15 January 2021

News Flash

अभय सर (भाग ३)

अभय सरांचा जन्म आणि बालपण कोकणातल्या एका छोटेखानी गावातलं.

 

‘वादळवाट’नंतर अभय सरांची सगळय़ात गाजलेली मालिका म्हणजे ‘अग्निहोत्र’. ‘अग्निहोत्र’ सुरू होईपर्यंत मी स्वतंत्रपणे ‘असंभव’ लिहू लागलो होतो. एके दिवशी सरांचा फोन आला. ‘‘मला एक चिन्मय मांडलेकर हवा आहे.’’

मला काही कळेना. मी हसून विचारलं, ‘‘म्हणजे सर?’’

‘‘अरे, नवीन मालिकेचं काम सुरू झालंय. पण माझी तब्येत जरा खालावलीय. एका जागी बसून लिहिता येत नाही फार वेळ. गणपती हवा कुणीतरी.’’

‘‘मी येतो.’’ म्हणत फोन ठेवला.

‘अग्निहोत्र’चे सुरुवातीचे काही भाग अभय सर सांगायचे आणि मी लिहायचो. त्यांच्या खालावलेल्या तब्येतीचं तेव्हा फारसं काही वाटलं नाही. सरांना बरं नाहीये; काही दिवसांत होतील बरे, असंच वाटत होतं. सर डायबेटिक होते, त्यामुळे अधूनमधून प्रकृतीच्या तक्रारी नवीन नव्हत्या. ‘‘तरुणपणी खूप मस्ती केली रे! आता शरीर वसूल करतंय,’’ एरवी सर गमतीत सांगायचे. एकदा असंच आम्ही ‘अग्निहोत्र’च्या काही भागांचं लिखाण करून उठलो. मी निघताना सरांनी विचारलं. ‘‘तुझं टायटल काय द्यायचं?’’

‘‘कसलं टायटल?’’ मी विचारलं.

‘‘अरे एवढे एपिसोड्स बसून लिहिलेस तू माझ्याबरोबर.’’

‘‘सर, ‘वादळवाट’च्या वेळी ग्रॅज्युएशनचा कोर्स झाला. हा ‘पोस्ट ग्रॅज्युएशन’ मानू या. नको टायटलबियटल.’’

‘‘तुला माहित्ये मी असं काम कधीच करत नाही.’’- सर.

लेखकाला मिळणारा मान आणि मानधन याबद्दल सर कमालीचे आग्रही असायचे. एखाद्या लेखकाला कुणी पैशाला बुडवला वगैरे गोष्टी कानावर आल्या, की ते मनापासून चिडायचे. मराठी चित्रपट-मालिका-नाटय़लेखकांची एकजूट होऊन तिला एका संघटनेचं स्वरूप यायला नंतर काही र्वष जावी लागली. पण अगदी ‘वादळवाट’च्या दिवसांमध्येही सर पोटतिडकीनं म्हणायचे, ‘‘आपला ‘प्रेशर ग्रुप’ हवा. लेखकांना फोलपाटासारखे ट्रीट करतात साले! आयटम साँगवर नाचणाऱ्यांना लाख लाख रुपये देतात आणि लेखकानं काही हजार जास्त मागितले तर गळा काढतात भो!’’ यातूनच त्यांच्या डोक्यात ‘कन्टेन्ट प्रोव्हायडिंग कंपनी’ची कल्पना निघाली होती. ‘‘एकटा लेखक कुठल्या तरी कोपऱ्यात लिहीत बसतो. त्यानं जीव ओतून लिहायचं, मग प्रोडय़ूसर्स, चॅनल्स त्याच्या वाट्टेल तशा चिंध्या उडवणार! तसं नाही पाहिजे. एक कॉपरेरेट कंपनीच फॉर्म करायची लेखकांची. कंपनी असली तर आपल्याला असं कुणी टेकन फॉर ग्रान्टेड धरणार नाही.’’

कधी कधी या सगळय़ा कल्पना अतिरंजित वाटायच्या, पण त्यामागची पोटतिडीक नितांत खरी होती. कशात काहीच नसताना जो कोऱ्या कागदावर विश्व उभं करतो, ज्या पायाच्या आधारावर इतर लोक मग आपले इमले बांधतात, त्या लेखक नावाच्या व्यक्तिविशेषाला मिळणाऱ्या दुर्लक्षित वागणुकीचा त्यांना भयंकर तिटकारा होता. जात्याच स्वभावात रग असल्यानं, आपले कुणी कसे आणि किती पैसे बुडवले, याचा पाढा मांडत बसण्यापेक्षा जे नाकारलं गेलंय ते हिसकावून घेण्याकडे त्यांचा कल होता. एकदा आमचा एक लेखकमित्र त्याच्या एका फिल्मच्या स्क्रीनिंगनंतर आग्रहानं आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला. बोलण्याच्या ओघात ‘केलेल्या कामाचे कधीच न मिळालेले पैसे’ या लाडक्या विषयाकडे गाडी वळली. आमच्या लेखकमित्राची लिस्ट खूपच मोठी होती. यजमानावरचा सगळा राग अभय सर ताटातल्या चिकनमध्ये काटा खुपसून काढत होते. शेवटी ते न राहून म्हणाले, ‘‘आता जो सिनेमा आम्ही पाहिला त्याचे तरी पैसे मिळालेत ना तुला?’’ ‘‘शेवटचा चेक राहिलाय,’’ तो लेखकमित्र चेहऱ्यावर अत्यंत खिन्न, लेकुरवाळं हसू आणत म्हणाला. सेकंदाचाही पॉज न घेता अभय सर हॉटेलच्या कॅप्टनकडे वळले- ‘‘बिल मेरे पास लाना.’’ लेखकमित्राच्या विरोधाला न जुमानता बिल भरून गाडीत बसताना ते गुरगुरले, ‘‘यांना पहिले फटके मारले पाहिजेत.’’

अभय सरांचा जन्म आणि बालपण कोकणातल्या एका छोटेखानी गावातलं. वडील खूपच लहानपणी गेले. त्यांच्या आईनं त्यांना एकहाती वाढवलं. त्यांच्या मामांचा शिस्तप्रिय, पण भक्कम आधार होता. ‘वादळवाट’चे आबा चौधरी अभय सरांनी बरेचसे आपल्या मामांवर बेतले असावेत. शिक्षण पूर्ण करून काही अडल्यापडल्या नोकऱ्या, मग पत्रकारितेत उमेदवारी, तिथं बस्तान बसवणं, मग जाहिरात क्षेत्रात कॉपीरायटिंग, झी मराठी ‘अल्फा मराठी’ असताना तिथे अल्प काळासाठी केलेली नोकरी आणि मग मालिका, चित्रपटलेखन असे अनेक घाट पार करत त्यांनी कारकीर्द उभी केली होती. ‘सेल्फमेड’ या इंग्रजी वाक्प्रचाराचं ते चालतंबोलतं उदाहरण होते. आणि हे स्वत:ला घडवणं फक्त मिळकतीच्या किंवा कारकीर्दीच्या बाबतीतच नाही, पण लेखक म्हणून, कलावंत म्हणून समृद्ध होणंसुद्धा. लेखकाचा लेखकराव झाला, की त्याचं शिक्षण थांबतं. तो कानानं बहिरा होतो, त्याला इतरांचं चांगलं दिसायचं थांबतं. पण अभय सर या बाबतीत कमालीचे सजग होते. त्यांचं बोट धरून मी किती तरी फिल्म फेस्टिव्हल्स पाहिले, आडवाटेवरची पुस्तकं वाचली. ‘‘इतर लिहितायत त्यापेक्षा वेगळं लिहायचं असेल तर इतर वाचतायत त्यापेक्षा वेगळं वाचायलाही हवं.’’ जन्मभर जपून ठेवावं असं काही तरी ते चालताबोलता सांगून जायचे.

‘अग्निहोत्र’ खूप गाजली. मालिका शेवटच्या टप्प्यावर असतानाच सरांच्या प्रकृतीच्या कुरबुरींनी पुन्हा डोकं वर काढलं होतं. या मधल्या काळात त्यांचं ‘ए भाऊ! डोकं नको खाऊ’ हे नाटकही रंगमंचावर आलं आणि चांगलंच गाजलं. त्यांना मी शेवटचं भेटायला गेलो तेव्हा त्यांनी बिंबिसारनगरमधल्या त्यांच्या राहत्या घराशेजारीच एक छोटं ऑफिस केलं होतं. ‘‘फिल्म लिहायचीय? मिळून लिहू या?’’ मी आनंदानं मान हलवली. ‘‘आणि या वेळी लिहायला बसू तेव्हा लक्षात ठेवायचं, यू आर नॉट अ‍ॅन असिस्टंट एनिमोअर. यू आर अ को-रायटर. सगळं माझ्या डोक्यावर टाकून तू मजा बघत बसायची नाही.’’ उत्तरादाखल मी फक्त हसलो. ‘‘मी नाटकही लिहिलंय एक नवीन. वेळ काढून ये. ऐकवतो.’’ आम्ही बाहेर पडलो, तेव्हां अभय सरांचं धावतं दुडदुडतं मूल- ‘गुंडी’ मला भेटायला आली. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ही अ‍ॅल्बिनो जर्मन शेफर्ड पाळली होती. कुठलंही फॅन्सी नाव न ठेवता ‘गुंडी’ असं अत्यंत देशी लाडाचं नाव तिला दिलं होतं. मी सरांचा निरोप घेऊन निघालो. या माणसाबरोबर आपली ही शेवटची भेट आहे, हे त्या वेळी माहीत नव्हतं. जो सिनेमा आम्ही मिळून लिहायचा होता, त्याच्यावर मी काम सुरूही केलं. ‘‘माझी तब्येत बोंबललीय पुन्हा. पण तू काम सुरू ठेव.’’ हा आमचा शेवटचा फोन कॉल. त्यानंतर काही दिवसांतच एका सकाळी श्रीरंग गोडबोलेंचा फोन आला.. ‘‘अभय इज नो मोअर.’’

रक्ताच्या नात्यांचीही बरेचदा ओझी होतात आणि काही माणसं कुठलंही नातं नसताना, न मागता पुरून उरेल इतकं देऊन जातात. काही दिवसांपूर्वी ‘कच्चा लिंबू’च्या प्रीमियरला सरांच्या पत्नी चारू मॅडम भेटल्या. ‘कच्चा लिंबू’च्या टायटल्सच्या आधी निर्माता मंदार देवस्थळीनं विनय आपटे, आनंद अभ्यंकर आणि अभय परांजपे या आमच्या तीन सवंगडय़ांसाठी अत्यंत हृद्य अर्पणपत्रिका टाकलीय हे मला तरी माहीत नव्हतं. सिनेमा पाहून निघताना चारू मॅडम म्हणाल्या, ‘‘अभयचा लॅपटॉप अजून जपून ठेवलाय मी. ये एकदा घरी वेळ काढून. त्यात काय आहे, काय नाही, तुझ्यापेक्षा जास्त कुणाला माहीत असणार?’’ मला जायचंय तो लॅपटॉप उघडून पाहायला. तो उघडल्यावर आठवणींचा एक मोठा पट समोर उघडला जाणार आहे. कानात इयरबड घालून शेषशाई विष्णूसारखे आडवे पहुडलेले अभय सर आणि कॉम्युटरवर त्यांनी सांगितलेलं लिहून घ्यायला बसलेला मी.. बाहेरगावी जाताना मी अजूनही गाडी चालवायला शिकत नाही म्हणून माझ्यावर उखडलेले सर.. दहा दिवस दैनंदिन मालिकांच्या रगाडय़ाला फाटय़ावर मारून गोव्यातला पहिला ‘इफ्फी’ बघायला गेलेलो मी, अभय सर आणि संगीतदादा.. माझ्या प्रेयसीला पाठवायचा मेसेज मी चुकून त्यांना पाठवल्यानंतर त्यावरून पुढे अनेक दिवस माझी फिरकी घेणारे सर.. माझ्या वडलांच्या जाण्यानंतर अधिकारवाणीनं आणि आपुलकीनं ‘‘आता पैसे नुसते उडवू नकोस, कसे गुंतवायचे सांगतो मी,’’ असं म्हणणारे सर.. अक्षरश: दिवसा दिवसाच्या आठवणी आहेत. आणि या सगळय़ा आठवणींची सुरुवात एका अनाहूत फोन कॉलनं झाली होती.

डेली सोपमध्ये कुठलाही नवीन ट्रॅक सुरू करताना सर नेहमी म्हणायचे, ‘‘डेली सोपमध्ये पहिली वीट लावताना कधीच माहिती नसतं याचा पुढे ताजमहाल होणार आहे की म्हाडाची बिल्डिंग.’’ .. आमच्या ट्रॅकचा ताजमहाल मी जन्मभर जपून ठेवणार आहे.

aquarian2279@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2017 2:45 am

Web Title: chinmay mandlekar article in marathi on abhay paranjape part 3
Next Stories
1 अभय सर (भाग २)
2 अभय सर
3 संगीतदादा..!
Just Now!
X