इनाम सहारनपूरचा. सहारनपूरची लाकडी खेळणी खूप प्रसिद्ध आहेत म्हणे. या सहारनपूरमध्येच इनामचा जन्म झाला. तिथेच तो वाढला. इनामच्या वडिलांना अकरा मुलं. त्यातला इनाम सहावा किंवा सातवा असावा. वडील नमाजी मुसलमान. लाकडाच्या खेळण्यांचाच पारंपरिक व्यवसाय करणारे. उत्तर प्रदेशातल्या छोटय़ाशा गावात एका कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात दहा भावंडांबरोबर वाढणाऱ्या इनामच्या डोक्यात नाटकाचं वेड कुठून शिरलं, हेच मला कधी कधी कळेनासं होतं. बरं, शिरलं तेही साधंसुधं नाही. एकदम ‘इप्टा’चाच मेंबर झाला. ‘इप्टा’ ही भारतीय रंगभूमीवर कार्यरत असणारी फार फार जुनी संस्था. ‘इप्टा’च्या शाखा भारतभर आहेत. रंगकर्मीना कुठलीही जात, कुठलाही पक्ष, कुठलाही धर्म नसला तरी ‘इप्टा’ ही संस्था कम्युनिस्ट विचारसरणीशी सलगी राखून असलेली. त्यामुळे इनाम जेव्हा राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात आला तेव्हा तो नानाविध स्फोटकांमधून तयार झालेल्या एखाद्या सुतळी बॉम्बसारखा होता. कट्टर मुस्लीम वातावरणात गेलेलं बालपण.. त्याच्या बरोब्बर विरुद्ध टोकाला जाणारे कम्युनिस्ट विचार.. आणि शिवाय सहारनपूरसारख्या छोटय़ा गावातून दिल्लीसारख्या महानगरात आल्यानंतर येणारं एक वैचारिक सैरभैरपण.. त्यावेळी एन. एस. डी.च्या बॉईज् हॉस्टेलमध्ये पहिल्या वर्षांच्या मुलांसाठी दोन डॉरमेट्रीज् असायच्या. १३ नंबर आणि ५ नंबर. १३ नंबर डॉरमेट्रीत इनाम माझ्या बाजूच्या बेडचा मालक झाला. साधारण पहिल्या तासालाच त्याची-माझी मैत्री झाली. का नसती झाली? त्यानं घरून आणलेल्या खिम्याचा डबा उघडला. झणझणीत वास आसमंतात घुमला. मी माझ्या बॅगेचं कुलूप उघडण्याच्या कार्यात मग्न होतो. एखाद्यानं मुस्काटात मारून आपल्याला स्वप्नातून जागं करावं, तसं त्या वासानं मला हलवलं. मी वर पाहिलं. इनाम माझ्याकडे पाहून हसला. डबा पुढे केला. एकाही शब्दाची अदलाबदल झाली नाही. मनीचे गुज मनाला कळले. सगळा डबा रिकामा केल्यावरच मी माझा खरकटा उजवा हात मागे करत डावा हात पुढे केला. ‘चिन्मय मांडलेकर.. मुंबई.’ इनामनं त्याचा हात पुढे केला : ‘इनाम उल हक.. सहारनपूर.’

पुढे जसा आमचा कोर्स सुरू झाला तशा इनामच्या अंगीच्या नाना कळा दिसू लागल्या. सगळ्यात प्रकर्षांनं दिसली ती त्याची कुठल्याही मुद्दय़ावरून मॅनेजमेंटशी भांडण्याची जिगर. त्या काळात इनाम जवळजवळ ‘इन्कलाब जिन्दाबाद’ असं कपाळावर लिहूनच फिरत होता. मग हॉस्टेलचा कूलर बिघडलेला असो किंवा स्कूलमधला एखादा शिक्षक नीट शिकवत नसो; इनाम तक्रारीचा अर्ज घेऊन डायरेक्टरच्या केबिनबाहेर उभा दिसायचा. एकदा मी धावतपळत नऊचा वर्ग गाठायला निघालो होतो. इनाम मला हॉस्टेलच्या रेक्टरच्या घराबाहेर उभा दिसला. त्यांचं घर तेव्हा हॉस्टेलच्याच आवारात होतं. मी हाक मारली- ‘‘ओय! क्लास नहीं चलना क्या?’’ ‘‘चलना है. पर पहले ये कंप्लेंट की अर्जी दे दूं.’’ माझे खांदे पडले. ‘‘अब क्या कंप्लेंट है?’’ मी त्याच्याजवळ गेलो. ‘‘५ नंबर डॉरमेट्री में लीकेज है.’’ ‘‘लेकिन तुझे उससे क्या? अपन तो १३ नंबर में रहते हैं.’’ तो माझ्यावर चिडलाच. ‘‘जब प्रॉब्लेम खडी हो, तो तेरा-मेरा नहीं देखा जाता मांडलेकर! बस- लडा जाता है!’’ ‘‘ए! इप्टा की औलाद! भाषण मत दे. तेरे साथ ५ नंबर का एक भी लडका है क्या? छत उनकी टपक रही है ना?’’ ‘‘दॅटस् नॉट माई प्रॉब्लेम! जो बात सही है उसके लिये मैं लडूंगा.’’ मी निमूट शाळेचा रस्ता धरला. आणि त्या दिवशी वर्गात उशिरा आल्याबद्दल इनामनं शिक्षकांचा ओरडा खाल्ला. आपल्या या क्रांतिकारी वृत्तीचा लोक गैरफायदा घेतायत आणि आपली खिल्लीही उडवताहेत, हे त्याच्या ध्यानी येत नव्हतं. किंवा येत असलं तरी दुसऱ्यांची घमेली स्वत:च्या डोक्यावर वाहणं त्याला थांबवता येत नव्हतं.

pune rain marathi news, pune unseasonal rain marathi news
पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना
Change your morning habits will help in achieving success
Morning Habits For Success: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बदला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या या सवयी
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
Kerala doctors remove 4 cm-long cockroach from man’s lungs
धक्कादायक! व्यक्तीच्या फुफ्फुसातून बाहेर काढले चक्क झुरळ, केरळच्या डॉक्टरांनी केली ८ तासांची वैद्यकीय प्रक्रिया

वर्गात त्याची हुशारी दिसत होती. तो करत असलेली इम्प्रोव्हायझेशन्स कल्पक असायची. पण त्याची सगळीकडे तोंड उघडण्याची खोड आणि सतत खांद्यावर झेंडा घेऊन फिरायची सवय यामुळे इनाम लोकांच्या चेष्टेचाच विषय जास्त ठरत गेला. आणि दुसऱ्या आठवडय़ातच त्याला सामूहिकरीत्या पदवी बहाल करण्यात आली- ‘चंपक’. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक बॅचमध्ये जो मुलगा स्वत:च स्वत:चं हसं करून घेण्यात पटाईत असे त्याला हे ‘चंपक’त्व बहाल करण्यात येई. आज ही प्रथा एन. एस. डी.त सुरू आहे की नाही, ठाऊक नाही. पण आमच्या बॅचनंतर अनेक बॅचेसमध्ये एकापेक्षा एक ‘चंपक’ होऊन गेले. आणि या सगळ्यांचा आद्य ‘चंपक’ होता माझा मित्र इनाम उल हक!

एन. एस. डी. बॉईज् हॉस्टेलमध्ये पहिलं वर्ष डॉरमेट्रीत काढल्यानंतर दुसऱ्या वर्षांत प्रत्येकाला स्वतंत्र खोली मिळते. पण जर मुलांची संख्या जास्त असेल तर खोली शेअर करावी लागते. आमच्या बॅचमध्ये मुलं जास्त होती. त्यामुळे पहिल्या वर्षांच्या शेवटीच जोडय़ा बनायला सुरुवात झाली. पहिल्या वर्षांत झालेली भांडणं, व्यसनं, आवडीनिवडी याच्या आधारावर त्या जोडय़ा बनत. कसा कोण जाणे मी एकटाच राहिलो. मी इनामला विचारलं. ‘‘नहीं यार, तू दिवाकर है, मैं निशाचर हूं.’’ इनामनं अत्यंत काव्यात्मक उत्तर दिलं. त्याचा रूममेट असलेल्या आसामच्या पवित्र राभाशी दुसऱ्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी इनाम कुठल्यातरी तत्त्वाच्या  मुद्दय़ावरून भांडला आणि नंतर दोन र्वष मी आणि पवित्र एकत्र आणि इनाम एकटा अशी परिस्थिती होती. स्कूलमध्येही तेच झालं होतं. दुसऱ्या वर्षीपासून विविध दिग्दर्शक येऊन नाटकं बसवायचे. इनामला हटकून विनोदी किंवा दुय्यम भूमिका मिळायच्या. त्याच्या बोलघेवडेपणामुळे त्याला नट म्हणून कुणीच सीरियसली घ्यायला तयार नव्हतं. तिसऱ्या वर्षी ज्येष्ठ दिग्दर्शक मोहन महर्षी यांनी आमच्याबरोबर ‘सांप- सिढी’ नावाचं एक नाटक केलं. त्यावेळी नव्यानं उदयाला आलेल्या कॉपरेरेट जगताच्या कुरीतींवर प्रकाश टाकणारं, भाष्य करणारं ते नाटक होतं. आतापर्यंत ज्यांना बरे रोल मिळाले नाहीयेत त्यांना या नाटकात बरे रोल मिळतील असा आमचा कयास होता. काहींच्या बाबतीत तसं झालंही. पण इनामच्या वाटय़ाला पुन्हा एकदा अत्यंत दुय्यम दर्जाचा दोन वाक्यांचा रोल आला. त्या रात्री मी उशिरा हॉस्टेलवर परतलो. सर्वत्र शांतता होती. बाहेरच्या लाकडी बेंचवर कुणीतरी गुडघ्यात डोकं खुपसून बसलं होतं. मी जवळ गेलो. इनाम होता. मी जवळ बसलो. खिम्याच्या डब्याचं झाकण उघडल्यावर जशी शब्दांची गरज पडली नव्हती, तशीच आताही पडली नाही. त्यानं माझ्याकडे पाहिलं. धरणाचा बांध फुटावा तशी त्याच्या डोळ्यांना धार लागली. मी फक्त त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसून राहिलो. पाच-दहा मिनिटांनी तो पूर्ण रिता झाला. शांतपणे उठला. मग शेजारच्या झाडाशी बोलल्यासारखं म्हणाला, ‘‘पता नहीं क्या गलत कर रहा हूं..’’ तो जाऊ लागला. मी हाक मारली. तो थांबला. ‘‘कम बोला कर यार.. सच में.’’ मी पोटतिडकीनं म्हणालो. तो काहीच न बोलता निघून गेला.

दुसऱ्या दिवशी महर्षी सरांच्या रिहर्सलला आम्ही सगळे पुन्हा जमलो. सर आले. सहा फूट उंच. इंग्रजालाही लाजवेल असं इंग्रजी बोलणारे. ‘‘सो टुडे वी..’’ सरांनी सुरुवात केलीच होती, तोच इनामनं हात वर केला. ‘‘यस मिस्टर हक? यू सीम टू बी हॅविंग सम इन्टरेस्टिंग इन्फर्मेशन टू शेअर.. अदरवाइज यू वुडन्ट डेअर इंटरप्ट मी.’’ महर्षीचा आवाज कोल्ड स्टोरेजमधल्या माशाइतका थंड होता. ‘‘सर, एक ही बात कहनी है. मुझे इस नाटक में रोल नहीं करना.’’ मी तोंड पंजात लपवलं. झालं! चंपक परत बोलला! ‘और वो क्यों?’’ महर्षी सर इंग्रजीच्या ऐरावतातून खाली उतरत राष्ट्रभाषेच्या गरीबरथात स्वार होत्सासे झाले. ‘‘सर, उस रोल में दम नहीं है.’’ त्याच्या या वाक्यावर मी सीतामातेच्या काकूळतीनं जमिनीकडे पाहू लागलो. ‘आत्ताच्या आत्ता ती आपल्याला पोटात घेईल तर किती मज्जा!’ असं वाटू लागलं. ‘‘मेरी आपसे रिक्वेस्ट है सर. मैं आपके नाटक की प्रोसेसपर एक प्रोजेक्ट करूंगा. ये अदनासा रोल करके कुच्छ नहीं सीख पाऊंगा. लेकिन बाहर से आपको काम करते हुए देखूंगा तो बहुत कुछ सीखने को मिलेगा. प्लीज सर.’’ महर्षी सरांनी क्षणभर दाढी खाजवली. त्यांच्यासाठी हे नवीन होतं. त्यांच्यासाठी काय, आमच्या सगळ्यांसाठीच इनामचं ते शांत, संयत बोलणं नवीन होतं. ‘‘ओ. के. अ‍ॅज यू विश.’’ महर्षी सर म्हणाले. त्यांचं हे निरुपद्रवी वाक्य पुढे जाऊन एका स्फोटक गोष्टीचं जन्मदातं कसं झालं, याची गोष्ट पुढच्या रविवारी.

(क्रमश:)

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com