28 February 2021

News Flash

कल्पना

कल्पनाच्या या अतिभक्तिमुळे तिच्या घराबद्दल माझ्या विलक्षण कल्पना तयार झाल्या होत्या.

कल्पनाच्या या अतिभक्तिमुळे तिच्या घराबद्दल माझ्या विलक्षण कल्पना तयार झाल्या होत्या

आम्ही कॉलेजमध्ये असताना कॉलेजातल्या मुलींची विभागणी दोन गटांत होत असे. पहिला गट ‘सड्डम’ आणि दुसरा गट ‘काकूबाई’. ‘सड्डम’ गटातल्या मुलींची गुणवैशिष्टय़े अशी, की या मुली सहसा आमच्यासारख्या मँगो पीपल सामान्यजनांना अप्राप्य वाटत. आपण या गटात मोडतो याची त्यांना स्वत:ला पुरेपूर जाणीव असे. ‘फ्रेन्डशिप डे’ला या मुलींना बॅण्ड बांधण्यासाठी लोक घरून तालीम करून येत असत. ‘रोज डे’ला तर त्यांना दसऱ्याला आपटय़ाच्या पानाला येतो तेवढा भाव येत असे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे, कालांतराने त्यांचे जे ‘बॉयफ्रेंड’ निपजत त्यांच्यापेक्षा आम्हीच कसे बरे होतो याची बालंबाल खात्री आम्हा प्रत्येकाच्या मनाशी झालेली असे. आता दुसऱ्या गटाकडे वळू या. ‘काकूबाई’ गटातल्या मुलींकडून इतर कुठल्याच अपेक्षा नसल्यानं त्यांच्याशी मैत्री करणं अत्यंत सोपं जात असे. आपण वर्गाला दांडय़ा मारून पिक्चरला जात असताना या मुलींनी इमाने इतबारे लेक्चरला बसून दुसऱ्या दिवशी नोट्स आपल्याला देणं हे आम्ही त्यांचं परमकर्तव्य मानत असू. परीक्षेच्या दिवसांमध्ये ‘इम्पॉर्टन्ट’ प्रश्नांची त्यांच्या कोचिंग क्लासेसनं त्यांना दिलेली यादी त्यांनी आपल्याला दिल्याशिवाय कॅन्टीनमधला चहा त्यांना वज्र्य असे. ‘सड्डम’ गटातल्या एखाद्या मुलीशी यांची ओळख असलीच तर तिच्या कोर्टात आपली केस लढवणं हे त्यांच्यावर बंधनकारक असे. ‘काकूबाई’ गटातल्या मुलींचे कॉलेजात असताना सहसा ‘बॉयफ्रेंड’ होत नसत. त्यातून झालाच तर त्याच्या नादी न लागता त्यांनी अभ्यासावर फोकस करणं कसं गरजेचं आहे, यावर त्यांना खरमरीत शब्दांत भाषण देण्याचा अधिकार आम्हाला असे.. तर कल्पना, ‘काकूबाई’ गटातली होती. त्यामुळे साधारण कॉलेजच्या पहिल्याच दिवशी आमची मैत्री झाली.

कल्पनाचे आई-वडील दोघंही बी.एम.सी. कर्मचारी होते. ती मालाड ते पार्ले रोज ट्रेननं प्रवास करत असे. आम्ही अकरावीला असताना ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ आला होता. एका पावसाळी दुपारी ‘ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स’ ऊर्फ ‘ओ.सी.’ नावाचा निरस विषय न शिकता ‘एक लडकी को देखा’ तो नेमका कैसा लगा, याची शहानिशा करण्याचं सर्वानुमते ठरलं. त्या वेळी पाल्र्याचा ‘शान’ सिनेमा कार्यरत होता. दुपारी तीनचा शो. ‘मनीषा कोयरालाला भेटायला कोण कोण येणार?’ असा सवाल मी मधल्या सुट्टीतच विचारला तेव्हा ग्रुपमधले सगळेच हात वर झाले. कल्पना मात्र हातातला चहाचा ग्लास घट्ट धरून राहिली. ‘‘कल्पे, चल की. एक दिवस लेक्चर बंक केलंस तर उद्या कॉलेजला टाळं नाही लागणार.’’ कुणी तरी म्हणालं. ‘‘प्रश्न लेक्चरचा नाही रे. पण तीनचा शो सुटणार सहाला. मग तुम्ही टी.पी. करणार. स्टेशनला पोहोचायला सहा वीस. माझी सहा अठरा चुकेल. घरी पोहोचायला उशीर होईल.’’ ‘‘दहा पंधरा मिनिटंच उशीर होईल.’’ ‘‘बाबा ओरडतात.’’ ‘‘अगं मग थाप मार. गाडीला गर्दी होती म्हणून सोडली गाडी. म्हणून उशीर झाला.’’ ‘‘स्वामींच्या फोटोसमोर खोटं नाही बोलता येत.’’ कल्पनाचं हे संदिग्ध उत्तर ऐकून आम्ही सगळेच विचारात पडलो. ती गेल्यावर ग्रुपमधल्याच दुसऱ्या मुलीनं सांगितलं, ‘‘त्यांच्या घरी स्वामींचा मोठा फोटो आहे. सॉलेड भक्त आहेत ते लोक.’’

त्यानंतर कल्पनाच्या भक्तीची प्रचीती आम्हा सगळ्यांना येतच गेली. सिद्धिविनायकाला चालत जाणे, दर सोमवारी उपवास करणे, चातुर्मास पाळणे, कॉलेजच्या फ्री पीरियडमध्ये इतर मुलं-मुली अंताक्षरी खेळत असताना शेवटच्या बाकावर बसून ‘दुर्गा कवच’ वाचणे.. हे कल्पनाचे कारनामे पाहिल्यावर हिच्यासाठी आता ‘काकूबाई’ हा गट खारिज करून ‘आज्जीबाई’ या नवीन गटाची स्थापना करावी लागेल की काय अशी चिंता मला भेडसावू लागली. मी इरेला पेटून तिच्या शेजारी जाऊन बसलो. ‘‘काय वाचतेयस?’’ ओठानं स्तोत्रं पुटपुटायचं चालू ठेवून तिनं मला नजरेनंच थांबायचा इशारा केला. ‘‘अंताक्षरी खेळायला ये ना.’’ कल्पनानं डोळे गच्च मिटून घेतले. जवळजवळ साडेसात मिनिटांनी तिनं ते उघडले. मी तिथेच होतो. ‘‘ही काय चू..’’ ‘‘देवाच्या बाबतीत काही बोललास तर मारीन हं.’’ काकूबाईंच्या एकदम राणी लक्ष्मीबाई झाल्या. ‘‘अगं, पण कॉलेजात स्तोत्रं कोण म्हणत बसतं?’’ ‘‘आज उठायला उशीर झाला. सकाळी पोथी वाचायची राहिली. ट्रेनमध्ये बसायला जागाच मिळाली नाही. बरं झालं आता फ्री पीरियड मिळाला. नाही तर..’’ ‘‘नाही तर काय झालं असतं?’’ ‘‘ तुला भूक लागली की मेदुवडा गिळायला जातोस ना कॅन्टीनमध्ये?’’  ‘‘भूक लागल्यावर खाल्लं नाही तर अ‍ॅसिडिटी होते.’’ ‘‘मग तसंच देवाचं वेळच्या वेळी केलं नाही तर पाप लागतं.’’ ‘‘कुठे लागतं?’’ या माझ्या प्रश्नावर तिनं माझ्या पाठीत जोरदार धपाटा घातला.

कल्पनाच्या या अतिभक्तिमुळे तिच्या घराबद्दल माझ्या विलक्षण कल्पना तयार झाल्या होत्या. घर स्वामीभक्त असल्याचं कळलंच होतं. तिथल्या लोकांच्या भक्तीच्या प्रभावानं आपल्यासारखा पापी माणूस तर उंबऱ्यातच भस्मसात होऊन जाईल याची मला खात्री होती. कल्पनाचे वडील सतत स्वामींच्या नावाचा जप करतायत. येणाऱ्या-जाणाऱ्याला उदी किंवा अंगारा लावला जातोय. लग्नाच्या मंडपात आमंत्रितांवर अत्तर शिंपडायला मुली उभ्या असतात तसा कल्पनाचा धाकटा भाऊ दारातच गोमूत्र शिंपडायला उभा आहे. आठवडय़ातनं पाच दिवस विविध देवांच्या नावानं उपवास करणाऱ्या कल्पनाच्या आईच्या चेहऱ्यावर संत सखू किंवा जनाबाईंसारखं भक्तीचं एक वेगळंच तेज आलंय, जे पाहून आपले डोळे चकणे झालेत.. अशी काहीशी अपेक्षा घेऊन मी कल्पनाच्या घरी पहिल्यांदा गणपती विसर्जनाला गेलो होतो. पण माझा भक्तिमय कल्पनाविलास कल्पनाविलासच ठरला. कल्पनाच्या बाबांनी गणपती विसर्जनासाठी काढायच्या आधीच ‘पोरांनो! तुमच्यापैकी कोण कोण घेतो?’ असा तोंडाला अंगठा लावत प्रश्न विचारून समस्तांच्या मनात आदराचं स्थानच निर्माण केलं होतं. ‘‘नंदा, पिशव्या घे गं. चौपाटीवरून डायरेक फिश मार्केटलाच जाईन,’’ अशी त्यांनी आपल्या बायकोला खणखणीत ऑर्डर दिली होती. कल्पनाच्या आईनंही गणेशासाठी दूधपोहे यांचा शिधा करतानाच बाजूला हिरव्या मसाल्याचं वाटणही वाटून ठेवलं होतं. ‘‘आज रात्री गणपती शिळवला की हिरवी पापलेटं हाएत हा. खाऊन जायचं सगळ्यांनी,’’ असा लाडिक आग्रह करून त्यांनी आमचं मन जिंकलं होतं. पण मग कल्पनाच्या चातुर्मासाचं रहस्य काही मला सुटत नव्हतं. ‘‘लहानपणी रामायण एकदम आवडीनं बघायची ती. तेव्हापासून डोक्यावर परिणाम झालाय तिच्या.’’ रात्री ‘पोरांबरोबर’ बियर पिताना कल्पनाचे बाबा सांगत होते. ‘‘आम्ही स्वामींचं करतो. सगळं त्यांच्याच कृपेनं आहे. पण हिचं जरा जास्तीच आहे. एवढी पण सीरियस भक्ती करू नये. काय?’’ माझ्यासमोर रोस्टेड काजूची वाटी सरकवत ते म्हणाले.

बारावीनंतर कल्पनानं कॉलेज बदललं आणि गणेश विसर्जनानंतर हक्कानं माशाचं अप्रतीम जेवण खाऊ घालणाऱ्या एका जिव्हाळ्याच्या घराला आम्ही पारखे झालो.

कट टू  वर्ष २००४. माझ्या एका हिंदी नाटकाचा प्रयोग पेडर रोडला ‘रशियन कल्चरल सेंटर’ला होता. प्रयोगानंतर एक बाई भेटायला आली. ‘‘ओळखलं?’’ मला दोन सेकंद लागली. ‘‘आयचा घो, कल्पना!’’ कल्पना दिलखुलास हसली. ‘‘तू इथे कुठे?’’ माझं आश्चर्य अजूनही ओसरलं नव्हतं. ‘‘इथेच राहते मी.’’ ‘‘पेडर रोडला?’’ आवाजातलं आश्चर्य न लपवता आल्याबद्दल मी मनोमन स्वत:ला शिव्या घातल्या. पण कल्पनाला या आश्चर्ययुक्त प्रश्नाची सवय असावी. ‘‘लग्न करून इथेच आले.’’ आता मी कल्पनाला जरा नीट पाहिलं. दिसण्यात फारसा फरक पडला नव्हता. थोडी स्थूल झाली होती. पण कपडे पेडर रोडच्या पत्त्याला शोभणारे होते. दुसऱ्या दिवशीही आमचा तिथेच प्रयोग होता. ‘‘उद्या नक्की घरी ये.’’ पेडर रोडच्या अलीशान घरात राहणारी कॉलेजची बिछडी हुई मैत्रीण भेटली तर कोण जात नाही? गेलो. घर प्रशस्तच होतं. कल्पनाच्या नवऱ्याची खानदानी श्रीमंती दिसतच होती. ‘‘टी.वाय.ची परीक्षा झाल्या झाल्याच ठरलं. अरेंज्ड.’’ मग घर दाखवण्याचा एक औपचारिक सोहळा पार पडला. कल्पनाच्या नवऱ्याची श्रीमंती पाहून मी चहा प्यायला सोफ्यावर टेकलो आणि अचानक पाठीत धपाटा बसावा तसा एक विचार मनात चमकला. ‘‘कल्पना, तुझ्या घरात देवाचा एकही फोटो नाही.’’ कल्पना हसली. ‘‘देवाचा फोटो सोड, देवघरही नाही.’’ ‘‘काय?’’ मला एकदम शेवटच्या बाकावर बसून पोथी वाचणारी मुलगी आठवली. ‘‘आमचं ठरलं, त्यानंतर यज्ञेशनं ही एकमेव अट घातली होती. घरात देव्हारा नको. तो टोटल नास्तिक आहे.’’ ‘‘अगं पण..’’ ‘‘मी माझे सगळे व्रत, माझ्या सगळ्या पूजा करते. आणि माझी गाडी बघितली नाहीस तू. यज्ञेश नेहमी मस्करी करतो, गाडी कमी आणि गणपतीच्या मिरवणुकीचा रथ जास्त वाटते.’’ कल्पनाकडे त्या वेळी स्वत:ची अशी एक गोंडस लाडाकोडाची बी.एम.डब्ल्यू. होती, हे मी आपलं जाता जाता सांगतोय, रेकॉर्डसाठी!

कल्पनाचा नवरा खानदानी गडगंज होता. मुंबईत त्यांच्या अनेक जागा होत्या, बाहेर काही जमिनी होत्या, शिवाय फॅक्टऱ्याही होत्या. ‘‘शेवटी हे सगळं मिळालंय तेही स्वामींच्याच कृपेनं. अर्थात यज्ञेशसमोर मी हे बोलले तर भांडण होईल.’’ त्याच दिवशी काकूबाईंच्या काकांनाही भेटण्याचा योग आला. पेडर रोडला राहणाऱ्या मैत्रिणी रोज रोज थोडी भेटतात, भेटल्या तरी चहाला रोज रोज थोडी बोलावतात, आणि मग आता जेवूनच जा असा आग्रह तरी कुठे रोज रोज करतात! यज्ञेश एकदम चिल्ड आऊट माणूस होता. कल्पनाच्या वडिलांसारखाच. ‘‘गॉड वॉड इज ऑल क्रॅप.’’ स्वत:साठी पेग बनवता बनवता तो सांगत होता. ‘‘कल्पूसमोर बोललो तो राडा हो जाएगा. शी इज तो बाबा.. एकदम भक्तीण!’’ अंबानीचा हा शेजारी एका भाषेवर टिकायला तयार नव्हता. ‘‘ज्या गोष्टीमुळे वर्ल्ड इज सो फुल ऑफ केऑस, त्या गोष्टीवर कसा बिलीफ ठेवायचा? यू ओन्ली टेल मी.’’ मी उत्तरादाखल फक्त दुबईहून आणले गेलेले खारे बदाम तोंडात टाकले. ‘‘चिअर्स’’ यज्ञेशनं ग्लास पुढं केला. मी माझा सरबताचा ग्लास त्याच्या ग्लासला टेकवला. त्या रात्री कल्पनानं मला महालक्ष्मी स्टेशनला ड्रॉप केलं. तिनं गाडीत तयार केलेला देव्हारा खरंच एका मिनी गणेश मंडपासारखा दिसत होता. गाडीला स्टार्टर मारायच्या आधी तीन वेळा कल्पना त्या देव्हाऱ्याला पाया पडली. भक्तापासून देव लांब जातो, पण देवापासून भक्त फार लांब जात नाही, हे त्या दिवशी मला पटलं आणि मी बी.एम.डब्लू.मधल्या बाप्पाच्या त्या मूर्तीला हात जोडले.

चिन्मय मांडलेकर – aquarian2279@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2017 1:34 am

Web Title: chinmay mandlekar article on friend kalpana
Next Stories
1 जनार्दनकाका
2 कौतुक
3 इनाम उल हक (भाग २)
Just Now!
X