‘‘सगळ्यांना! फक्त घरच्यांना माहित्ये. बाकी एरियात मी एन. एम.चा आहे. सकाळी इथे कॉलेजला दोन लेक्चर बसतो, मग सरळ एन. एम.च्या नाक्यावर. मग दिवसभर तिथेच. आता तर तिथे आपलं फ्रेंड सर्कलपण झालंय. परवा फ्रेंडशिप डे आहे एन. एम.चा. तू येतो काय?’’

‘‘अरे, पण कुणी आयकार्ड चेक केलं तर?’’ माझा पापभीरू मिडलक्लास प्रश्न.

‘‘नाक्यावर कोण आयकार्ड मागतं? कॉलेजच्या आत पाय टाकला तर आयकार्ड!  तिथे आपण जातच नाही.’’ निघोजकरच्या या उत्तरावर आपल्याला नेमकं काय वाटायला पाहिजे, हे कळण्यासाठी आता आपल्याला एक वेगळा क्लास लावावा लागेल असं मला वाटू लागलं.

अकरावीला असताना मी अकाऊंट्स व मॅथ्ससाठी क्लास लावला होता. एकदा अचानक क्लासमध्ये माझ्या बाजूच्या बाकावर निघोजकर! मी चमकून पाहिलं तसा हसून म्हणाला, ‘‘घाबरू नको. इथे ऑफिशियल अ‍ॅडमिशन घेतलीय.’’ ब्रेकमध्ये आम्ही चहा मारत उभे होतो. एक झिपऱ्या निघोजकरजवळ आला.

‘‘अ‍ॅन्डी? लाइट?’’

निघोजकरनं खिशातून लायटर काढून त्याची सिग्रेट पेटवली. झिपऱ्या गेल्यावर मी ‘जायदाद से बेदखल’ करताना हिंदी सिनेमातले बाप करतात तसा चेहरा करून निघोजकरला विचारलं, ‘‘तू सिग्रेट पितोस?’’

‘‘चक् ! अजून तरी नाही.’’

‘‘अरे, पण तुझ्याकडे लायटर आहे!’’ आता माझा चेहरा मुल्जीमला कचाटय़ात पकडणाऱ्या वकिलासारखा झाला.

‘‘ठेवतो मी जवळ.’’

‘‘का?’’ आता माझा चेहरा दैनंदिन मालिकेच्या निर्बुद्ध नायिकेसारखा झाला.

‘‘फ्रेंडशिप करायला बरं पडतं. एखाद्याला लाइट दिला की दोस्ती पटकन् होते.’’

‘‘आणि हा अ‍ॅन्डी कोण?’’

‘‘मीच. तुला काय वाटतं, एन. एम.च्या क्राऊडला मी माझं खरं नाव सांगेन? औदुंबर निघोजकर हे काय नाव आहे साला?’’

निघोजकर आणि माझी बसस्टॉप मैत्री फार काळ टिकली नाही. बारावीच्या वर्षांला त्यानं क्लासही सोडला. अधूनमधून भेटायचा. हात दाखवायचा. पुढे मी नाटय़क्षेत्राकडे वळलो. मालिकांमध्ये वगैरे काम करायला लागलो. तेव्हा एकदा मला निघोजकर पार्ले स्टेशनवर दिसला होता.

‘‘तू काय ते सीरियल बिरियल करतो ना.. आई बघते घरी. मी नाही बघत. आय वॉच ओन्ली सी. एन. एन. अ‍ॅण्ड प्राइम स्पोर्ट्स. बट गुड.’’

‘‘तू काय करतोस?’’

‘‘आय अ‍ॅम इन्टू फायनान्स. कधी काही लागलं तर सांग. चल बाय. ट्रेन येतेय. माझा पास फर्स्ट क्लासचा आहे.’’

मी निमूट ट्रेन पकडून माझ्या बापुडय़ा मराठी मालिकेच्या शूटिंगला रवाना झालो. दारातून सहज डोकावलो. स्टेशनवर लक्ष गेलं. निघोजकरनं ट्रेन सोडली होती. फर्स्ट क्लासच्या डब्यासमोर जाऊन तो नुसताच थांबला होता. ट्रेन निघून गेल्यावर तो पुढची ट्रेन पकडायला पुन्हा सेकंड क्लासच्या डब्याच्या ठिकाणी चालत येताना मला दिसत राहिला.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com

First Published on April 2, 2017 1:43 am

Web Title: chinmay mandlekar article about his college friend